शेअरिंग-केअरिंग - 23 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 8) - गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य?- 1
गर्भनिरोधकांच्या क्षेत्रातही तसं पाहिलं, तर अजून बराच गोंधळ आहे. कुठेही स्पष्टपणे याविषयी बोललं जात नाही. सहजरित्या माहिती उपलब्ध होईल अशी फारशी सोय नाही आणि लैंगिक संबंध हे जसे चोरून लपून करायची गोष्ट आहे, तसेच गर्भनिरोधके सुद्धा लपूनछपून वापरायचीच गोष्ट असल्यासारखी परिस्थिती अजून तरी आहे. डॉक्टरांना विचारायला जावं, तरी तिथंही बोलायची चोरीच. 'आम्हाला लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवायचे आहेत, तर कोणती गर्भनिरोधके वापरायला हवीत?' असा प्रश्न विचारण्याची हिंमत फक्त मनातच होते अशी स्थिती आहे. आणि उद्या कुणी हिंमत करून एखाद्या डॉक्टरांना विचारलंच, तर या प्रश्नाने त्या डॉक्टरांनाच भोवळ यायची शक्यता जास्त!
लग्नाआधी तर सोडाच, लग्नानंतर सुद्धा 'आम्हाला लगेच मूल नको असल्याने लैंगिक संबंध ठेवताना कोणती निरोधके वापरणे जास्त योग्य असेल?' असं विचारण्याचीही अनेकांची हिंमत होत नाही. त्यामुळे याविषयी विस्तृतपणे माहिती मिळतच नाही आणि मग मनातील गोंधळ अजून वाढत राहतो. लग्नाआधी किंवा लग्नानंतर लैंगिक संबंध ठेवताना गर्भ नको असल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत व त्यातील कशाचे काय फायदे-तोटे आहेत? याविषयी लिहिण्याची गरज अनेकांच्या प्रतिक्रियांतून जाणवल्याने आज त्यावर थोडक्यात.
एक- 'बाळ नकोच आहे' हे निश्चित असल्यास स्त्री किंवा पुरुष दोघांनाही यासाठीची शस्त्रक्रिया करून घेता येते. यातील पुरुषांची शस्त्रक्रिया अधिक सोपी असल्याने त्यांनी पुढाकार घेणे जास्त स्वागतार्ह असेल. एकापेक्षा अधिक भिन्नलिंगी जोडीदारांसोबत मुक्त लैंगिक संबंधांचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्री असो वा पुरुष दोघांनीही स्वतःची शस्त्रक्रिया करून घेणे जास्त सोयीचे असेल. समलिंगी संबंधांमध्ये गर्भधारणा न होण्यासाठी निरोधक वापरायची गरजच नसते, त्यामुळे ते आपण अगदी मुक्तपणे अनुभवू शकतो. (फक्त काही लैंगिक आजारांपासून वाचण्यासाठी काही उपाय व निरोधांची गरज असते, त्यावर आपण पुढे बोलू.) अर्थात एखाद्या पुरुषाला विकी डोनर सारखं स्पर्म डोनर बनायचं असेल तर त्याने त्याच्यापासून गर्भधारणेसाठी तयार असणाऱ्याच स्त्रीशी संबंध ठेवावेत किंवा मग इतर पर्यायांचा विचार करावा; पण याविषयी समोरच्या स्त्री जोडीदाराला सत्य परिस्थिती आधी सांगायलाच हवी. स्त्रियांसाठी मात्र असा 'बेबी डोनर' किंवा 'गर्भाशय डोनर'चा पर्याय हा अधिक डोकेदुखी ठरू शकणारा असल्याने त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया किंवा मग निरोधके हाच रास्त पर्याय आहे.
दोन- लग्नाआधी संबंध ठेवू इच्छित असल्याने 'बाळ नकोच' हे आत्ताच सांगू शकत नाही किंवा 'आत्ता फक्त कॅज्युअल सेक्सचा अनुभव घ्यायचा आहे, पुढे बाळ हवंय/नकोय हे मलाही माहीत नाही आणि समोरच्यालाही माहीत नाही' किंवा विवाहेतर लैंगिक संबंध ठेवताना 'बाळ मात्र फक्त वैवाहिक जोडीदारकडूनच हवं आहे' किंवा लग्नानंतर संबंध ठेवत असताना 'काही वर्षे बाळ नको आहे. पुढे काही वर्षांनी विचार करून ठरवायचं आहे.' या सर्व परिस्थितीत कायमस्वरूपीची शस्त्रक्रिया करू शकत नाही. अशा परिस्थितीत मग काही तात्पुरते पर्याय किंवा मग इतर गर्भनिरोधके उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पर्याय:-
1. आत-बाहेर (In-Out Method)- यात लैंगिक संबंध चालू असताना जेव्हा पुरुषाला वीर्यस्खलन होण्याची जाणीव होते, तत्क्षणी लिंग योनीच्या बाहेर काढायचे व योनीबाहेर वीर्यस्खलन होऊ द्यायचे. या पद्धतीचे काही फायदे-तोटे आहेत. फायदा हा, कि तुम्हाला कोणतेही गर्भनिरोधक वापरायची गरज लागत नाही. काही गर्भनिरोधकांमुळे स्त्रियांना थोडेफार साईडइफेक्ट होण्याची शक्यता असेल तर ते इथे होत नाहीत व 'कंडोम वापरल्याने सेक्स करण्यात मजा येत नाही' किंवा बऱ्याचदा 'लिंगाला आलेली ताठरता कंडोम लावून होईपर्यंत जाण्याची शक्यता असते' किंवा 'ऐन मूडमध्ये आलेले असताना कंडोम साठी मध्येच ब्रेक घेणे अनेकांना आवडत नाही' अशा सर्वांना हा पर्याय सोयीस्कर वाटतो. पण याचे तोटे हे या फायद्यांपेक्षा अधिक जास्त आहेत. अशा पद्धतीने कोणतेच निरोधक न वापरता फक्त पुरुषाला होणाऱ्या विर्यस्खलनाच्या जाणिवेवर विसंबून राहणे अनेकदा धोक्याचे ठरू शकते. कधीकधी विर्यस्खलनाची जाणीव झालीय, त्याच क्षणी जर लिंग बाहेर काढले गेले नाही व थोडेजरी वीर्य योनीमध्ये गेले तर गर्भधारणा राहण्याची शक्यता आहे. अनेकदा विर्यस्खलनाच्या वेळेला समागम हा अगदी रंगात आलेला असतो. दोघेही किंवा किमान पुरुष तरी लैंगिक समाधानाच्या अगदी उच्च पातळीवर असतो आणि नेमकं त्याच वेळेला आतून वीर्य निघाल्याचा संदेश येतो. अशा वेळी स्वतःवर आवर घालून तात्काळ लिंग बाहेर काढणे हे महा-कठीण काम असते. शिवाय लैंगिक आनंदाचा तो अंतिम सुखदायक टप्पाच असा घाईगडबडीत अनुभवता येत नाही. कधीकधी योनीमध्ये होणारे विर्यस्खलन हे त्या स्त्रीलाही एक वेगळाच आनंदाचा फील देणारे असू शकते, पण ते तिला या पद्धतीत अनुभवताच येत नाही. शिवाय लैंगिक पूर्तीच्या या उच्च टप्प्यावर (अनेकदा हा फक्त पुरुषांसाठी उच्च टप्पा असू शकतो) दोघाही जोडीदारांनी एकमेकांना अधिक घट्ट बिलगून जो आनंद घ्यायला हवा, तो इथे मात्र घेता येत नाही.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे वीर्यस्खलनाचा संदेश हा मुळात धोक्याचा नसून पुरुषांना कामतृप्ती देणारा आनंदाचा संदेश असतो, पण इथे त्याच्याकडे धोक्याचा म्हणूनच पाहावे लागते आणि त्यातला आनंदच हरवून जातो. कारण पुरुष चुकून जरी हा संदेश समजायचे चुकला किंवा संदेश कळूनही स्वतःवर तात्काळ नियंत्रण ठेवू शकला नाही, तर यातून येणारे अनैच्छिक गर्भारपण व ते नको असेल तर मग त्यासाठी करावे लागणारे गर्भपाताचे प्रयोग हे मात्र स्त्रियांनाच भोगावे लागणारे असतात. शिवाय दोघांनी मिळून बनवलेले पालकत्वाचे सगळे प्लॅनच इथे बारगळण्याची शक्यता असते.
या पद्धतीत अपयशाची शक्यता इतर सर्व पर्यायांमध्ये सर्वांत जास्त असते. त्यामुळे यात असणाऱ्या फायद्यांपेक्षा यातले तोटे जास्त गंभीर असतात. एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत मुक्त लैंगिक संबंधांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांनी तर या वाटेकडे चुकूनही न जाणेच उत्तम.
इतर पर्याय व निरोधके पुढच्या भागात पाहुयात.
- सचिन (8424041159)
इमेल : srthite@yahoo.co.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा