पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 8 (लैंगिक असमाधान व अस्वास्थ्य)

लैंगिक असमाधानामुळे अस्वस्थ असणारी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतायत व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढतच जाताना दिसतंय. त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे खाली देत आहे. 

- लग्न होऊन पंधरा वर्षे झाली, दोन मुलेही झाली; पण एवढ्या वर्षांत पुरेसे लैंगिक सुख कधीच मिळाले नाही. आजही त्याविषयीची तीव्र इच्छा आहे. पण मार्ग दिसत नाही.
- प्रेमविवाह होऊन बारा वर्षे होऊन गेली, पण जोडीदार लैंगिक संबंधांत अक्षम असल्याने अजूनपर्यंत एकदाही लैंगिक संबंधांचा अनुभव घेता आला नाही. आता इच्छा अनावर होतेय, पण मार्ग दिसत नाही.
- लग्नानंतर काही दिवस लैंगिक संबंध सुरळीत होते. पण पुढे जोडीदाराची लैंगिक संबंधांविषयीची इच्छा कमी होत गेली. त्यामुळे लैंगिक सुखाच्या दृष्टीने असमाधानी व अस्वस्थ आहे.
- वय वाढत चाललंय. अजूनही लग्नासाठी योग्य जोडीदार मिळत नाही. पण मनातील लैंगिक इच्छा मात्र आता अनावर होत आहेत. एकदा तरी आता हा अनुभव घ्यायची इच्छा तीव्र होत आहे. असे अनेक अस्वस्थ तरूण-तरूणी आजूबाजूला दिसत आहेत.
- लग्न होऊन घटस्फोट झाला. पदरी मूल असल्याने दुसऱ्या लग्नात अडचणी आल्या किंवा येत आहेत. मुलांची काळजी आहेच. पण मनात येणाऱ्या लैंगिक संबंधांविषयीच्या भावनांचे काय करू? इच्छा खूप होतेय, पण योग्य पर्याय दिसत नाहीये.
- अशीच अवस्था अनेक विधवा महिलांची सुद्धा आहे.
- लग्नानंतर काही दिवसांतच जोडीदार बाहेर दुसऱ्या स्रीच्या प्रेमात पडला व त्याचे घरात लक्षच नसते. माझ्या लैंगिक भावना व इच्छांचा काहीच विचार करत नाही. घटस्फोट घेण्यासारखी माझी परिस्थिती नाही. त्याने त्याच्या लैंगिक सुखाचा मार्ग निवडला; पण माझ्या लैंगिक भावनांचे काय करू? इच्छा खूप होतेय, पण पर्यायच दिसत नाही.
- बाकी सगळं छान चाललंय. जोडीदार खूप चांगला आहे. सासरची माणसं पण चांगली आहेत. फक्त लैंगिक सुख देण्यात जोडीदार कमी पडतोय. माझ्या व त्याच्या लैंगिक इच्छांमध्ये खूप तफावत असते. लैंगिक संबंधांच्या या इच्छेचं काय करू? अस्वस्थ वाटतंय.
- आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. पण आम्ही एकमेकांना हवं तसं व हवं तितकं लैंगिक समाधान देऊ शकत नाही. हे लक्षात येतंय. त्यामुळे दोघेही अस्वस्थ असतोय. काय करावं कळत नाही.
- माझी लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मी दुसरा कोणी जोडीदार शोधला तर माझ्या जोडीदाराला ते आवडणार नाही, मान्य होणार नाही. मग मी काय करावं?

अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसत आहेत. लैंगिक असमाधानातून असणारे नैराश्य व अस्वस्थता यासह जगणारे अनेक स्त्री-पुरुष आहेत. आपल्या समाजाने घालून दिलेल्या चौकट्यांमुळे लग्नाआधी सुद्धा आणि लग्नानंतर सुद्धा लैंगिक सुखाला पारखे झालेले अनेक अस्वस्थ तरूण-तरूणी दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये महत्वाच्या दोन गोष्टी जबाबदार आहेत असे मला वाटते. त्यातली पहिली म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेने घालून ठेवलेले- 'फक्त लग्नानंतरच आणि फक्त लग्नाच्या जोडीदाराशीच लैंगिक संबंध करण्याचे बंधन'. या बंधनामुळे एकाच जोडीदाराकडून केली गेलेली लैंगिक समाधानाची अपेक्षा व ती पूर्ण होवो न होवो तरी त्याच्याशीच/तिच्याशीच एकनिष्ठ राहून इतर कुणाशीही (मग अगदी लग्नाआधी सुद्धा) लैंगिक संबंध न ठेवणे याला दिले गेलेले पावित्र्याचे महत्त्व.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'मुळात लैंगिक संबंधाविषयीच्या भावना, इच्छा व आनंदाला दिले गेलेले दुय्यम महत्त्व'. त्यामुळेच स्त्री-पुरूष जोडीदार एकमेकांना लैंगिक आंनद देण्यासाठी ज्या अनेक गोष्टी करू शकतात, याविषयी फारशी चर्चा, माहिती व मोकळीक कुठेच दिली जात नाही आणि त्यामुळे फक्त 'शिश्न-योनी संबंध' म्हणजेच इंटरकोर्स हेच एकमेव लैंगिक आनंदाचे कारण आहे असा चुकीचा समज घेऊन अनेकजण वावरत असतात. आपल्या जोडीदाराला 'शिश्न-योनी संबंधां'पेक्षा इतर अशा अनेक गोष्टींनी आपण लैंगिक आनंद मिळवून देऊ शकतो हे जर सर्वांना कळले आणि हा आनंद सुद्धा आयुष्यात अतिशय महत्वाचा असतो हे उमगले तर अनेक वैवाहिक जोडपी सुखा-समाधानाने एकाच जोडीदारासोबत सुद्धा लैंगिक तृप्ती सहित राहू शकतात.

या दोन्ही गोष्टींबाबतचे समाजात असणारे चुकीचे समज दूर करून त्याविषयी पुरेपूर माहिती दिली गेली आणि यातील जो मार्ग जास्त शक्य आहे तो वापरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले गेले तर अशा कित्येक स्त्री-पुरुष, तरूण-तरुणांची ही अस्वस्थता दूर होऊन समाजात एक स्वास्थ्याचे वातावरण तयार होवू शकते. प्रा. रघुनाथ धोंडो कर्वे (र. धों.) यांनी समाजातील हीच अस्वास्थ्याची अवस्था ओळखून ती दूर करण्याच्या हेतूनेच 'समाजस्वास्थ्य'साठी प्रबोधनाचा वसा हाती घेतला होता. पण आज त्यांच्यानंतर एवढ्या वर्षांनी सुद्धा समाज याच अस्वस्थतेत जगत आहे ही शोकांतिका आहे. तरी बरं, कि गर्भनिरोधकांमुळे र धों ज्या 'संततिनियमन'चा आग्रह धरत होते, ते आता सहज सोपे झालेले आहे व त्यामुळेच सध्याची वैद्यकीय परिस्थिती ही या 'समाजस्वास्थ्य' साठी अधिक सोयीची झालेली आहे; पण आपली सामाजिक परिस्थिती मात्र अजूनही या लैंगिक स्वास्थ्याकडे 'समाजस्वास्थ्य' म्हणून बघायला तयार नाही ही खरी मोठी व्यथा आहे.

- सचिन (8424041159)

(यासंबंधी आपलेही काही अनुभव, मतं शेअर करायचे असतील तर नक्की व्हाट्सअप्प करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध