पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 7) - लैंगिक अवयवांविषयीच्या अज्ञानातून होणारे गैरसमज (Misconceptions about sex organs)
लहानपणापासून स्वतःच्या व इतरांच्या शिश्न/योनी विषयी असलेले कुतूहल जेव्हा तसेच दडपले जाते, तेव्हा पुढे जाऊन ते मनात अनेक गैरसमजांना जन्म देते. पुरुषांना नेहमी स्त्रीच्या योनीची जागा ही एक काहीतरी गूढ असल्यासारखे वाटत राहते आणि स्त्रियांना पुरुषांचे बाहेर लटकणारे शिश्न हे चमत्कारिक वाटत राहते.
स्त्रीच्या योनीमार्गामध्ये नेमके असे काय असते जे पुरुषाच्या शिश्नाला सामावून घेऊ शकते? स्त्रीची योनी आत नेमकी किती लांब असते? तिची लांबी, रुंदी, खोली किती असते? एवढं मोठं शिश्न स्त्रीच्या शरिरात शिरते तरी तिला त्रास कसा होत नाही? आत कुठे जात असेल हे शिश्न? गर्भाशयात जात असेल का? कि पोटात जाते?
पुरुषांचे बाहेर लटकणारे शिश्न त्यांना अडचणीचे ठरत नसेल का? ते एवढे मोठे शिश्न त्यांच्या अंडरवेअर मध्ये किंवा पँटमध्ये कसे काय बसत असेल? इतर वेळी सैल होऊन लटकणारे शिश्न संबंधांच्या वेळी अचानक मोठे कसे होते? आणि पुन्हा आपोआप छोटे व सैल कसे होत असेल? शिश्नामध्ये हाडे असतात का? कि एकच सलग मोठे हाड असते? कि लवचिक छोटी छोटी हाडे असतात? कि हाडच नसते? हाड नसेल तर मग ते एवढे कडक कसे होते? शिश्न जास्तीतजास्त किती लांब होत असेल? जास्त लांब शिश्न असल्यावर स्त्रियांना सेक्समध्ये जास्त आनंद मिळत असेल का? शिश्न जास्त रूंद असेल तर योनीमध्ये जायला त्रास होत असेल का? कि त्याने जास्त मजा येत असेल?
असे अनेक प्रश्न वयात येत असताना मुला-मुलींच्या व अनेक प्रौढ स्त्री-पुरुषांच्या सुद्धा मनात येत असतात.
'शुभ मंगल सावधान' चित्रपटात मुलीची आई तिला सांगत असते कि 'स्त्रीची योनी म्हणजे अलिबाबाची गुहा असते आणि पुरुषाचे लिंग म्हणजे अलिबाबा.' मी पूर्वी गावाकडे ऐकलेल्या काही पुरुषांच्या संवादात ते असं म्हणत होते कि - 'स्त्रीची योनी म्हणजे एक न संपणारी वाट असते आणि पुरुषाचे लिंग म्हणजे त्या वाटेवरील वाटसरू. वाटसरू चालून थकू शकतो, पण वाट थकत नसते.' म्हणजेच स्त्रीची इच्छा कधीच पूर्ण होत नसते किंवा ती कधीच तृप्त होत नसते असा त्यांचा समज होता. (किंवा कदाचित यामुळेच त्या 'वाटे'सारखेच स्त्रीला सुद्धा स्वतःच्या काही (लैंगिक) इच्छा, अपेक्षा, भावना, तृप्ती असं काही नसते असं त्यांना वाटत असेल का?) असले अनेक चुकीचे व भयानक संस्कार घेऊन आपण मोठे होत असतो. यातलं खरं-खोटं काय? हे सांगणारं कोणी आपल्याला भेटलं नाही, तर याच गैरसमजांसह अनेकजण लैंगिक संबंधाविषयीचे आपापले मत बनवत असतात.
मुलांमध्ये वृषणांच्या लहान-मोठेपणावरून अनेक गैरसमज व भिती असते. 'माझ्या एका वृषणाला (त्यांच्या भाषेत 'गोटी'ला) सूज आलीय' असं वाटून त्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याचे प्रयत्न सुद्धा केले जातात. 'प्रत्येकाचेच डावे वृषण हे उजव्या वृषणापेक्षा छोटे असते आणि त्यापेक्षा अधिक खाली लोंबणारे असते' हे सत्य माहीतच नसल्याने जवळपास प्रत्येकजणच या भितीतून पुढे जात असतो. चारचौघात, मित्रांमध्ये कुणा दुसऱ्यांना या गोष्टींवरून चिडवताना स्वतःच्या मनात सुद्धा त्याविषयीची भिती असतेच, पण ती कुणाला बोलून दाखवली किंवा आपल्या वृषणाच्या कमी-जास्त साईज विषयी कुणाला सांगितले, तर आपल्याला सुद्धा सगळे चिडवायला लागतील या भितीतून कुणीच कुणाला आपलं खरं सांगत नाहीत. पण त्यामुळे हा गैरसमज आणि भिती मात्र मनात तशीच कायम राहते. पूर्वी उघड्यावर संडासला जावे लागायचे तेव्हा मुलांना एकमेकांच्या लैंगिक अवयवांना पाहण्याची किंवा कुणाच्या गोट्या (वृषण) किती लोंबतायत किंवा खाली-वर आहेत का? हे पाहायची ती नामी संधी वाटायची. असंच एकदा मला आठवतंय - आमच्या गावातील एका मुलाबद्दल इतरांनी इतकी आवई उठवली होती कि - 'याची एक गोटी (वृषण) खाली निसटलीय आणि म्हणून याला मिलिटरीच्या भरतीमधून सुद्धा मेडिकलमध्ये बाहेर काढलंय'. ते ऐकल्यावर तर कित्येक दिवस आमच्या अनेकांच्या गोट्या कपाळात गेल्या होत्या. कारण आपलीही अवस्था आता हीच होईल कि काय असं वाटायला लागलं होतं. इथं फक्त एक लक्षात ठेवायला हवं कि- जेव्हा एक वृषण दुसऱ्या वृषणापेक्षा जास्तच मोठे वाटत असेल व ते दुखत असेल, तर मात्र लगेच डॉक्टरांना दाखवायला हवं. बाकी दुखत नसणारे व डाव्या वृषणापेक्षा थोडेसे मोठे असणारे उजवे वृषण हे नॉर्मल असते, त्यात घाबरायची गरज नसते.
अनेक मुलांना आपले शिश्न इतरांपेक्षा छोटे तर नाही ना, जास्त काळे तर नाही ना? असेही प्रश्न मनात असतात, पण त्यांची उत्तरेही कुठे मिळत नाहीत.
तसेच मुलींमध्ये 'आपली योनी आणि योनीच्या सभोवताली असलेली जागा काळी का?' यावरून प्रचंड न्यूनगंड असतो. 'आपण बाकी सगळ्या शरीराची एवढी काळजी घेतो, आपलं बाकी शरीर इतकं सुंदर व गोरेपान आहे, मग फक्त योनीच्याच जागेजवळ एवढं काळं का?' हा प्रश्न त्यांना सतत सतावत असतो. त्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम किंवा सौंदर्य प्रसाधने वापरून पाहिली जातात, पण तरी काहीच फरक पडत नाही. कुणाला याविषयी सांगायची व विचारायची सुद्धा लाज वाटत असते. त्यामुळे 'सर्वांच्याच योनी, लिंग व त्यांच्या भोवतालची जागा काळीच असते' या सत्यापासून अनभिज्ञ असणारे अनेक मुलं-मुली या भितीत व न्यूनगंडात अनेक दिवस घालवत असतात. मुलींना तर आधीच आपली योनी पाहणं म्हणजे मोठं दिव्य करावं लागण्याइतपत अवघड गोष्ट असते. त्यात तिच्याविषयी आधीपासूनच नकारात्मक भावना भरवलेल्या असतात आणि त्यातून तिचा हा न आवडणारा काळा रंग. त्यामुळे त्यांची अधिकच नकारात्मक भावना होत असते.
स्त्री-पुरुषांच्या लैंगिक अवयवांविषयी माहिती देणारा माझा लेख ( *पर्व 3 मधील भाग 5- स्त्री पुरुषांचे लैंगिक अवयव*) वाचल्यानंतर काही स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी यांनी 'आत्तापर्यंत त्यांच्या मनात असणारे असे अनेक गैरसमज दूर झाले व मनातील मोठी भिती आणि न्यूनगंड दूर झाले' असे कळवले. अर्थात ज्यांनी कळवलं, ते फक्त प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या अनेकांच्या मनातील भावना आहेत, पण सगळेच हे मोकळेपणाने मान्य करू शकत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत हे वास्तव आहे.
पुढे जाऊन जेव्हा वयाच्या एका टप्प्यावर काही मुले मुली वेगवेगळ्या क्लिप्स किंवा प्रणयाच्या गोष्टी असणारी पुस्तके वाचायला लागतात, तेव्हा तर हे गैरसमज आणखीच वाढत जातात. लांबच लांब शिश्न असणारे पुरूष, त्यांच्या त्या शिश्नाच्या लांबीमुळे अधिक एक्साईट होताना दाखवलेल्या त्या स्त्रिया, गोरे गोरे शिश्न व तितकीच गोरी आणि सुंदर दिसणारी योनी, दोघांच्या लिंग-योनीच्या, वृषणाच्या किंवा जघनमार्गावर कुठेच आसपास केस किंवा काळसरपणा यांचा अजिबात मागमूस सुद्धा नाही, या सगळ्या गोष्टी पुन्हा मुला-मुलींना अधिक न्यूनगंड देणाऱ्या, गैरसमज पसरवणाऱ्या व वेगवेगळ्या प्रयोगांसाठी उत्तेजित करणाऱ्या ठरतात.
जर योग्य वेळीच या सर्व बेसिक गोष्टींविषयी व्यवस्थित व शास्त्रशुद्ध माहिती मिळाली, तर कित्येक मुला-मुलींचे तारुण्य या न्यूनगंडात, गैरसमजात व चुकीच्या प्रयोगांत आणि भितीत जाण्यापासून वाचू शकेल. आपल्याच शरीराच्या अवयवांविषयी केवढे गूढ आणि अज्ञान घेऊन आपण जगत आहोत याचा गंभीरपणे विचार करायला हवा. आता तरी आपल्या लैंगिक अवयवांविषयी आदर बाळगून, त्याविषयी शास्त्रीय माहिती घेऊन, आपल्या मुलां-मुलींशी, मित्र-मैत्रिणींशी याविषयी संवाद करायला सुरू करूयात. किमान इथून पुढच्या पिढ्यांना तरी या भिती, अज्ञान, गैरसमज व न्यूनगंडापासून दूर ठेवुयात.
- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव वरील नंबर वर व्हाट्सअप्प द्वारे नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा