पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही (भाग 4)- व्हर्जिनिटी (कौमार्य)- 2
मागच्या लेखात आपण व्हर्जिनिटी विषयी समाजात असलेला दुराग्रह आणि किळसवाण्या प्रथा पाहिल्या व सोबतच स्त्रीच्या योनीमार्गातील हायमेनच्या पडद्याविषयी थोडक्यात समजून घेतलं. आज आपण हायमेन आणि व्हर्जिनिटी याविषयी थोडं अधिक विस्तारात पाहुयात.
मागच्या लेखासोबत असलेल्या चित्रातील आकृत्यांमध्ये आपण हायमेनच्या पडद्याचे वेगवेगळे आकार व स्वरूप पाहिले. म्हणजेच सर्वच स्त्रियांच्या हायमेनची रचना सारखी नसून प्रत्येक स्त्रीमध्ये याबाबतीत वेगळेपण असू शकते हे आपल्या लक्षात आले असेल. तसेच काही वेळा तर शेवटच्या आकृतीत (मागच्या लेखातील) दाखवल्याप्रमाणे काही स्त्रियांच्या योनीमार्गात हा हायमेनचा पडदाच नसतो किंवा अगदीच नगण्य असतो. शिवाय जरी हायमेनचा पडदा असला तरी तो पहिल्या सेक्सच्या वेळी नेहमी फाटतोच असे नाही तर अनेकदा ताणला सुद्धा जाऊ शकतो आणि त्यामुळे रक्त निघण्याची शक्यता नसते. त्यामुळे इथे हे सर्वप्रथम प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे कि- 'हायमेन ब्रेक होणे' म्हणजे प्रत्येक वेळी शब्दशः 'पडदा फाटणे' असा अर्थ होत नाही. अनेकदा हायमेनचा हा त्वचेचा पडदा फक्त ताणला जातो. ज्यामुळे आधी असलेले छिद्र अजून मोठे होते. त्यामुळे अनेक स्त्रियांमध्ये पहिल्या सेक्सच्या वेळी 'हायमेन ब्रेक होणे' किंवा 'योनीमार्गातून रक्त येणे' असा काही प्रकार होत नाही. मग अशा वेळी या आधारावर व्हर्जिनिटी किंवा कौमार्य तपासणी करणे शक्यच नसते. शिवाय हे ताणले जाणे किंवा काही वेळा फाटणे हे फक्त सेक्समुळेच होते असे नाही; तर त्यासाठी इतर अनेक कारणे असू शकतात. जसे कि घोडसवारी, बाईक रायडिंग, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, हस्तमैथुन किंवा इतर काही खेळाच्या प्रकारांमध्ये सुद्धा हे ताणले किंवा फाटले जाऊ शकते. शिवाय यामुळे होणारा रक्तस्त्राव हा सुद्धा प्रत्येक स्रीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतो. काही स्त्रियांना अगदीच कमी, तर काही स्त्रियांना जास्त प्रमाणात किंवा काही स्त्रियांना अजिबात रक्तस्त्राव न होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रक्तस्त्राव आणि हायमेन ब्रेक किंवा स्ट्रेच यांचा बहुतांश वेळा काहीच संबंध नसतो. या लेखाच्या सोबत जोडलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे जर हायमेनचा पडदा हा अगदीच योनीचा पूर्ण किंवा जवळपास बहुतांश मार्ग झाकणारा असेल किंवा योनीच्या मधोमध हायमेनचा पडदा आल्याने योनीच्या मुखाशी दोन योनीमार्ग तयार होत असतील आणि त्याचा त्रास होत असेल तर अशा सर्व परिस्थितीत छोटीशी सर्जरी करून हा त्रास दूर करता येऊ शकतो.
याव्यतिरिक्त इतर प्रकारामध्ये हायमेनचा काहीही त्रासही होत नाही आणि अनेकदा हायमेन स्वतः स्त्रियांना सुद्धा जाणवत नाही. चित्रांमध्ये आपल्याला समजावं म्हणून इतकं स्पष्ट दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र असं योनीमार्गात पाहून हे हायमेन आपल्याला दिसत नाही किंवा हाताने, बोटाने तपासून ते कळत सुद्धा नाही. म्हणूनच अशी 'हायमेन ब्रेक झालंय का?' किंवा 'व्हर्जिनिटी ब्रेक झालीय का?' असं तपासायची कोणतीही तपासणी सुद्धा नसते. म्हणजेच 'परदा दिखाओ, तो मानूंगा' असं म्हणायला जागाच नसते. त्यामुळे अशा 'परदा प्रेमीं'ची निराशाच होण्याची शक्यता इथं जास्त आहे.
खरंतर व्हर्जिनिटी याला कोणताही वैद्यकीय किंवा जीवशास्त्रीय आधार नाही. तसेच हायमेनचा सुद्धा कोणताही उपयोग अजूनपर्यंत सिद्ध झालेला नाही. त्यामुळे हायमेन असलं काय, नसलं काय किंवा हायमेन ताणलेले असणं काय, याचा काहीही फायदा किंवा तोटा असत नाही. त्यामुळेच व्हर्जिनिटी किंवा हायमेन ब्रेक किंवा स्ट्रेच होणे यांना कसलंही वैद्यकीय आणि जीवशास्त्रीय महत्त्व नसल्याने, फक्त काही चुकीच्या सामाजिक पायंडा किंवा चुकीच्या मानसिकतेपायी असल्या गोष्टींना अवास्तव महत्व देणे बंद करायला हवे. एकूणच समाजाने व खासकरून मुलाकडच्यांनी असल्या खुळचट कल्पनांमध्ये न अडकता यातून बाहेर पडणे गरजेचे आहे.
व्हर्जिनिटीच्या अशा अवास्तव आग्रहाला बळी पडून काही मुली लग्नाच्या काही दिवस आधी हायमेनोप्लास्टी नावाची सर्जरी करून घेतात. पण त्यानंतर सुद्धा पहिल्या सेक्सच्या वेळी ब्लिडिंग (रक्तस्राव) होणे याची पूर्ण खात्री नसते. त्याची कारणे आपण आधी पाहिलीच आहेत. समाजातील प्रथा आणि दुराग्रहामुळे मुलींना व त्यांच्या पालकांना असा निर्णय घ्यावा लागतो. पण खरंतर व्हर्जिनिटीचा आग्रह धरणे हा जसा मूर्खपणा आहे, तसे या आग्रहाला बळी पडून फक्त स्वतःची व्हर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी हायमेनोप्लास्टी करणे हासुद्धा मूर्खपणा, खोटेपणा आणि फसवणूक आहे. व्हर्जिनिटी बद्दलचा दुराग्रह थांबला तर असे प्रकार पण थांबतील.
व्हर्जिनिटी व हायमेन बद्दल आपण समजून घेतलंच. त्याचवेळी हेही लक्षात घेऊयात कि जरी पहिल्या सेक्सच्या वेळी 'रक्त येणे' हे बहुतांश महिलांच्या बाबतीत घडत नसले, तरी पहिल्या सेक्सच्या वेळी 'त्रास होणे' हे मात्र बहुतांश महिलांच्या बाबतीत होऊ शकते. अर्थात त्याचे कारण फक्त हायमेनच असते असं नाही, तर इतरही अनेक कारणे असतात. तेही आपण पुढे 'पहिल्या सेक्स' बद्दल बोलू तेव्हा पाहणार आहोतच. पण इथेही सर्वच स्त्रियांना पहिल्या सेक्सच्या वेळी त्रास होईलच असेही काही नसते हेही लक्षात ठेवावे. नाहीतर एक चुकीचा विचार सोडून दुसरा चुकीचा विचार कुणी मनात बाळगून बसायला नको.
शेवटी, लग्नाआधी सेक्स केलेला असणं किंवा नसणं हा खरंच इतका महत्वाचा मुद्दा आहे का? मुलांनी सेक्स केला तरी बिघडत नाही, मात्र मुलींनी केल्यावर एवढा कांगावा करायची खरंच गरज आहे का? दुसऱ्या लग्नाच्या वेळी हा मुद्दा फारसा महत्वाचा नसतो, तर मग पहिल्या लग्नाच्या वेळी त्याला एवढं महत्त्व देणं गरजेचं आहे का? या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा विचार व्हायला हवा.
- सचिन (8424041159)
(ईमेल: srthite@yahoo.co.in)
(आपल्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव किंवा काही शेअरिंग करायचं असेल तर या नंबर वर व्हाट्सअप्प करू शकता किंवा ईमेल वर ही पाठवू शकता.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा