पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 3 - व्हर्जिनिटी (कौमार्य)- 1

'लग्नासाठी व्हर्जिन मुलगी हवी' अशी अपेक्षा उद्या लग्नासाठीच्या एखाद्या जाहिरातीत कुणी लिहिलेली दिसली तर त्यात फार काही विशेष वाटू नये इतका या व्हर्जिनिटी बद्दल समाजात दुराग्रह असताना दिसतो. बहुतेक मुलांना व्हर्जिनच मुलगी हवी असते. असे भरपूर मुलं आपण पाहतो कि ज्यांचे स्वतःचे भरपूर मुलींसोबत किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत अनेकदा लैंगिक संबंध आलेले असतात, पण तरीही त्यांना लग्नासाठी मुलगी मात्र व्हर्जिनच (यांच्या भाषेत -फर्स्ट हँड मालच) हवी असते. बरं ही अवस्था फक्त अशिक्षित, अडाणी मुलांचीच असते असे नाही, तर अगदी शिकले-सवरलेल्या व स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या सो कॉल्ड सुशिक्षित, प्रतिष्ठित कुटुंबाची सुद्धा हीच अवस्था असते. आजकाल काही मुलं तर स्पष्टपणे (कि निर्लज्जपणे?) स्वतःच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षांमध्ये 'व्हर्जिन मुलगी' हा क्रायटेरिया सांगतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते.

लग्नासाठी जोडीदार शोधताना बऱ्याचदा मुलींना मुलांकडून विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे- याआधी कुणासोबत रिलेशन मध्ये होतीस का? आणि असली तर तुमच्यात सेक्स (लैंगिक संबंध) झाला होता का? - या प्रश्नाच्या उत्तरावरून मग त्या मुलीच्या चारित्र्याबद्दल मत ठरवलं जाणार आणि यावरून हे लोक मुलींना चारित्र्याचे सर्टिफिकेट वाटत फिरणार. बरं समजा एखादी मुलगी असलीच आधी कुणाच्या प्रेमात तर तिने कितीही प्रामाणिकपणे सांगितले कि त्यांच्यात कधीच शारीरिक संबंध आलेले नाहीत तरी तिच्यावर विश्वास न ठेवता 'प्रेम होते म्हणजे यांचं सगळं झालंच असणार' असा विचार करून तिच्यावर परस्परच हे शिक्के मारून ठेवणार. वरून स्वतःच्या मनानेच बनवलेल्या या काल्पनिक शिक्क्यांच्या कथा विना मोबदला समाजकार्य करण्याच्या भावनेतून अधिक रंगवून, मीठ-मसाले लावून इतरत्र पसरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेणार. असल्या महाभागांच्या अक्कलेची आणि यांच्या वैचारिक दारिद्र्याची कीव करावी तेवढी थोडीच आहे. शिवाय यांच्या मते हा प्रश्न फक्त मुलींसाठीच महत्वाचा ठरतो बरं का. मुलांना 'तुम्ही आधी कुणाच्या प्रेमात होता का किंवा सेक्स केलाय का?' हा प्रश्न गैरलागूच ठरतो. कारण त्याला तसे त्यांच्या दृष्टीने फार काय महत्त्व नसते. म्हणजे - 'असलेच मुलाचे प्रेम आधी कुणावर किंवा लैंगिक संबंध जरी असले आधी कुणाशी, तरी त्याने काही बिघडत नाही. तो आता लग्नाला तयार आहे ना, मग बास. 'पुरुषाच्या जातीला चालतं असलं काही केलं तरी; पण बाईच्या जातीला शोभतो का असला घाणेरडेपणा?' - ही आमच्या समाजाची रीत. आणि त्यामुळे सगळ्या चौकशा आणि सगळे पहारे फक्त स्त्रीच्याच शरीरावर.

बरं आता आपण आधी हे व्हर्जिनिटी म्हणजे नेमके काय? ते पाहुयात. 
स्त्रीचे जननेंद्रिय म्हणजेच योनी ज्याला इंग्रजी मध्ये व्हजायना असे म्हणतात व पुरुषाचे जननेंद्रिय म्हणजेच लिंग ज्याला इंग्रजी मध्ये पेनिस असे म्हणतात.  लैंगिक संबंधांच्या संदर्भात सांगायचे झाले तर योनी म्हणजे स्त्रीच्या समागमाचा/संभोगाचा किंवा सेक्समधील इंटरकोर्स करतानाचा अवयव आणि पेनिस म्हणजे पुरुषाच्या समागमाचा/संभोगाचा किंवा सेक्समधील इंटरकोर्स करतानाचा अवयव होय. आता या दोन्ही अवयवांच्या आतमध्ये व बाहेरच्या बाजूला अशी भरपूर छोट्या छोट्या अवयव किंवा भागांची भली मोठी गर्दी असते, जे एकूणच लैंगिक, प्रजननाच्या व इतर नैसर्गिक क्रियांसाठी आवश्यक असतात. त्यातील फक्त स्त्रीच्या व्हर्जिनिटी किंवा कौमार्य याच्याशी संबंधित असणाऱ्या भागाची माहिती आपण इथं समजून घेऊयात.
स्त्रीच्या योनीमार्गामध्ये आतल्या बाजूला एक पातळ असा त्वचेचा पडदा असतो ज्याला इंग्रजी मध्ये हायमेन असे म्हणतात. हा पडदा प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असतो. वर दिलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हायमेनचा पडदा हा कधी मधोमध एखादे छिद्र असणारा, कधी बाजूने छिद्र असणारा, कधी खालच्या बाजूने जागा असणारा, कधी वरच्या बाजूने जागा असणारा किंवा कधी एकापेक्षा जास्त छिद्रे असणारा असा अनेक प्रकारचा असू शकतो (चित्रातील सर्व आकृती पहा). या पडद्यामुळे मासिक पाळीच्या वेळी स्त्राव बाहेर पडताना काही प्रमाणात अडथळा येत असला तरी पडद्याला असणाऱ्या या छिद्रांमुळे हा स्त्राव बाहेर पडण्यास जागा राहते. कधी कधी अगदीच छिद्र नसेल किंवा खूपच लहान असल्याने स्त्राव बाहेर येण्यास जागा राहत नसेल तर अशावेळी छोटी शस्त्रक्रिया करून हे छिद्र मोठे केले जाते.
आता याचा आणि व्हर्जिनिटीचा संबंध लावणाऱ्या महाभागांचे डोके जरा समजून घेऊ. हा जो हायमेनचा पडदा आहे, तो कधीकधी पहिल्यांदा सेक्स करताना जेव्हा पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमार्गामध्ये प्रवेश करते, तेव्हा ब्रेक होतो म्हणजेच फाटतो आणि त्यामुळे काही प्रमाणात रक्त बाहेर येते किंवा पुरुषाच्या लिंगाला लागते. यालाच व्हर्जिनिटी ब्रेक झाली असे म्हणतात. पण पहिल्या सेक्सच्या वेळी जर रक्त आले नाही तर ही मुलगी व्हर्जिन नाही, म्हणजेच हिचा याआधीच कुणाशी तरी सेक्स झालेला आहे असा अर्थ काढला जातो. कौमार्य चाचणी मध्ये सुद्धा हेच तपासले जाते. लग्नानंतर पहिल्याच रात्री मुलगा व मुलगी दोघांनाही एका खोलीत पाठवून खाली पांढरेशुभ्र कापड अंथरून त्यावर सेक्स करायला सांगतात. सेक्स करताना जर स्त्रीच्या योनीमार्गातून रक्त आले तर त्या कापडावर त्याचे लाल डाग पडायला हवेत व मुलाने बाहेर येऊन ते पांढरे कापड सर्वांना दाखवून 'माल खरा निघाला कि खोटा?' हे सांगायचे असते. कापडावर लाल डाग असतील तर माल खरा व डाग नसतील तर माल खोटा असा हा प्रकार असतो. यातून अनेक लग्न मोडली जातात व मुलाकडच्यांची फसवणूक केली, म्हणून मुलीच्या आई-वडिलांनी मुलाकडच्यांना नुकसानभरपाई सुद्धा द्यावी लागते. महाराष्ट्रातील कांजरभाट समाजामध्ये ही प्रथा आजही राजरोसपणे चालू आहे व यात त्या समाजाच्या जातपंचायतींचा पुढाकार असतो. अशा अनेक केसेस मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हस्तक्षेप करून तिथल्या जातपंचायतींना या प्रथा बंद करायला लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही अजूनही अनेक ठिकाणी हे प्रकार चालूच आहेत.
कौमार्य चाचणी ही अतिशय घृणास्पद, किळसवाणी व स्त्रियांवर प्रचंड अन्याय करणारी प्रथा आहे. त्यामुळे ही प्रथा पाळणाऱ्या सर्वांना कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी व ही प्रथा लवकरात लवकर संपुष्टात यायला हवी. पण याव्यतिरिक्तही अशी प्रत्यक्ष चाचणी जरी घेत नसले तरी व्हर्जिनिटीच्या नावाखाली अशा कौमार्यभंगाच्या कल्पना मनात बाळगणारे अनेक स्त्री-पुरुष आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत. आपणही त्यातलेच एक आहोत का? हा प्रश्नही हे वाचणाऱ्या प्रत्येकाने आधी स्वतःच्या मनाला विचारायला हवा आणि मग आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा.

आता नेमकं हे हायमेन ब्रेक होणं (म्हणजे हायमेनचा पडदा फाटणे) आणि कौमार्यभंग (म्हणजे पहिल्यांदा सेक्स करत असणे) याचा खरंच एकमेकांशी किती संबंध असतो आणि पहिल्या संबंधाच्या वेळी रक्त येणे किंवा न येणे याचा व्हर्जिनिटीशी किती आणि कसा संबंध असतो? ते आपण पुढच्या लेखात पाहूयात.

- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मते, अनुभव या नंबरवर व्हाट्सअप्प करून नक्की कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध