शेअरिंग-केअरिंग - 29 - 'साडी'पुराण

आजही बहुतेक ठिकाणी लग्नानंतर मुलींनी साडीच घालायला हवी असे बंधन पाहायला मिळते. शहरात राहणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत त्यांनी किमान गावी आल्यावर तरी किंवा गावातील नातेवाईक घरी आल्यावर तरी साडी घालायलाच हवी असे बंधन असते. शिकली-सवरलेली मुलं सुद्धा व्यवस्थित विचार न करता 'मोठ्यांचा मान' या नावाखाली बायकोला याबाबतीत आग्रह करून या बंधनाला एकप्रकारे बळच देत असतात.
'स्त्रिया साडीमध्ये सुंदरच दिसतात' यात काही शंकाच नाही. म्हणूनच अनेक मुलींना व स्त्रियांना हौसेने अनेकदा साडी घालायला आणि अनेक मुलांना व पुरुषांना त्यांना साडीत पाहायला आवडतच असते. पण हीच आवडणारी साडी जेव्हा बंधन म्हणून कायमस्वरूपी वापरायची सक्ती होते, तेव्हा मात्र अनेकींना ती त्रासदायक वाटायला लागते. पूर्वी जेव्हा स्त्रिया या फक्त 'चूल आणि मूल' पुरत्याच मर्यादित होत्या, तेव्हा त्यांना कदाचित असं सतत साडीमध्ये राहणं शक्य होतही असेल; पण सध्याच्या युगात मात्र हे साडीपुराण आता कालबाह्य झालेलं आहे हे लक्षात घ्यायला हवं. खरंतर स्त्रियांनी साडीच घातली पाहिजे हे बंधन नेमक्या काय हेतूने, कोणत्या मानसिकतेने घातलेले असावे याचाही विचार करायला हवा. म्हणजे स्त्रियांचे अंग पूर्ण झाकलेले असावे म्हणून साडीचा आग्रह असेल तर उलट साडीपेक्षा ड्रेस व पॅन्ट शर्ट मध्ये अंग जास्त झाकले जाते. साडीतून तर उलट अंग जास्त उघडे दिसते. मग हे नाही, तर दुसरं नेमकं असं काय एवढं महान कारण आहे कि ज्यामुळे साडीचाच एवढा आग्रह धरला जातो? खरंतर आज साडीचे बंधन घालणारे कोणीच स्त्री-पुरुष स्वतःला हा प्रश्न कधीच विचारत नाहीत म्हणा. कारण 'पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना प्रश्न विचारायचे नसतात' एवढंच रामवाक्य त्यांच्या डोक्यात इतकं फिट्ट बसवलं गेलं आहे कि त्यापुढे ते कुणाचंच काही ऐकायला तयार नसतात. कदाचित एक शक्यता अशी आहे कि, पूर्वीच्या काळी जेव्हा अंतर्वस्त्रांचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या योनीतून होणाऱ्या रक्तस्रावामुळे कपडे भिजून ते इतरांना दिसू नयेत, म्हणूनही अंगाभोवती अनेक थर गुंडाळून नेसलेल्या साडीचा फायदा होत असावा किंवा कदाचित त्या काळात तोपर्यंत सापडलेला तोच जास्त योग्य पर्याय असावा. पण हे खरे जरी मानले तरी ते आता खूपच कालबाह्य झालेले आहे. म्हणजे आता मासिक पाळीचे कारणही अजिबात लागू होण्यासारखे नाही. मग तात्कालिक सोय म्हणून सुरू केलेली साडी ही पुढे स्त्रियांवरील इतर अनेक बंधनांप्रमाणेच एक बंधनाचेच प्रतिक म्हणून लादली गेली असावी का? म्हणजे साडी घातलेली स्त्री मोठी मजल मारू शकत नाही, पुरुषांच्या बरोबरीने धावू शकत नाही आणि तिला सतत तिच्या स्त्री असण्याची आणि म्हणूनच मर्यादेतच राहण्याची जाणीव करून देण्यासाठी या साडीची सक्ती केली गेली असावी हीच शक्यता जास्त वाटते. आणि इतर रुढींप्रमाणेच ही सुद्धा लोकांनी कवटाळून ठेवावी म्हणून त्यासाठी काही म्हणी, वाक्ये पेरून ठेवली गेली असावीत. जसं कि- 'बाईचं बाईपण हे कसं साडीतच शोभून दिसतं'. असा ग्रह, आग्रह आणि बंधनं असणारी अनेक कुटुंबं आपल्याकडे आहेत. अर्थात हे वाक्य फक्त लग्न झाल्यावरच लागू होतं बरं का. म्हणजे लग्नाआधी ती कितीही वर्षाची असली तरी बाई होत नाही आणि तिला साडीचे बंधनही असत नाही. पण लग्न झालं कि या दोन्ही गोष्टी लगेच सोबतच येतात. म्हणूनच लग्नाआधी मुलींना हौसेने घालावी वाटणारी आणि आवडणारी साडी लग्नानंतर जेव्हा कायमस्वरूपी रोजच घालायचे बंधन असते, तेव्हा मात्र त्रासदायक वाटायला लागते.

मागचं सगळं समजा आपण सोडून देऊ. म्हणजे त्याची कारणे, मानसिकता, बंधनं वगैरे सगळं बाजूला ठेवुयात. फक्त आजच्या दृष्टीने विचार करूयात. आज साडीला पर्यायी इतर कित्येक असे पेहराव आलेत कि ज्यात स्त्रियांना अधिक मोकळं व आनंदी राहता येऊ शकतं. शिवाय साडीपेक्षा जास्त अंगही त्यात झाकलं जातंय. सतत साडी घालून घालून अनेक स्त्रियांच्या पोटाच्या खाली त्याचे किती वाईट व्रण उठलेले असतात, अनेकींना तिथे सतत खाज येऊन इन्फेक्शनही होत असते. शिवाय सतत पोट एवढं आवळून राहिल्याने सुद्धा त्रास होतो. घाईच्या कामात साडी घालणे, काढणे सगळेच वेळखाऊ. शिवाय जलद चालण्यात, पळण्यात अडथळे. मुंबईसारख्या ठिकाणी लोकल ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना ही साडी सावरणे म्हणजे मोठी कसरतच. बाईकवर किंवा सायकलवर बसताना दोन्हीकडे पाय करून व्यवस्थित बसताही येत नाही. एकीकडेच पाय करून अवघडल्यासारखे बसावे लागते. याच्यामागे सुद्धा लोकांनी परंपरा जोडलीय. इथं तर त्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते. म्हणजे बाई दोन्हीकडे तंगड्या मोकळ्या सोडून बसली म्हणजे यांची महान संस्कृती लगेच रसातळाला जाईल अशी भिती यांना वाटत असते. या असल्या मूर्ख हट्टापायी कित्येक बिचारिंचे जीवही गेले आहेत. गाडीच्या चाकात साडी गुंतून झालेल्या अपघातांच्या कहाण्या प्रत्येक गावोगावी आणि घरोघरी ऐकायला मिळतील. माझा एक मित्र लग्नानंतर दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी बायकोला घेऊन बाईकवर पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील महागणपतीच्या दर्शनाला गेला होता. दर्शन करून येत असताना तिची साडी चाकात गुंतली आणि ती जोरात रस्त्यावर आदळली. डोक्याला जबर मार लागून बिचारीचा जागीच जीव गेला. अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच होत असतात, पण तरी आम्ही विचार करत नाही; कारण परंपरांवर विचार करायचा असतो याची सवयच आपल्याला लावलेली नसते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, गरमीमध्ये काम करत असताना, घरात किचनमध्ये काम करताना गरमीने या स्त्रिया साडीमुळे किती होरपळून निघतात याचा विचारही कधी आमच्या गावी नसतो. आम्ही पुरुष इकडे मार बनियन-अंडरवेअर वर बसू, कधी बनियन ही न घालता तसेच उघडेबंब इकडे तिकडे फिरू, पण स्त्रियांनी मात्र साडी घालूनच राहिले पाहिजे असा अट्टाहास धरू, हे किती माणुसकीला धरून आहे? याचाही जरा विचार करायला हवा.
शिवाय स्त्रियांवरच्या या साडी बंधनात घरातील किंवा दारातील स्त्रियांचाच मोठा हात असतो बरं का. 'स्त्रिया या पुरुषप्रधान व्यवस्थेने लादलेल्या गुलामीच्या शोषित, वाहक आणि सर्वांत मोठ्या रक्षक पण असतात' हे खरेच आहे. यामागे एकतर या घरातील आधीच्या स्त्रियांना 'मला न मिळालेली सूट हिला का मिळतेय?' अशी भावना तरी असते किंवा 'आता माझी बारी.' आजपर्यंत मी सहन केलं, आता येणाऱ्या सुनेवर कसं राज्य करते बघा' असं तरी वाटत असतं. किंवा हिला जर इतकी सूट दिली तर ही डोक्यावर बसेल आणि पुढं आपलंच काही ऐकणार नाही, आपल्या ताब्यात राहणार नाही, म्हणून हिला आत्तापासूनच धाकात धरू' असा विचार तरी असतो. पण खरंतर घरात आधीपासून असणाऱ्या स्त्रिया (सासू, आजेसासू, नणंद) यांनी जर आधी हा स्त्री स्वातंत्र्याचा आणि माणुसकीचा मुद्दा नीट समजून घेतला आणि 'जे आम्हाला मिळू शकलं नाही ते सुख किमान आमच्या घरात येणाऱ्या नव्या मुलीला तरी मिळू देत' असा दृष्टिकोन ठेवून जर स्त्रियांना समान हक्क मिळवून देणे व अधिकाधिक सन्मानाने जगणे याची संधी आपल्या घरातील नवीन महिलेला मिळवून देण्यात पुढाकार घेतला, तर या स्त्रियांवरच्या जाचक परंपरांना कुठेतरी आळा बसण्याच्या शक्यता आहेत.
थोडक्यात काय? हे 'साडीपुराण' आता 'पुराणातील गोष्टी' मध्ये जमा करून आजच्या काळाप्रमाणे विचार करता या मागासलेपणातून बाहेर पडुयात. ज्यांना साडी नेहमीच घालायचीय त्यांना नेहमीच घालू द्यावी, ज्यांना हौसेने कधीतरीच घालायचीय, त्यांना खुशाल तिचा 'त्यांना' हवा तेव्हा आनंद घेऊ द्यावा, ज्यांना कधीच घालायची नाही त्यांना सक्ती करू नये. नवीन काळानुसार इतर सगळं तंत्रज्ञान नवनवं वापरायचा आग्रह धरताना, हातातला मोबाईल सुद्धा सतत अपडेट करत असताना, जरा आपल्या डोक्यातील विचारांना सुद्धा अपडेट करूयात.

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध