शेअरिंग-केअरिंग- 25- मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 10) गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य?- 3

अधिक खात्रीच्या गर्भनिरोधाच्या पर्यायांमध्ये पहिला पर्याय येतो तो म्हणजे कंडोम. हा पर्याय आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या ओळखीचा व बऱ्यापैकी मान्यता असलेला आणि वापरला जाणारा पर्याय आहे. कंडोम मध्ये आधीच्या सर्व पर्यायांपेक्षा जास्त सुरक्षित लैंगिक संबंध करता येतात. कंडोममुळे फक्त अनैच्छिक गर्भारपणच टाळले जात नाही, तर लैंगिक संबंधांच्या वेळी संसर्गातून पसरू शकणाऱ्या अनेक लैंगिक आजारांपासून सुद्धा संरक्षण मिळते. शिवाय पुरुषांचे कंडोम किमतीने पण तसे फार महाग नसतात, त्यामुळे सहज कुणालाही ते परवडू शकते. यात वेगवेगळ्या चवीचे, वासाचे फ्लेवर असणारे व अधिक आनंद देण्यासाठी डॉट्स वाले कंडोम सुद्धा उपलब्ध असतात. लिंग व योनीच्या मध्येमध्ये लुडबूड जाणवू नये म्हणून कंडोम हे एकदम पातळ लेअर असणारे असतात. शिवाय योनीमध्ये लिंगप्रवेश करण्यास मदतच होईल अशा पद्धतीने काही ल्युब्रिकंट्स सुद्धा काही कंडोममध्ये वापरलेले असतात. एवढं सगळं असलं तरीही यामध्ये काही अडचणीही असतातच. त्या म्हणजे- कंडोम लावल्याने पुरुषाच्या लिंगाच्या त्वचेचा स्पर्श स्त्रीच्या योनीच्या भागाशी प्रत्यक्ष येत नाही, त्यामुळे काही पुरुष व स्त्रियांनाही ते फार मजा देणारे वाटत नाही. प्रत्यक्ष लिंगाचा योनीशी होणाऱ्या स्पर्शात जी मजा असते ती असं पडद्याआडून (आतून) संबंध करण्यात नसते असं काहीजणांना वाटतं. शिवाय कंडोम हा पुरुषांच्या हातात असणारा पर्याय असल्याने पुरुषांची इच्छा नसेल तर वापरता येत नाही. महिलांनी वापरावयाचे कंडोम सुद्धा आता उपलब्ध आहेत; पण ते तुलनेने महागही असतात व वापरण्यात पुरुषांच्या कंडोमपेक्षा जास्त अडचणीचे असतात. त्यामुळे शक्यतो पुरुषांनीच कंडोम वापरणे जास्त योग्य असते.
कंडोम हा लिंगाला ताठरता आल्यानंतर वापरायचा असतो. अशा वेळी काहीजणांना एकदम मूडमध्ये आलेलं असताना असं मध्येच "टाईम प्लिज.." म्हणून कंडोम लावायला वेळ देणं जमत नाही. यामध्ये काही वेळा रंगाचा बेरंग होऊन लिंगाची ताठरता पण जाते. कधी कंडोम व्यवस्थित वापरता न आल्याने किंवा कधी चुकीच्या पद्धतीने वापरल्याने सुद्धा कंडोम फाटण्याची व त्यामुळे गर्भ राहण्याची पण शक्यता असते. काहीजण कंडोम वापरताना वरून ल्युब्रिकंट (वंगण) म्हणून तेल किंवा काही क्रीम वापरतात, त्यानेही कंडोम फाटू शकतो. त्यामुळे कंडोम वापरताना शक्यतो बाहेरून कोणते तेल किंवा क्रीम वापरू नये किंवा वापरायचेच असेल तर खास कंडोम साठी बनवलेले काही ल्युब्रिकंट्स मिळतात, त्यांची माहिती घेऊनच मग वापर करावा. एक कंडोम फाटण्याची भिती असते म्हणून काहीजण एकावर एक असे दोन कंडोम वापरतात. हे म्हणजे दगडावर डोकं आपटून फुटेल या भितीने स्वतःच्या हातानेच दगड उचलून डोक्यात घातल्यासारखे आहे. कारण दोन कंडोम एकत्र वापरल्याने त्यांचे एकमेकांवर घर्षण होऊन ते फाटण्याची शक्यता नेहमीपेक्षा जास्त पटींनी वाढते. त्यामुळे एकच कंडोम त्याविषयी आधी व्यवस्थित माहिती घेऊन वापरणे जास्त सुरक्षित आहे. एका वेळी एकच कंडोम वापरणे, एकदा विर्यस्खलन झाले कि पुन्हा तोच कंडोम वापरून सेक्स करू नये, कंडोम मध्ये वीर्यस्खलन झालंय, मग आता कंडोम काढून विना कंडोम पुन्हा सेक्स चुकूनही करू नये (कारण वीर्याचे काही प्रमाणात अंश अजूनही लिंगामध्ये असतात), वीर्यस्खलन होऊन लिंगाची ताठरता गेल्यानंतर लगेच कंडोमच्या बाहेरच्या (लिंगाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या) टोकाला धरून लिंग बाहेर काढावे, जेणेकरून वीर्य आतच सांडणार नाही, बाहेरून कोणत्याही तेलाचा वापर कंडोमवर, लिंगावर किंवा योनीवर लावण्यासाठी करू नये, पाकीट फाडताना शक्यतो कात्रीचा वगैरे वापर करू नये, कंडोम लावताना त्यात हवा राहणार नाही यासाठी पुढचा फुगवट्याचा भाग चिमटीत धरूनच लावावा (हवा राहिल्याने सुद्धा कंडोम फाटू शकतो) आणि एवढं सगळं करत असताना मनात कोणताही ताण ठेवू नये- (हे हास्यास्पद वाटेल) कारण जास्त ताण घेतल्याने पण काहींच्या लिंगाची ताठरता जाऊ शकते. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कंडोमचा पर्याय हा गर्भनिरोधक म्हणून बऱ्यापैकी खात्रीलायक आहे. अर्थात त्यातही काही प्रमाणात अपयशाची शक्यता असते, पण ती फार कमी असते. शिवाय कंडोमचे फायदे हे तोट्यांपेक्षा खूप जास्त आहेत. म्हणजे तुम्ही लग्नाआधी, लग्नानंतर, विवाहित, विवाहबाह्य, भिन्नलिंगी, समलिंगी अशा सर्व लैंगिक संबंधांमध्ये याचा वापर करू शकता. शिवाय हे फक्त गर्भनिरोधक म्हणून नाही तर एड्स व इतर अनेक लैंगिक आजार व संसर्गापासूनही वाचवण्याचे काम करते.
लैंगिक संबंधांच्या वेगवेगळ्या प्रकारातही याचा वापर होतो. अनेकदा मुखमैथुन करताना बऱ्याच स्त्रियांना पुरुषाचे लिंग तोंडात घेणे हे संकोच किंवा किळस आणणारे असते (खरंतर स्वच्छता व्यवस्थित ठेवलेली असेल, तर मुखमैथुन करायला काहीच हरकत नसते. पण अनेकजण लैंगिक अवयवांची स्वच्छता व्यवस्थित ठेवत नसल्याने ते किळसवाणे वाटू शकते. यावर आपण नंतर सविस्तर बोलूच.) अशा वेळी कंडोम वापरल्याने स्त्रियांनाही ते सोयीचे वाटू शकते व त्यात त्यांच्या आवडीने वासाचे व चवीचे फ्लेव्हर निवडले तर ते त्यांच्यासाठी अधिक सोयीचे व आवडीचे होऊ शकते. फक्त मुखमैथुन करून मग लिंग-योनी संबंध करताना मुखमैथुन मध्ये कंडोम फाटला तर नाही ना, याचीही खात्री करून घ्यावी. त्यासाठी कंडोमला दात लागू न देता मुखमैथुन करावे.
हस्तमैथुन करताना कंडोमची गरज नसते. गुदमैथुन करताना मात्र कंडोम वापरावाच, कारण यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांनी सुद्धा कंडोमचा वापर करायलाच हवा. कारण त्यातून अनेक त्वचेचे व लैंगिक आजार होण्याची शक्यता असते.
जास्त जोडीदारांशी संबंध ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गर्भनिरोधक म्हणून किंवा किमान संसर्गापासून संरक्षण म्हणून तरी कंडोमचा वापर करायलाच हवा. 
अर्थात, जोडीदार खात्रीचा/ची असेल, स्वच्छता राखणारा/री असेल व काही त्वचेचे किंवा इतर लैंगिक आजार नसल्याची खात्री असेल आणि गर्भनिरोधक म्हणून वेगळा अधिक प्रभावी पर्याय वापरत असाल, तरच मग कंडोम शिवाय लैंगिक संबंधाची मजा घेऊ शकतो.
कंडोमपेक्षाही अधिक भरवशाचे सुद्धा काही पर्याय आहेत का? असतील तर कोणते? ते आपण पुढे पाहुयात.

- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध