शेअरिंग-केअरिंग - 24 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 9) - गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य? - 2

काही काळ गर्भधारणा न होऊ देता लैंगिक संबंध ठेवताना वापरावयाचे काही पर्याय व निरोधके यांविषयी आपण बोलत आहोत. यापैकी पहिला पर्याय (आत-बाहेर - In-out Method) आपण पाहिला. यालाच 'अपूर्ण संभोग पर्याय' असेही म्हणतात. त्याची कारणेही आपण मागच्या लेखात पाहिली. दुसरा पर्याय आहे- डुश घेणे म्हणजेच योनीमार्ग धुणे. या पर्यायामध्ये पुरूषाचे वीर्यस्खलन जर योनीमध्ये झालेच तर लगेच त्या स्त्रीने साबणाचे पाणी किंवा इतर काही शुक्राणूनाशक औषध वापरून योनी धुवून काढायची. यामध्ये असणाऱ्या कार्बन डायॉक्साईड व ग्लुकोजमुळे शुक्राणू मरतात. पण हा पर्याय अजिबात विश्वासाचा नाही व यामध्ये अपयशाची शक्यताच जास्त आहे. काही महिला तर फक्त साध्या पाण्याने डुश घेतात. हे म्हणजे 'आ बैल मुझे मार' असाच मार्ग आहे. शिवाय यामध्ये सेक्स करताना सेक्सवर कमी व वीर्य कधी पडतंय यावरच त्या स्त्रीला जास्त लक्ष देऊन राहावं लागतं आणि वीर्य पडल्यापडल्या पळापळ करत ते धुवून टाकावे लागते. यादरम्यान सेक्सचा आनंद घ्यायचाच राहून जातो.
पुढचा एक पर्याय म्हणजे वेगवेगळ्या अशा आसनांचा वापर करणे, ज्यामुळे वीर्य आत न सांडता बाहेर पडेल. उदाहरणार्थ, स्त्री पालथी असलेली अवस्था. पण हासुद्धा पुन्हा असाच बेभरवशाचा पर्याय. कारण वीर्याचा थोडा जरी भाग चुकून आतमध्ये गेला तरी गर्भ राहण्याची शक्यता आहेच. त्यामुळे आत्तापर्यंतचे हे तिन्ही मार्ग अतिशय कमी परिणामकारक असल्याने न वापरणेच योग्य.
कॅलेंडर पद्धत म्हणजेच मासिक पाळीच्या दरम्यानच्या सुरक्षित कालावधीत संभोग करण्याचा एक पर्याय आहे. यात पण 'नियमित पाळी येत असेल तर' आणि 'पाळीच्या वेळा अनियमित असतील तर' अशा दोन पद्धती आहेत. पाळी दर 28 दिवसांनी नियमित येत असेल, तर पाळी येऊन गेल्याच्या दहाव्या दिवसापासून तर अठराव्या दिवसापर्यंतच्या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता असते. हे दिवस वगळून संबंध ठेवता येतात. दुसरं म्हणजे पाळी अनियमित असेल तर कमीतकमी किती दिवसांत व जास्तीतजास्त किती दिवसांत पाळी येते याचे गणित करून मग उरलेल्या दिवसांत संबंध ठेवावे लागतात. म्हणजे कमीतकमी जितक्या दिवसात पाळी आलेली असेल त्यातून 18 वजा करायचे व जास्तीतजास्त जितक्या दिवसांत पाळी आली असेल त्यातून 11 वजा करायचे. कमीतकमी 24 व जास्तीतजास्त 32 असं असेल तर 24 वजा 18 म्हणजे 6 व 32 वजा 11 म्हणजे 21. मग पाळी आलेल्या दिवसापासून 6 ते 21 या दिवसांदरम्यान संबंध ठेवू नयेत असं ही पद्धत सांगते. पण हेसुद्धा बरंच अडचणीचेच होते. कारण अनियमित पाळी कधी येणार हे नेमके सांगता येत नाही. शिवाय या सुरक्षित दिवसांव्यतिरिक्त इतर मधल्या दिवसांमध्ये इच्छा अनावर झाली व लैंगिक संबंध आले तर काय? हा प्रश्न राहतोच. कारण लैंगिक इच्छा काय कॅलेंडर पाहून तयार होत नाहीत. शिवाय शुक्राणू हे दोन-तीन दिवस योनीमध्ये सुप्तावस्थेत राहू शकतात. म्हणजे पुन्हा टांगती तलवार आलीच.
याशिवाय स्त्रीच्या शरीराचे तापमान मोजणे, योनीतील स्त्रावाचा कोरडेपणा व ओलसरपणा यावर लक्ष ठेवणे असेही काही पर्याय आहेत. पण या पर्यायांमध्ये सुद्धा खात्रीशीर परिणामकारकता नसल्याने गर्भ राहण्याचीच धाकधूक लागून राहते व लैंगिक संबंधातील उत्स्फूर्तता निघून जाते. वरील सर्व प्रकार हे कोणत्याही गोळ्या-औषधे न वापरता करण्याचे पर्याय झाले. पण या प्रकारांमध्ये अपयशाचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे ते फारसे सुचवले जात नाहीत. शिवाय या सर्वच पर्यायांमध्ये सेक्सचा मनमुराद आनंद घेता येत नाही, सतत मनात भीती असते व पुरुषाच्या वीर्याकडे जणू ते आपला शत्रूच असल्यासारखे लक्ष ठेवून राहावे लागते. 
काहीजण या पर्यायांना नैसर्गिक समजतात व गोळ्या-औषधांच्या कृत्रिम प्रयोगांपेक्षा या प्रयोगांच्या भरवश्यावर राहायचे ठरवतात, ते नेहमी धोक्याच्या शक्यतेतच असतात हे लक्षात ठेवायला हवं. शिवाय गर्भनिरोधाचा कोणताही पर्याय नैसर्गिक कधीच नसतो हे आधी समजून घ्यायला हवं. कारण मुळात निसर्गतः स्त्रियांची मासिक पाळी जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत गर्भारपण राहणे हेच अपेक्षित असते. त्यामुळे तो समज डोक्यातून काढून टाकायला हवा.
याव्यतिरिक्त इंजेक्शन्स, योनीमार्गात ठेवण्याची रिंग, डायफ्रॅमची टोपी, सर्व्हायकल कॅप असेही उपाय आहेत. पण यांच्यामध्ये मासिक पाळी अनियमित होण्याची शक्यता जास्त असते व हे वापरायची कटकट जास्त असल्याने फार सोयीचे नाहीत.
हे सगळं वाचताना इथं सगळंच बेभरवशाचं दिसतंय (यहाँ पे सब धोका धोका है!!), मग भरवशाचं काही आहे कि नाही? असा प्रश्न मनात आला असेल ना?
तर अर्थातच हो. यांच्या व्यतिरिक्त  अधिक खात्रीचे गर्भनिरोधाचे मार्गही उपलब्ध आहेत. ते आपण पुढच्या लेखात सविस्तर पाहूच.

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध