व्हॅलेंटाइन स्पेशल

बहिणा मासिकातील 'लग्नगाठी' या सदरातील मार्च 2018 चा लेख.
*व्हॅलेंटाइन स्पेशल*
- सचिन थिटे
-------------------------

फेब्रुवारी हा  प्रेमिकांचा गुलाबी महिना नुकताच संपला. या व्हॅलेंटाइन महिन्यात नक्कीच अनेकांनी आपापल्या मनातील व्यक्तींना प्रपोज केलं असेल. कुणी आपापसातलं बिनसलेलं परत जुळवलं असेल. अनेकजण तर या महिन्याची आणि विशेषतः १४ फेब्रुवारी या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात. किती किती Plan आणि स्वप्नं या दिवसासाठी रंगवलेली असतात. कॉलेजवयीन मुलामुलींसाठी तर हा महिना म्हणजे जाम उत्साहाचा. हे दिवसच मुळी सगळे स्वप्नवतच असतात ना! कधीही परत न येणारे हे सगळे आनंदाचे क्षण. मैत्री – प्रेम – आकर्षण -भांडणं आणि काय काय नसतं या दिवसांत. आणि तरी हे सगळं आनंद देणारं असतं. जगच वेगळं असतं म्हणा ना हे! याच जगाबद्दल बोलणार आहोत आपण आज.

प्रेमाच्या या प्रेममयी जगात रमणं सर्वांनाच अगदी हवंहवंसं वाटत असतं. असं काय असतं या प्रेमात? प्रेम म्हणजे काय? याची एकच अशी व्याख्या सांगणं तसं कठीणच. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. आपल्यातील एखादा कोणी अपवाद वगळता, प्रत्येकानेच या प्रेमाच्या हळुवार भावना अनुभवलेल्या असतात. प्रत्येक जण कधी ना कधी कुणाच्या न कुणाच्या प्रेमात पडलेला असतो. प्रेम ही खूपच सहज, सुंदर अशी भावना आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी प्रेम करून पाहावं असं अनेक प्रेमवीर सांगत असतात. प्रेमाविषयीच्या अनेक आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात. ज्या आजही अनेक प्रेमिकांना प्रेरित करतात. एकूणच ‘कॉफी आणि बरंच काही’ च्या आजच्या या जगात “प्रेम करावे कितीदा” हे गाणं आता घराघरात ऐकू येवू लागलंय आणि सोबत “तुझं माझं ब्रेक अप” हे सुद्धा आता सगळीकडे दिसायला लागलंय. प्रेम होणं, ब्रेक अप होणं आणि पुन्हा प्रेम होणं या गोष्टी आता एकाच्याच आयुष्यात पुन्हापुन्हा व्हायला लागल्यात. ही एका अर्थाने समाधानाची तर दुसऱ्या बाजूला चिंतेची बाब बनत चाललीय. समाधानाची बाब या अर्थाने कि एकदा प्रेमात झालेल्या ब्रेकअप मधून निराशेत जावून आपल्या आयुष्याचे नुकसान करून न घेता आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं हे कधीही चांगलंच. “जिंदगी में सच्चा प्यार सिर्फ एक ही बार होता है” किंवा “पहला प्यार ही सच्चा प्यार होता है” वगैरे अशा गैरसमजांच्या बाहेर तरुणाई निघतेय हे नक्कीच समाधानकारक आहे. पण दुसरीकडे चिंतेची बाब अशी आहे कि यामध्ये प्रेमाची fashion होताना दिसत आहे. म्हणजे मुला-मुलींना GF आणि BF असणं/नसणं हे आता स्टेट्स सिम्बॉल ठरायला लागलंय आणि त्याकरता कोणीतरी असावं म्हणून अशा प्रकारे रिलेशनशिप्स बनवणं, त्यात नाही जमलं कि सोडून देणं आणि पुन्हा सिंगल राहायचं नाही म्हणून दुसऱ्या रिलेशनशिप्सचा शोध घेणं या सगळ्यात प्रेमाचा चेहराच हरवून जाण्याची भीती आहे. आजकाल फेसबुकवर सुद्धा रिलेशनशिप्सचे  स्टेटस ज्या स्पीडने बदलतायत तेही विचार करायला लावणारे आहे. या सगळ्याचं कारण खरंतर प्रेमाविषयी योग्य मार्गदर्शन न मिळणं हे आहे. प्रेम कशाला म्हणतात किंवा ते कसे करावे हे आजकाल फक्त सिनेमा/मालिकांतूनच पाहायला मिळतं आणि आजची पिढी तेच संस्कार घेवून मोठी होत आहे. यातील गाणी तर तरुणाईला अजून भुरळ घालणारी असतात. ज्यामध्ये ‘पहिल्या नजरेतील प्रेम’ किंवा ‘पाहता क्षणीच क्लिक होणे’ या गोष्टींनाच प्रेम म्हणून दाखवलं जातंय. यातून प्रेम आणि आकर्षण यांचीच गल्लत होताना दिसते. ज्या गोष्टी आकर्षणात मोडणाऱ्या आहेत, त्यांनाच प्रेम समजलं गेल्यामुळे जास्त प्रश्न वाढत आहेत. मग यामध्ये वन साईड लव, प्रेमाचा triangle यासारख्या समस्या सुद्धा पुढे येतात. या सगळ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थित हाताळता येणं गरजेचं आहे. नाहीतर यातूनच नैराश्य, आत्महत्या किंवा हिंसेच्या घटना वाढताना दिसतात. आणि यासाठीच आपल्याला प्रेमाची संकल्पना आधी समजून घेणं गरजेचं आहे.

 ‘प्रेम ही गोष्टच इतकी प्रेमळ आहे कि ती प्रेमानेच केली जायला हवी’ असं आम्ही नेहमी म्हणतो. प्रेम कधीही तिरस्कार शिकवत नाही. जिथे प्रेम असते, तिथे हिंसा, मालकी, द्वेष या गोष्टींना थारा नसतो. त्यामुळे वन साईड लव मध्ये जेव्हा समोरचा प्रपोज करतो आणि आपल्याला ते मान्य नसतं, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्याच्या प्रेमाचा आदर करता यायला हवा आणि मग प्रेमानेच त्याला नकार द्यायला हवा. बऱ्याचदा वन साईड लव्ह हे मैत्रीत दिसते किंवा कधी ते अनोळख्या व्यक्तीकडून सुद्धा असू शकते. अशा वेळी असा कसा तो किंवा ती मला प्रपोज करू शकतो/ते असं म्हणून त्यांचे प्रेम झिडकारून न लावता किंवा असणारी मैत्री न तोडता प्रेमाला प्रेमाने नकार देता यायला हवा. तसाच तो नकार स्वीकारता ही यायला हवा. माझं समोरच्यावर प्रेम आहे म्हणजे समोरच्याचं सुद्धा माझ्यावर असायलाच हवं असा अट्टाहास नको. उलट आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्या मतांचा व भावनांचा आदर करणं हेच तर खरं प्रेम. त्या व्यक्तीला आपल्याकडून कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी ना. तसंच triangle मध्ये पण याच भूमिकेतून आपण पाहायला हवं. आणि आपल्या प्रिय व्यक्तीचं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे आणि ते करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे हे मान्य करणं सुद्धा प्रेमच आहे. अर्थात तिथं काही धोक्याची किंवा फसवणुकीची शक्यता असेल तर त्यापासून सावध मात्र करायलाच हवं.

आता खरी मोठी समस्या असते ती म्हणजे प्रेम आणि आकर्षण यातला फरक ओळखणं. मुळात प्रेमाची सुरुवातच जर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या समजांतून झाली असेल, तर पुढे सगळ्याच गोष्टी चुकण्याची शक्यता ही आलीच. चित्रपटांतील मनमोहक गाणी ऐकून ‘माझं पण असं कुणीतरी असावं’ असं वाटायला लागून यातून प्रेमाचा शोध घेतला जातो. यात खरंच एकमेकांवर प्रेम असतं? कि फक्त आकर्षणच असतं? या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तरुण वयात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे परस्परांबद्दल आकर्षण वाटणं ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे. यात काहीही गैर नाही हे नक्की. पण या आकर्षणालाच प्रेम समजून बसणं आणि मग ते मिळवण्याचा अट्टाहास धरणं किंवा ते शेवटपर्यंत पोचू शकलं नाही म्हणून शोक करत बसणं या सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत. वरवर शारीरिक गोष्टी पाहून किंवा क्षणिक एखाद्या गोष्टीच्या मोहात पडून प्रेमाचा निर्णय घेणं टाळता आलं आणि परिपूर्ण विचार करून सर्व गोष्टीची शहानिशा करून निर्णय घेता आला तर पुढच्या चुकीच्या गोष्टी टाळता येऊ शकतील.

अनेकदा या लव्ह-लग्न-लोचा मध्ये अडकलेले अनेक तरुण-तरुणी आपल्याला दिसतात. मुळात प्रेम करतानाच लग्न या उद्देशाने करावं का? हासुद्धा प्रश्न आहे; ज्याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. पण हे अगदी सुरुवातीलाच ठरलेलं असेल आणि तसं एकमेकांशी बोललं गेलं असेल तर जास्त सोपं जातं. त्याही पुढे जावून प्रेम करतानाच जर विचारपूर्वक केलं गेलं तरी अनेक गोष्टी सोप्या होवू शकतात. पण यासाठी आधी ‘प्यार किया नहीं जाता, हो जाता है’ हा फिल्मी संस्कार डोक्यातून काढून टाकला पाहिजे. फक्त भावनिक होऊन ‘प्रेमात पडण्या’ पेक्षा अनेक महत्वाच्या गोष्टींचा सारासार विचार करून आणि एकमेकांशी व्यवस्थित बोलून मग ‘प्रेम करण्या’ चा निर्णय घेता आला तर तो यशस्वी होण्याच्या शक्यता नक्कीच जास्त आहेत. शिवाय यापुढे जावून प्रेम आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रेमाचं रूपांतर लग्नात झालंच पाहिजे असं काही गरजेचं नसतं किंवा लग्न झालं नाही म्हणून आपलं प्रेम खोटं होतं असं मानायचं ही कारण नाही. प्रेमात असताना अनेक गोष्टी वेगळ्या असतात. आपले प्राधान्यक्रम वेगळे असतात. जे लग्नाबाबतीत मात्र बदलू शकतात. अनेकदा प्रेम हे विचारपूर्वकच झालेले असते असे नाही, तर तो अनेकदा भावनिकतेने घेतलेला निर्णय असू शकतो. त्यात पुढे जावून आपली निवड चुकलीय असं वाटू शकतं किंवा आपल्या विचारांत बदल होवू शकतात, आपली प्राथमिकता लग्नाच्या अनुषंगाने वेगळी असू शकते. प्रेम करताना ज्या गोष्टी किंवा अडचणी लक्षात आल्या नाहीत, किंवा दोघांच्या स्वभावातील, विचारांतील, अपेक्षांतील फरक प्रेमातील सहवासातून आपल्या लक्षात आले असतील तर अशा वेळी भावनिक होवून निर्णय न घेता सगळ्या गोष्टींचा वास्तववादी विचार करता यायला हवा. यात मग फक्त प्रेम केलंय किंवा प्रेमाच्या आणाभाका घेतल्यात म्हणून लग्न करणं गरजेचंच आहे असा विचार करून चालणार नाही. अनेकदा जोडीदाराचे व्यसन, स्वभाव, सवयी या मी लग्नानंतर माझ्या प्रेमाने बदलवीन असे म्हणणारे प्रेमिक दिसतात. ही प्रेमाची ताकद सिनेमा-मालिकांतून पाहिलेली असते किंवा कुठेतरी ऐकलेली असते. पण वास्तव आणि फिल्मी लाइफ वेगळी असल्यामुळे असा विचार धोक्याचा ठरू शकतो. एकूण काय तर, प्रेम भावनिकतेतून केलेलं असो किंवा विचारपूर्वक केलेलं असो, पण लग्न मात्र विचारपूर्वकच करायला हवं. नाहीतर प्रेमातील भावनिकता संपल्यावर वास्तविकतेचे प्रश्न आपल्या समोर उभे राहणारच असतात.

आपल्याला प्रेमविवाह झालेली अनेक जोडपी आजूबाजूला पाहायला मिळतील. लग्नाचा निर्णय स्वतःहून घेतला असला तरी यातले अनेक लग्न यशस्वी झालेली दिसत नाही. ती अयशस्वी होण्याची कारणंही विचारात घ्यायला हवीत. मी ज्याच्यावर/ जिच्यावर प्रेम केलं ती ही व्यक्ती नव्हेच. आता ही खूप बदलली आहे. पूर्वी आम्ही दिवसातला पूर्ण वेळ एकत्रच घालवायचो. पण आता तो/ती अजिबात वेळ देत नाही. अशा तक्रारीसुद्धा सुरू होतात. प्रेमात असताना त्या व्यक्तीच्या सवयी, स्वभाव, कामाची प्राधान्यता, कुटुंबातील व्यक्ती या सर्वांचा सारासार विचार झालाय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं. आम्ही एकमेकांना पुरेपूर ओळखतोय असं म्हणून अगदी लग्नाच्या निर्णयापर्यंत आलेल्या अनेक मुला-मुलींना एकमेकांच्या अगदी बेसिक गोष्टीसुद्धा माहिती नसतात. अशाच अगदी लग्न करायचं ठरलेल्या एका मैत्रिणीला जेव्हा त्या मुलाच्या मित्राने सांगितले कि त्याचे आधीच लग्न ठरलेले आहे, तेव्हा ती त्याच्या घरी चौकशीला गेली तर घराचे दार उघडणारीच त्याची बायको होती. अशी फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचप्रमाणे प्रेमविवाह झालेला असूनही एकमेकांच्या वैचारिकतेविषयी व्यवस्थित माहिती करून न घेतल्याने सुद्धा नंतर वाद होवून लग्न तुटल्याची उदाहरणे आमच्याकडे आली आहेत. शिवाय प्रेमात असतानाचा विशेषतः मुलींचा दिनक्रम लग्नानंतर मात्र प्रचंड वेगळा असण्याची शक्यता असते. प्रेम ही दोघांतील गोष्ट असते, पण लग्न मात्र सामाजिक, कौटुंबिक निर्णय असतो. त्यानंतर कुटुंबियांचा दोघांत होणारा हस्तक्षेप, त्यांच्या अपेक्षा व जबाबदाऱ्या यांचाही विचार करणे गरजेचे आहे. शिवाय तोपर्यंत कधीच न जाणवलेला घरकामाचा मुद्दा हा तर यक्ष प्रश्न बनून पुढे येतो व त्यात जर कुटुंबियांची भूमिका समानतेची नसेल व जोडीदारही यात साथ देणारा नसेल तर जगणं कठीण होवून जातं. म्हणूनच लग्न करताना सर्व गोष्टी तपासून, सगळी पडताळणी करून मगच लग्नाचा निर्णय घ्यायला हवा. 

पालकांनी सुद्धा प्रेमविवाहाकडे सकारात्मक नजरेने पाहाणं गरजेचं आहे. अनेकदा पालकांनी प्रेमविवाहाकडे नकारात्मक दृष्टी ठेवून पाहिल्यामुळेच निवड योग्य असूनसुद्धा मुला-मुलींना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं किंवा कुटुंबियांच्या प्रेमाला मुकावं लागतं. जर पालकांनी आपली भूमिका बदलली व मुला-मुलीच्या या निर्णयाचं स्वागत केलं तर बऱ्याचदा मुला-मुलींचे निर्णय कुठे चुकत असतील, त्यांची निवड चुकत असेल किंवा काही महत्वाच्या गोष्टींची पडताळणी करून पाहाणं राहिलं असेल तर ते सर्वांना मिळून करता येवू शकतं. फक्त त्यासाठी आधी आपल्या मुला-मुलींच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. आपली मुलं प्रेमविवाह करणार आहेत, असं म्हटलं की पालकांना धडकी भरते. नक्की कसं पाहिलं असेल? आपल्या घराला शोभेल नं, लोक काय म्हणतील, जातीतच असेल ना? आमची मुलं आमच्या ऐकण्याबाहेर नाहीत, मग कसं काय त्यांनी असा निर्णय घेतला? अशा पद्धतीने विचार करणं आता पालकांनी थांबवलं पाहिजे. उलट आपली मुलं ज्याच्या/ जिच्यासोबत लग्न करणार आहेत ते जाती-धर्माच्या पल्याड जावून माणूस म्हणून योग्य आहेत का? त्यांनी सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केलाय का? सर्व माहिती काढलीय का? नसेल काढली तर ती काढायला सांगणं, काही बोलायचं राहिलंय असं वाटत असेल तर ते बोलायला सांगणं. तसंच मुलांच्या निवडीविषयी मनात जे काही प्रश्न असतील, ते त्यांनी मुलांना विचारणं गरजेचं आहे. यातून मुलांनी केलेली एकमेकांची निवड विचारपूर्वक आहे का याची खात्री करून घेणं आणि खात्री पटल्यास त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. नाही पटली तर त्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देवून त्यावर दोघांची मते विचारात घ्यायला हवीत. तरीही त्यांचा निर्णय पक्का असेल तर पालकांनी मुलांची साथ भक्कमपणे द्यायला हवी.

एकूण काय, तर प्रेम ही आयुष्य खूप सुंदर करणारी गोष्ट आहे. प्रेमावर बोलायला खूप गोष्टी आहेत, त्याला अनेक कंगोरे आहेत; पण किमान प्रेम आणि आकर्षण यातला फरक ओळखता येणं गरजेचं आहे. शिवाय प्रेम आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच प्रेम हे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर होवू शकतं आणि ते एकावरच असेल असंही नाही, एकावेळी अनेकांवर पण प्रेम होवू शकतं; पण लग्न करताना मात्र खूप विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रेमात असताना आम्ही रोज एकत्र असतो ,एकमेकांच्या सहवासात असताना सगळं विसरायला होतं, अशा आंधळ्या आणि स्वप्नाळू प्रेमाच्या पलीकडे जाऊन थोडं डोळस प्रेम करण्याची गरज आहे. रोज भेटणं, मॅचिंग कपडे घालणं, हॉटेलचं बिल तू देणार की मी, अशा गप्पांपलीकडे जाऊन तरुण-तरुणींनी अनेक महत्वाच्या विषयावर बोलायला हवं. याचबरोबर थोडं तुझं, थोडं माझं असं करत पालक आणि मुलं-मुली यांनीसुद्धा एकमेकांशी संवाद साधणं गरजेचं आहे.

प्रेमाकडून लग्नाकडे जाताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे? असे काही मुद्दे आहेत का ज्यावर चर्चा करून एकमेकांची निवड योग्य कि अयोग्य याविषयी ठरवता येवू शकतं? तसेच प्रेमविवाह आणि पसंतीविवाह (arrange marriage) यांची सांगड घालणारा एखादा नवीन पर्याय असू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या लेखांतून मिळतीलच. भेटूयात पुन्हा पुढच्या महिन्यात.

- सचिन थिटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध