पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही- भाग 2 - ('चावट गप्पा' मारण्याची जागा)

सेक्स विषयी अभ्यासपूर्ण बोलणं तर दूरच; पण अनेकदा याविषयी मनातल्या भावना कुठं व्यक्त करणे सुद्धा शक्य होत नाही. म्हणजे मनात आलेले लैंगिक संबंधांविषयी काही विचार, कल्पना, भावना कुणाशी बोलायच्या झाल्या तर तशी सोयच आपल्याकडे उपलब्ध नसते. कारण सेक्स आणि त्यासंबंधीच्या गोष्टी उघड बोलणे म्हणजे 'चावट बोलणे' असं समजून अशा 'चावटपणा'ला आपल्याकडे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते. तरीही त्यातल्या त्यात पुरुषांना अशा चावट गप्पांसाठी अनेक जागा मिळतात. अनेक पुरुषांना तर याविषयी बोलताना जागेचं सुद्धा भान नसतं किंवा तसं भान बाळगायची गरज त्यांना वाटत नाही. अर्थात हे सगळ्याच पुरुषांना लागू होत नसलं तरी अनेक पुरुषांना तर चावटपणा ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असल्यासारखेही वाटत असते. असे असले तरीही पुरुषांमध्ये सुद्धा अनेकजण समाजातील सभ्यतेचे निकष पाळायचे म्हणून मनातील चावटपणाची ही इच्छा तशीच दाबून ठेवत असतात.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मात्र अशा विषयावर बोलताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळेच मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सेक्सवर जितक्या मोकळ्या चावट गप्पा होऊ शकतात, तितक्या स्त्रियांच्या होत नाहीत. म्हणजे चावट गप्पा अनेक मुली, स्त्रिया करत असतात, पण त्या कुजबुज स्वरूपातच. पुरुषांसारखं मोठमोठ्याने खदाखदा हसत हसत मोकळेपणाने नाही.
खरंतर जवळपास प्रत्येक स्त्री-पुरुषांना असं काहीतरी बोलायची किंवा किमान ऐकायची तरी मनातून खूप इच्छा असते. म्हणूनच इतरांची प्रेम प्रकरणे रंगवून सांगणे किंवा ती ऐकणे किंवा कुणाचे सिक्रेट लव्ह टॉक्स वाचणे किंवा किमान वाचावेसे वाटणे याबाबतीत फारसे कुणीच अपवाद नसतात. आणि असलेच तर त्यांच्या बाबतीत कौतुक कमी व काळजी जास्त वाटायला हवी इतक्या या नैसर्गिक भावना आहेत. त्यात जर कुणी एखाद्या प्रत्यक्ष लैंगिक संबंधांच्या वेळचे अनुभव वर्णन करत असेल, मग तर सगळे प्राण असे कानात एकवटून ते सगळं ऐकण्यासाठी सगळेच अधीर झालेले असतात.  'एक चावट संध्याकाळ' हे नाटक जर कुणी ऐकले असेल तर त्यात अशा चावटपणाचे आणि वरवर सभ्यतेचे पांघरूण घेऊन चावटपणाला नावे ठेवणाऱ्या पण आतून मात्र याच चावटपणाची ओढ असणाऱ्यांचे सुद्धा किस्से आहेत.
या चावटपणाची भूक भागवण्यासाठी पुरुषांकडे त्यांचे कट्टे, अड्डे, चौक, ठेले, कॉलेज कॅम्पस किंवा चार जवळचे मित्र एकत्र येतील असे कुठलेही ठिकाण असते. स्त्रियांकडे मात्र यातले खूप कमी ठिकाणं असतात आणि शिवाय स्त्रियांनी असलं काही बोलणं हे सभ्य, घरंदाज, चारित्र्यवान स्त्रीचं लक्षण मानत नसल्याने अनेकदा या विषयावर चुप्पीच असते. खूप कमी वेळा कुणीतरी एवढी विश्वासातील स्त्री भेटते, जिच्यासोबत अशा चावट गप्पा मारता येतील.
आजच्या तरूण मुला-मुलींच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती आता बऱ्यापैकी बदलतेय. शिक्षणासाठी बाहेर राहणारे मुलं-मुली होस्टेलवर, रूमवर मुली-मुली आणि मुलं-मुलं बिनधास्तपणे या चावट गप्पा एन्जॉय करू शकतात. पण तिथेही काही मर्यादेपर्यंतच बोलता येतं. म्हणजे समजा मुलींना मुलांसोबत व मुलांना मुलींसोबत अशा गप्पा मारायच्या असतील तर तशी सोय खूप कमी असते. शिवाय ओळखीच्या मुला-मुलींसमोर मनातील सगळ्याच चावट भावना किंवा सेक्स विषयीचे प्रश्न, शंका, भावना शेअर करताना अनेकांना संकोच वाटतो. हे माझ्याबद्दल काय विचार करतील असंच वाटत राहतं. त्यापेक्षा अनोळखी कुणासोबत जर बोलता आलं तर जरा जास्त बिनधास्तपणे बोलता येईल असं वाटत असतं.
याच भावना ओळखून आता इंटरनेटच्या जमान्यात अनेक ऑनलाइन ग्रुप सुद्धा सुरू झालेले आहेत. त्यातील काहींच्या अधिकृत जाहिराती सुद्धा दाखवल्या जातात. अशा ग्रुपवर आपली 'स्वतःची खरी ओळख न सांगता आपल्याला या चावटपणाचा आनंद घेता येऊ शकतो' या आशेने अनेकजण इथे यायचा प्रयत्न करत असतात किंवा किमान विचार तरी करत असतात. काही स्पेशल अँप घेऊन किंवा फेसबुकवरही असे ग्रुप चालत असतात. या ग्रुप्सना प्रचंड प्रतिसाद सुद्धा आहे, यातच या गोष्टींची गरजही लक्षात येते. पण अर्थात पुन्हा इथे सुद्धा एखाद्या स्त्रीने ऍड होऊन प्रामाणिकपणे आपल्या मनातील भावना मांडायचा विचार करावा, तर त्याची सोय इथेही नसते. कारण इथे दिसायला तर जास्तीतजास्त प्रोफाइल हे मुलींच्याच नावाने असतात, पण त्यातले बहुतांशी फेकच असतात व मुलांनीच ते मुलींच्या नावाने उघडलेले असतात. किंवा काही त्या कंपनीनेच तयार केलेले फेक प्रोफाइल असतात.
अशा वेळी मुलींनी जर तिथे काही मोकळेपणाने विचारायचं किंवा बोलायचं ठरवलं तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं दूरच, पण त्यांच्याशी डायरेक्ट घाणेरड्या भाषेत बोलणे किंवा त्यांना गृहीत धरून डायरेक्ट सेक्ससाठी तेही अतिशय विचित्र व अपमानजनक भाषेत विचारणे आणि त्यांच्याविषयी 'ही' म्हणजे 'तसलीच' किंवा 'always available (नेहमीच उपलब्ध)' असलेलीच असल्यासारखे बोलून तिचे पुढे काहीही बोलण्याचे पर्यायच थांबवले जातात. म्हणजे प्रत्यक्षात तर नाहीच पण अक्षरशः ऑनलाइन सुद्धा 'असं काही' बोलायला अजूनही मुलींना किंवा स्त्रियांना जागाच नाही. अनेक मुलं सुद्धा फक्त मुलींशी चावट बोलता यावं किंवा मनातील काही सेक्सविषयीच्या शंका, प्रश्न, भावना यांना इथे काहीतरी संधी मिळेल या प्रामाणिक आशेने आलेले असतात; पण त्यांना सुद्धा इथं लेव्हल सोडून बोललं जाणारं सगळं बोलणं वाचून वीट येईल अशीच परिस्थिती असते.

मग अशा वेळी या मुला-मुलींनी मनातील सेक्सविषयी असलेल्या प्रश्नांवर किंवा कल्पनांवर बोलायचं कुठं? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. 
'सेक्सविषयी बोलावंसं वाटणं' आणि 'सेक्स करावासा वाटणं' यात बराच फरक आहे. पण तो फरकच अशा ग्रुप्समध्ये किंवा ऍप्समध्ये लक्षात घेतला जात नाही असं वाटतं. प्रत्यक्ष कुणा एखाद्या मित्र-मैत्रिणी सोबत हे बोलावं तर ते सुद्धा या 'बोलणं आणि करणं' यातला फरक समजून घेतील का आणि आपल्याबाबत वेगळाच काहीतरी समज तर करून घेणार नाहीत ना? हाही प्रश्न असतोच. पालकांसोबत बोलायची तर सोयच नसते.
खरंच मुलांना मुलींसोबत आणि मुलींना मुलांसोबत सेक्स विषयी सुद्धा मोकळेपणाने बोलता येईल,  एकमेकांना न दुखावता व एकमेकांचा आदर राखून काही चावटपणा पण करता येईल अशी संधी उपलब्ध करून देता आली, तर किती मोठी भावनिक कोंडी फोडता येईल, किती मनं मोकळी करता येतील आणि कदाचित मुला-मुलींचा एकमेकांकडे, एकमेकांच्या शरीराकडे व सेक्सकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलू शकेल का?

- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, अनुभव, मतं नक्कीच मोकळेपणाने वरील नंबर वर व्हाट्सअप्प करून शेअर करू शकता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध