पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 6)- लैंगिक अवयवांविषयीचे संस्कार

आपल्या लैंगिक अवयवांविषयीची काही बेसिक माहिती आपण मागच्या लेखात पाहिली. या अवयवांविषयी आपल्या समाजात कधीही मोकळेपणाने बोलले जात नाही, त्यामुळे त्याविषयीचे अनेक गूढ, कुतूहल आणि गैरसमज आपल्या मनात अनेक दिवस असतात. पुढे कधीतरी याविषयी शास्त्रीय माहिती कुणाकडून किंवा कुठून मिळाली तर बरं, नाहीतर शेवटपर्यंत हेच गैरसमज घेऊन आपण मोठे होतो आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा याच गैरसमजासह वाढवतो. जर वेळीच या लैंगिक अवयवांविषयी मोकळेपणाने बोललं गेलं तर पुढचे अनेक गैरसमज व चुकीचे संस्कार थांबू शकतात.
अगदी लहान वयापासूनच पुरुषांना व स्त्रियांना म्हणजे मुला-मुलींना एकमेकांच्या लैंगिक अवयवांविषयी कुतूहल असते. 'मुलांचे शिश्न' आणि 'मुलींची योनी ' हे अवयव सोडले तर बाकी सर्व अवयव लहानपणी मुलांना सारखेच दिसत असतात; त्यामुळे याच अवयवांविषयी त्यांच्या मनात खास कुतूहल राहणे साहजिक असते. जसे लहान मुलं त्यांना पहिल्यांदाच दिसणारी प्रत्येक गोष्ट चाचपून बघण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतात, अगदी तसंच याबाबतीतही होत असतं. पण याबाबत पालक व आजूबाजूच्या नातेवाईकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद, वागणूक ही त्यांना खूप गोंधळात टाकणारी असते. मुलांनी अगदी स्वतःच्या शिश्न किंवा योनीला जरी हात लावला तरी पालक त्यांना त्यावरून ओरडत व हातावर फटके देत "छी, गंदा, घाणेरडा, घाणेरडी" असं म्हणत असतात. यातून त्यांना नेमकं कळत नसतं कि असं काय वेगळं मी केलं कि त्यामुळे एवढा ओरडा किंवा फटका खावा लागला? शिवाय याचवेळी हा अवयव म्हणजे 'घाणेरडी जागा' आहे असं त्यांच्या मनात बसत जातं व इथूनच सगळं चुकायला सुरुवात होते.
इथं सगळ्यात पहिलं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे कि लहान मुलांना जसं पाण्याच्या नळाविषयी 'यातून पाणी कसं येतं?' अशा प्रकारचे कुतूहल असतं; अगदी तसंच आपल्या या शिश्न किंवा योनीच्या जागेतून जेव्हा शू बाहेर पडते, तेव्हा त्यांना त्याविषयी अधिक कुतूहल वाटायला लागते. इथून असं कसं पाणी बाहेर येतं? म्हणून देखील ते अनेकदा शिश्न किंवा योनीला हात लावत असतात. शी करत असताना सुद्धा अनेकदा लहान बाळं त्याकडे वाकून वाकून बघत त्याचे निरीक्षण करत असतात. हेसुद्धा याच कुतुहलातून येत असते. त्यात जेव्हा लहान मुलगा व मुलगी एकमेकांचे शिश्न व योनी पाहतात, तेव्हा आपली शू ची जागा व याची/हिची शू ची जागा वेगळी कशी? याचं त्यांना अजून कुतूहल वाटते. त्यावेळी त्यांना आपल्या शिश्न/योनी सोबतच समोरच्याच्या योनी/शिश्नाला सुद्धा हात लावून बघण्याची जिज्ञासा वाढते. शिवाय आपले शिश्न किंवा योनी घरातील इतर सर्व माणसे बघतात, पण त्यांचे आपल्याला कधीच दाखवत नाहीत हेसुद्धा मुला/मुलींना जाणवत जाते. अगदी आईच्या ज्या स्तनांतून (मुलांना शिकवकेल्या भाषेत 'माम माम' मधून) आपण दूध पीत होतो, अचानक तेसुद्धा आपल्यापासून लपवले जाते. शिवाय असे माम माम फक्त आईलाच का आहे? बाबा ला का नाही? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. मग अशा वेळी त्यांना आपल्या आई-वडील किंवा घरातील इतरांचे सुद्धा स्तन, शिश्न/योनी, गुदद्वार पहायचे असते. त्याकरता ते अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने आटा-पिटा करतात आणि मग अनेकदा फटके सुद्धा खातात.

खरंतर या सगळ्या जिज्ञासा, कुतूहल हे खूप सहज, नैसर्गिक व मुलांना या जगाची ओळख करून देणारे असते. याचवेळी जर आपण त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना याविषयी अधिक माहिती स्वतःहून दिली तर त्यांना हे समजून घ्यायला अधिक मदत होते. आपण जर त्यांच्या जागेवर जाऊन त्यांच्या मानसिकतेतून विचार केला तर आपल्याला या गोष्टी किती सहज व त्यांच्यासाठी किती महत्वाच्या आहेत हे लक्षात येईल. खरंतर मुलांमध्ये असे कुतूहल जेव्हा जागे होईल तेव्हाच त्यांना या शी, शू च्या जागा, आईच्या दूध येण्याची जागा, त्यांची नावे, त्यांची कामे व मुला-मुलींमध्ये असणारे हे वेगवेगळे अवयव यांविषयी त्यांच्याशी त्यांना समजेल अशा भाषेत बोलत राहायला हवं. कधीकधी मुलांनी स्वतःहून नाही विचारलं तरीही पालकांनी स्वतःहून याविषयी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना ही माहिती द्यायला हवी. याच्या पुढे जाऊन शक्य असेल तर आई-वडिलांनी लहान मुला-मुलींसोबत एकत्र अंघोळ करावी व त्यांना आपले शरीर मनसोक्त पाहून द्यावे व त्याविषयी माहिती पण सांगावी. ज्यांना हे शक्य होणार नसेल त्यांनी त्यासाठी चित्रांचा वापर करून शरीराच्या या सर्व अवयवांविषयी माहिती सांगावी. आणि त्यानंतर आपले काही विशिष्ट अवयव आपण झाकून ठेवायचे असतात व इतरांना ते दाखवायचे नसतात आणि इतरांचे पहायचे पण नसतात हेसुध्दा त्यांना समजावून सांगायला हवे. यामुळे एकतर त्यांना मिळालेल्या या माहितीमुळे त्यांच्या मनातील कुतूहल कमी होते व त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळत जातात. शिवाय या अवयवांविषयी त्यांच्या मनात तिरस्काराची किंवा घाणेरडी भावना सुद्धा येत नाही आणि आपण याविषयी काही प्रश्न आपल्या मनात आले तर आई-बाबांशी बोलू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात तयार होतो.
पण अर्थातच यासाठी आधी पालकांना स्वतःवर काम करावं लागेल. आपली स्वतःची माहिती व दृष्टिकोन स्पष्ट असेल तरच हे काम निःसंकोचपणे करता येऊ शकते. नाहीतर पुन्हा यातून आपल्याकडूनच मुलांकडे चुकीची माहिती किंवा चुकीचा दृष्टिकोन जाण्याची पण शक्यता आहेच.
या वयात केले गेलेले हे लैंगिक अवयवांविषयीचे कळत नकळत चे संस्कार पुढे आयुष्यभर तसेच राहतात आणि त्यातून मुला/मुलींना पुढे अनेक मानसिक कुचंबना, गोंधळ व गैरसमजांना सामोरे जावे लागते.
लहानपणीच योग्य माहिती न मिळाल्याने व तसे वातावरण घरात किंवा आजूबाजूला नसल्याने लैंगिक अवयवांविषयी झालेले अनेक गैरसमज आपण पुढे पाहणारच आहोत.

एकूण काय तर, या जगात नव्याने आलेल्या या बाळांना इथे दिसणाऱ्या प्रत्येक नवीन गोष्टीविषयी कुतूहल वाटणे आणि त्याविषयी अधिक जाणून घ्यावेसे वाटणे ही किती नैसर्गिक गोष्ट आहे! खरंतर त्यांच्या जाणून घेण्याच्या या चिकित्सक वृत्तीचा जोपासनीचा हा काळ असतो. ही चिकित्सक वृत्ती जोपासली जायला हवी. या कोवळ्या कळ्या मुक्तपणे फुलून द्यायला हव्यात. त्यांच्याभोवती कुंपण करताना या कळ्याच खुडल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

- सचिन (8424041159)

(आपल्या प्रतिक्रिया, मते, अनुभव व्हाट्सअप्प द्वारे नक्की कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध