शेअरिंग-केअरिंग - 30 - '...पण लक्षात कोण घेतंय?'
स्वतःच्या कल्पनेतून आणि स्वतःच्या मेहनतीने तिने एक संस्था सुरू केली. अतिशय निष्ठेने तिने ती संस्था चालवली आणि नावारूपाला आणली. या प्रवासात तिच्यासोबत अनेक सोबती जोडले गेले. त्यांच्यातील काहीजणांवर विश्वासाने तिने काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेतलं. कामाची पूर्ण मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनीही या संस्थेमार्फत स्वतःची नवीन ओळख तयार केली. पण पुढे जाऊन एक दिवस त्यांनी तिलाच तिच्या स्वतःच्या कंपनीतूनच बहुमताचा वापर करून बाहेर काढले. त्यामुळे ती खचून गेलीय.
तिने स्वतःच्या टॅलेंटवर, हिमतीवर आणि मेहनतीने एका मोठ्या ऍडव्होकेट फर्म मध्ये उच्च पदापर्यंत मजल मारली. अनेक वेगवेगळे रेकॉर्डस् तिच्या नावावर अक्षरशः वकिली जगतात गाजत होते. अनेकजण तिला आयकॉन मानून फॉलो करत होते. तिला दिलेली फर्म ची जबाबदारी सुद्धा ती उत्तमरीत्या पार पाडत होती. अनेक मोठमोठे क्लायंट्स तिने फर्मसोबत जोडले होते व त्यांचा विश्वासही संपादित केलेला होता. एवढे असूनही एक दिवस त्या फर्मचे काही वरीष्ठ अधिकारी तिला मिळणार असणाऱ्या प्रमोशन पासून ठरवून दूर ठेवतात आणि तिच्याकडच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या काढून त्या दुसऱ्या, तिच्यापेक्षा ज्युनिअर व अनुभवाने कमी असलेल्या पुरूष सहकाऱ्याला देतात. याबद्दल तिचं म्हणणं मांडायची संधी सुद्धा तिला दिली जात नाही. त्यामुळे ती दुःखी आहे.
अतिशय जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून तिने कलेक्टरची पोस्ट मिळवलेली असते. तिथे ती खूप मनापासून व प्रामाणिकपणे काम करून तिच्या पदाला न्याय देता येईल यासाठी धडपड करत असते. तिच्या सोबतच्या सर्व सहकाऱ्यांसोबत सुद्धा ती प्रेमाने व आपुलकीनेच वागत असते. तिच्या प्रदेशातील समस्या समजून घेऊन त्यावर उपाय काढण्यासाठी सुद्धा ती प्रामाणिकपणे धडपडत असते. पण तरी तिला तिच्याच ऑफिसमधले सहकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने ती हताश आहे.
खूप जिद्दीने देशासाठी सीमेवर जाऊन लढायचे या एकाच ध्येयाने पछाडून ती खूप मेहनत घेऊन अखेरीस सैन्यामध्ये भरती होते. तिला आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा खूप आनंद होतो. पण तो आनंद फार काळ टिकत नाही, कारण सैन्यांमधल्या स्त्रियांना सीमेवर न पाठवता कॅम्प मध्येच इतर ड्युटी लावल्या जातात हे तिला कळते. ती स्वप्नभंगाने कोलमडून गेलीय.
पत्रकारितेचे पॅशन मनात घेऊनच तिने पत्रकारितेच्या कोर्स मध्ये अव्वल नंबर पटकावला. शहरातील एका चांगल्या न्यूज एजन्सी मध्ये तिची निवड पण झाली. तिचे स्वप्न होते कि 'क्राईम रिपोर्टर बनून त्यातच नाव कमवायचे'. पण तिला जाणूनबुजून क्राईम रिपोर्टरची जबाबदारी न देता इतर सामाजिक किंवा राजकीय विषयावर काम करायला सांगितले जाते. त्यामुळे ती निराश आहे.
ही काही नमुन्यादाखल दिलेली काल्पनिक उदाहरणे आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसत असतात, अनुभवायला मिळत असतात. या सर्व उदाहरणांमध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाचे, उदासिनतेचे, नैराश्याचे कारण हे त्यांच्या वाट्याला आलेल्या अवहेलना, डावलणे, संधी नाकारणे या सगळ्यातून आलेले आहे व या सगळ्यामागे फक्त एकच कारण आहे ते म्हणजे- *त्या 'स्त्रिया' आहेत.*
ती स्त्री आहे म्हणजे ती एखादी कंपनी किंवा फर्म व्यवस्थित चालवू शकत नाही, ती स्त्री आहे म्हटल्यावर ती संसारातच गुरफटलेली राहणार. सतत मुलांच्या परिक्षा, त्यांच्या शाळेतील पालक मिटिंग, मुलांचे कॉम्पिटिशन, आजारपणं, घरातील इतर अनेक तक्रारी व यातले काहीच नसेल तर यांच्या दर महिन्याच्या ठरलेल्या तक्रारी. यामुळे त्या जबाबदारीची पदे व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत ही मानसिकता. एक स्त्री असून ती इथल्या पुरुषांवर ऑर्डर सोडते? किंवा स्त्री असून ती आम्हाला प्रामाणिकपणे काम कसं करायचं याचे धडे देते? या बायकांना यातलं काय कळतं? यांनी आपलं घर-कुटुंब, नवरा अन पोरं-बाळं सांभाळायची कामंच करावीत ना, आम्हाला शिकवायला निघतायत? ही मानसिकता. स्त्रिया या कधीच अंगमेहनातीचे काम करूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांना हलकी, बायकांचीच कामं द्यायची. लढाई करणे वगैरे स्त्रियांचे काम नाही, उगाच कशाला तिथे अजून ओझं? ही मानसिकता. गुन्हेगारीच्या क्षेत्रात बाईमाणसाने न पडलेलंच बरं. बायकांना झेपणारेत का ते खून, बलात्कार, गलिच्छ राजकारण आणि या गुन्हेगारी क्षेत्रातले घाणेरडे धंदे? समोर रक्त पाहून टिकू शकणारेत का या तिथं? शिवाय उलट यांच्याच जिवाला जास्त भिती असणार. त्यापेक्षा त्यांनी यात न पडलेलंच कधीही चांगलं. ही मानसिकता.
बायका अंगमेहनतीची कामं करू शकत नाहीत, ताकदीची कामं करू शकत नाहीत, हिंमतीची कामं करू शकत नाहीत, बॉसिंगची कामं करू शकत नाहीत, धोक्याची कामं करू शकत नाहीत. मग बायका कोणती कामं करू शकतात? तर नाजूक, ज्यात अंगमेहनत नाही अशी, धोका नसणारी, दिवसा उजेडात करू शकू अशी, फार निर्णयक्षमता जिथे लागत नाही अशी आणि जी बायकांचीच म्हणून ठरवून दिली गेलेली आहेत आणि त्यामुळे पुरुष करूच शकत नाहीत, अशीच कामं बायकांनी करायला हवीत- ही मानसिकता.
ही मानसिकता जशी अनेक पुरुषांची आहे, तशीच ती अनेक स्त्रियांची सुद्धा आहे. स्त्री म्हणून एका स्त्रीला अशा संधींपासून नाकारणाऱ्यांत सुद्धा स्त्रिया व पुरुष दोघेही आहेत. तसेच, या कारणांना पुढे करून *'मी स्त्री आहे'* म्हणून मला यातली कामं देऊ नयेत असं म्हणणाऱ्या स्त्रियाही आहेत. खरंतर एकूणच आपल्या समाजाचीच मानसिकता ही अशा प्रकारची झालेली आहे. यामध्ये अनेकदा प्रामाणिकपणे 'स्त्रियांची काळजी' किंवा 'त्यांच्या जीवाची भिती' या भावना सुद्धा असतात हे खरं आहे आणि याला कारण आपल्या समाजातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हे सुद्धा आहे. पण काही अंशी हे कारण जरी योग्य म्हणून मान्य केलं, तरी इतर अनेक ठिकाणी फक्त स्त्री आहे म्हणून डावलले जाण्याचे अनेक अनुभव स्त्रियांना येत असतात हे खेदजनक आहे.
अनेक कंपन्या, संस्था यांमध्ये स्त्रियांना नोकरीवर घेताना त्यांचे लग्न झालंय का, मुलं झालीत का? या गोष्टींची सुद्धा आधी चौकशी करून मगच त्यांचा नोकरीसाठी विचार केला जातो. या गोष्टीमुळे स्त्रियांच्या करिअरवर फार मोठा परिणाम होत असतो. पण हे सगळं लक्षात कोण घेतंय?
यावर सर्वच स्त्री-पुरुषांनी विचार करून हा स्त्री-पुरुष भेदाभेद आपल्या मनातून काढून टाकायला हवा. स्त्रियांनी हाती घेतलेले किंवा तिला दिलेले काम ती खंबीरपणे, हिंमतीने, धाडसाने व प्रामाणिकपणे पूर्ण करू शकते व ताकदीच्या कामात सुद्धा स्वेच्छेने पुढे आलेली स्त्री नक्कीच काम करू शकते हा विश्वास दाखवायला हवा. या सर्वच क्षेत्रात स्त्रियांना संधी द्यायला हवी, त्यात त्या नवीन असतील तर त्यांना त्यासाठी तसे प्रशिक्षण देऊन काही प्रमाणात चुकण्याची सुद्धा संधी द्यायला हवी. स्त्रियांना फक्त कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता त्याही एक निर्णयक्षम, जबाबदार अधिकारी होऊ शकतात हे आता मान्य करायला हवे आणि आपला पुरुषी अहंकार बाजूला ठेवून त्यांना स्विकारायला हवे. घरातून, कुटुंबातून व समाजातून सुद्धा स्त्रियांच्या करिअरच्या दृष्टीने विचार केला जायला हवा. स्त्रियांचे करिअर हे फक्त 'स्टेपणी' न समजता ते त्यांच्या अस्मितेचे प्रतिक आहे, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा सन्मानाने आणि तेवढ्याच प्राधान्याने पाहायला हवे.
चला तर मग. या पुरुषप्रधान व्यवस्थेने घालून दिलेल्या बंदिस्त चाकोऱ्या मोडून काढायचे प्रयत्न सर्वांनी मिळून करूयात. आणि याची सुरूवात स्वतःपासून व स्वतःच्या कुटुंबातील व ऑफिस मधील स्त्रियांपासून करूयात.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा