पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 5) - स्त्री-पुरुषांचे लैंगिक अवयव

आपण आपल्या शरीराच्या इतर सर्व अवयवांविषयी अनेकदा बोलतो. मोकळेपणाने एकमेकांशी शेअर करतो. पण आपल्या लैंगिक अवयवांविषयी मात्र कधीच बोलत नाही आणि त्यामुळेच त्यांविषयी आपली आपल्यालाच खूप कमी माहिती असते. त्याविषयीची शेअरिंग सुद्धा कधी आपापसांत फार होताना दिसत नाही. म्हणूनच आज जरा आपल्या या लैंगिक अवयवांविषयी बोलूयात. तसेच स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक अवयवांमध्ये काही प्रमाणात साम्य आणि बऱ्याच बाबतीत फरक असतो. तो नेमका काय आणि कसा ते सुद्धा जाणून घेऊयात.
स्त्रीच्या लैंगिक अवयवाला 'योनी' व पुरुषाच्या लैंगिक अवयवाला 'लिंग' म्हणतात हे आपल्या सर्वांना आत्तापर्यंत माहिती आहे. पण खरेतर 'योनी' व 'लिंग' हे शब्द फक्त आपल्या बोलण्याच्या सोयीसाठी वापरलेले असावेत असं वाटतं. कारण फक्त 'योनी' म्हणजे स्त्रीचे लैंगिक अवयव नसून योनी हा स्त्रीच्या अनेक लैंगिक अवयवांपैकी एक आहे.
अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल कि स्त्रियांमध्ये योनीमार्ग व मूत्रमार्ग हे सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणजे लैंगिक संबंधाच्या वेळी पुरुषाचे लिंग आत जाण्याची जागा, मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव होण्याची जागा आणि बाळ बाहेर येण्याची जागा असं सगळं जिथून होतं, तो योनीमार्ग हा मूत्र बाहेर येणाऱ्या मार्गापेक्षा वेगळा असतो. एका मार्गाला योनीमार्ग म्हणजेच इंग्रजीत 'व्हजायना' असे म्हणतात तर दुसऱ्या मार्गाला मूत्रमार्ग म्हणजे इंग्रजीत 'युरेथ्रा' असे म्हणतात. अनेकांना स्त्रीच्या लैंगिक अवयवांमध्ये अशा दोन वेगवेगळ्या जागा असतात हे माहीतच नसते. विशेष म्हणजे अनेक स्त्रियांना सुद्धा याविषयी माहिती नसते. पुरुषांमध्ये मात्र हे दोन्ही मार्ग एकत्रच असतात. मूत्रमार्गातूनच पुरुषाचे वीर्य सुद्धा बाहेर येत असते. म्हणजे पुरुषांच्या लैंगिक अवयवामध्ये एकच पोकळी (ट्यूब) असते. त्याचमुळे कधीकधी पुरुषांच्या लघवीसोबत थोडे वीर्य सुद्धा बाहेर येऊ शकते/येते. हे खरंतर अगदी सामान्य असते. पण याविषयी बऱ्याच गैरसमजुती समाजात असल्याने तरूण किंवा किशोरवयीन मुलं आणि कधीकधी प्रौढ पुरुष सुद्धा घाबरून जातात. "पांढरा धातू लघवीतून जायला लागलाय. मग आता कमजोरी येणार, पुढे मुलं व्हायला अडचणी येणार" वगैरे गैरसमज कुणीतरी पसरवतात आणि त्यामुळे निष्कारण अनेकजण घाबरून जातात. असे अनेक गैरसमज आणि त्यातून अनेक गावठी व बंगाली बाबांचे उपचार आणि त्यातून होणारी फसवणूक हा एक मोठा मुद्दा आहे. त्यावर सुद्धा पुढे आपण स्वतंत्रपणे बोलूच.
लैंगिक अवयवांबाबत अधिक जाणून घ्यायचं, तर मी मागे व्हर्जिनिटीच्या पहिल्या लेखात म्हटलं तसं इथं बरेच लहान मोठे भाग आहेत. त्या प्रत्येकाचे काम स्वतंत्र असले तरी एकमेकांशी संलग्न आहे. यातील लैंगिक संबंधांशी संबंधित असणाऱ्या काही बाह्य भागांबाबत आपण आज पाहुयात.
स्त्रीच्या सर्व लैंगिक अवयवांना एकत्रितपणे इंग्रजीत व्हल्वा (Vulva) असे म्हणतात. या व्हल्वामध्ये बृहतभगोष्ट (Outer Labia), लघुभगोष्ट (Inner labia), शिश्निका म्हणजेच क्लीटोरिस (clitoris), मूत्रमार्ग म्हणजेच युरेथ्रा (Urethra) व योनी म्हणजेच व्हजायना (Vagina) असे मुख्य भाग असतात.
स्त्रीच्या लैंगिक अवयवाच्या म्हणजे व्हल्वाच्या बाहेरच्या बाजूला 'मिटलेल्या जाडसर ओठा'सारखा जो भाग असतो त्याला बृहत भगोष्ट म्हणतात. हा भाग काळसर असून त्यावर केस असतात व सामान्यतः दोन्ही बाजूंचे पटल (ओठ) मिटलेले असतात. तारुण्यात या पटलांच्या खाली चरबी साठते व हा भाग फुगवटा आल्यासारखा थोडा वर येतो. म्हातारपणात ही चरबी कमी झाल्याने बृहतभगोष्ट सैल पडल्यासारखे दिसते. बृहतभगोष्टला हाताने, बोटांनी हळुवार स्पर्श केल्याने, कुरवळल्याने स्त्रीला उत्तेजना भेटते. बृहतभगोष्टना महाभगोष्ट सुद्धा म्हणतात.
व्हल्वाच्या वरच्या भागास जघनशैल (Pubic Passage/ Mons Pubic) म्हणतात. जघनशैल म्हणजे बृहतभगोष्टच्या वर पोटाच्या बाजूला असलेली जागा. ज्यावर भरपूर केस असतात. ही जागा सुद्धा सेन्सेटिव्ह असते व समागमाच्या आधी प्रणय करताना या जागेला स्पर्श केल्याने, हळुवार कुरवळल्याने स्त्रियांना उत्तेजित व्हायला मदत होते.
बृहतभगोष्ट बोटांनी बाजूला केले कि त्याच्या आतल्या बाजूला दिसतात ते लघुभगोष्ट. हे थोडेसे लहान व ओलसर असून यावर केस नसतात. हा सुद्धा स्त्रियांचा सेन्सेटिव्ह भाग असतो. लघुभगोष्टचे वरचे टोक जिथे संपते तिथे असते ती 'शिश्निका'. शिश्निकेच्या वर असते शिश्निकामुंड (Clitoris Hood). शिश्निका हा स्त्रियांना सर्वांत जास्त कामोत्तेजना देणारा भाग आहे. शिश्निकामुंड सुद्धा पुरुषांच्या शिश्नमुंडासारखेच कामउत्तेजना देणारे असते.
लघुभगोष्ट बोटांनी बाजूला केल्यावर शिश्निकेच्या खाली अगदी छोटेसे छिद्र असते ज्याला मूत्रमार्ग म्हणतात. त्याच्या खाली जे छिद्र असते ते म्हणजे योनीमार्ग. योनीमार्गाच्या तोंडाशी असते ते योनिपटल म्हणजेच हायमेन (ज्याविषयी आपण मागच्या दोन लेखांत पाहिले आहे). योनीमार्ग म्हणजे नळीसारखी दिसणारी मोकळी पोकळी नसून योनीमार्ग हा हवा काढलेल्या फुग्यासारखा एकमेकांना चिकटून असणारा त्वचेचा भाग असतो. तो गरजेनुसार ताणला जातो आणि पुन्हा जागेवर येतो. काही मासिक पाळीच्या कॅप लावल्याने आणि बाळंतपणानंतर हा मार्ग काही प्रमाणात रुंदावला जातो. मूत्रमार्ग व योनीमार्ग या दोन्ही भागांमध्ये लैंगिक उत्तेजना देणारे घटक नसतात. योनीच्या साधारण एक इंच आतपर्यंत स्त्रियांना स्पर्शसंवेदना असतात, त्यानंतर फारशा संवेदना जाणवत नाहीत. काही स्त्रियांच्या बाबतीत योनीच्या थोडं आतमध्ये वरच्या बाजूला घेवड्याच्या आकाराएवढी कामसंवेदनशील जागा असते, जिला 'जी-स्पॉट' म्हणतात. हे सर्वच स्त्रियांमध्ये जाणवेलच असे नाही. त्याविषयी अधिक माहिती आपण नंतर पुढे पाहूच. स्त्रियांच्या मूत्रमार्गाची लांबी अतिशय लहान असल्याने त्यातून जंतुसंसर्ग लवकर होण्याची शक्यता असते.
पुरुषांच्या लैंगिक अवयवाला सुद्धा आपण 'लिंग' म्हणत असलो तरी इथेही प्रत्यक्षात वेगवेगळे अवयव असतात. पुरुषांचे कामउद्दीपन, संभोग व मूत्रमार्ग अशा तिन्ही गोष्टींसाठी एकच इंद्रिय वापरले जाते ते म्हणजे शिश्न म्हणजेच पेनिस (Penis). शिश्नाबरोबरच पुरुषांमध्ये वृषण म्हणजेच टेस्टीस (Testis) सुद्धा असतात व स्त्रियांप्रमाणेच जघनशैल सुद्धा असते. तसेच शिश्नामध्ये सुद्धा पुढच्या टोकाला असते ते 'शिश्नमुंड' व लांब दांडीसारखे असते ते 'शिश्नदंड' आणि शिश्नमुंडावरील त्वचा हाताने मागे घेतल्यावर त्वचेची एक घडी शिश्नमुंडाला घट्ट चिकटलेली असते ते 'शिश्नबंध' असे भाग असतात. शिश्नमुंड व शिश्नबंध हे पुरुषांचे अधिक काम उत्तेजक भाग आहेत. पुरुषांचे शिश्न हे इतरवेळी सैल असते व जेव्हा कामेच्छा उत्पन्न होते तेव्हा त्यात ताठरता येते. कधीकधी कामेच्छा नसताना सुद्धा अचानक शिश्नाला ताठरता येते/येऊ शकते. तेसुद्धा स्वाभाविक असते; पण त्यामुळे अनेकदा पुरुषांची गोची होते व हे चुकून कुणाच्या निदर्शनास आलेच तर त्यातून गैरसमज पण होतात. शिश्नाची लांबी-रुंदी व त्याविषयीचे अनेक समज गैरसमज हा एक विस्तृत विषय असल्याने त्याविषयी वेगळे सविस्तर बोलूयात. शिश्नाखाली पिशवीसारखे लोंबणारे वृषणकोश असतात. त्यात दोन वृषण असतात. यातील डावा वृषण हा उजव्या वृषणापेक्षा अधिक खाली लोंबकळत असतो. उन्हाळ्यात वृषणकोश सैल झाल्याने वृषण शरीरापासून अधिक लांब जातात, तर थंडीत वृषणकोश आकुंचन पावल्याने वृषण अधिक जवळ येतात. याविषयी सुद्धा अनेक गैरसमज समाजात असतात. पुरुषांना जघनशैल म्हणजे शिश्नाच्या वरच्या भागावर, वृषणकोशावर व शिश्नाच्या सभोवताली केस असतात; पण शिश्नदंडावर मात्र केस नसतात. हा सर्व भाग काळसर रंगाचा असतो. शिश्नमुंडाच्या वरची त्वचा मागे करून शिश्नबंधाच्या भोवतालची जागा स्वच्छ ठेवली नाही, तर तिथे पांढरट-पिवळ्या रंगाचा शिश्नमल तयार होतो.
स्त्रियांच्या व पुरुषांच्या लैंगिक अवयवांबाबत तुलनात्मक पद्धतीने सांगायचे झाले तर- स्त्रियांचे बृहतभगोष्ट व पुरुषांचे वृषण यांच्यामध्ये सारख्याच प्रकारच्या कामउत्तेजना असतात. स्त्रियांचे लघुभगोष्ट व पुरुषांचे शिश्नदंड, स्त्रियांचा 'योनीमार्ग' व पुरुषांची 'गुदद्वार आणि वृषण यांच्या मधली जागा', स्त्रियांची शिश्निका व पुरुषांचे शिश्नमुंड आणि स्त्रियांचे शिश्निकामुंड व पुरुषांचे शिश्नबंध अशी साधारण तुलना काम उत्तेजनेच्या बाबतीत करता येईल. अर्थात ही ढोबळमानाने केलेली तुलना आहे. 
या लेखातून किमान स्त्री व पुरुषांच्या आणि खरंतर आपापल्या स्वतःच्या जननेंद्रियांविषयी साधारण काही बेसिक माहिती मिळाली आणि त्यामुळे आपल्याच या दुर्लक्षित पण महत्वाच्या अवयवांकडे अधिक डोळसपणे पाहता आले तरी खूप झाले.
या सर्व इंद्रियांविषयी अधिक विस्तृतपणे माहिती हवी असल्यास त्याविषयी शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके व वेबसाईट वाचता येतील. डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या 'निरामय कामजीवन' मध्ये सुद्धा याविषयी बरीच माहिती दिलेली आहे.
आपल्या पुढच्या लेखांमध्ये सुद्धा विषयाच्या अनुषंगाने यातल्या काही भागांविषयी अधिक माहिती घेत राहू.

- सचिन (8424041159)
ईमेल: srthite@yahoo.co.in

(आपल्या प्रतिक्रिया, मते, अनुभव वरील नंबर वर व्हाट्सअप्प करून किंवा मेलद्वारे नक्की कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध