शेअरिंग-केअरिंग- 22 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 7) गर्भनिरोधके- मुक्त लैंगिक संबंधांसाठी वरदानच
मागच्या लेखात आपण लैंगिक इच्छांसंदर्भातील उत्क्रांतीचा इतिहास पाहिला. त्यात सांगितल्याप्रमाणे लैंगिक संबंधांवर जास्त नियंत्रण ठेवू शकणाऱ्या स्त्रिया व बेजबाबदार पुरुष यांचे वंशज पुढे कमी झाले असावेत हे जरी खरे असले तरी याचा अर्थ त्यांनी जन्म दिलेल्या संतती या लैंगिक इच्छा कमी असणाऱ्या व बेजबाबदारच झाल्या किंवा उलट बाजूने लैंगिक संबंध जास्त ठेवणाऱ्या स्त्रिया व प्रेमळ, जबाबदार पुरुष यांच्या संतती याबाबत यांच्यासारख्याच होत्या असं नाही. काही प्रमाणात अनुवंशिकरित्या हे गुण आले असावेत अशी शक्यता आहे. पण या सगळ्यातून लैंगिक संबंधांच्या बाबतीत एक मानसिकता घडत जायला सुरुवात झाली हे नक्की.
कारण लैंगिक इच्छा व त्यावरील नियंत्रण याबाबत प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते व तत्कालीन आजूबाजूच्या परिस्थिती आणि विचारांचा त्यांच्यावर जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे माता-पित्यांचे इतर अनेक संस्कार जसे संतती सहज स्विकारते, तसेच लैंगिकतेबाबतचे व बेजबाबदारी बाबतचे वर्तन हेसुद्धा याच संस्करातून मोठ्या प्रमाणात स्विकारले जातात. यातून एक स्पष्ट होते कि 'अनैच्छिक गर्भारपण' ही लैंगिक संबंधांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची बाब ठरत आलेली आहे. याच गोष्टीमुळे आधी स्त्रियांना स्वतःहून स्वतःच्या लैंगिक संबंधांवर बंधने घालून घ्यावी लागत होती व पुढे विवाहसंस्था आणि धर्म यांनी हीच बंधने स्त्रियांवर जणू काय नैसर्गिक असल्यासारखीच लादली. हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या स्त्रियांवर लादलेल्या या बंधनांतून स्त्रियांच्या लैंगिक इच्छा, भावना यांच्याकडे आदराने पाहण्याची सुद्धा सोय कुठे राहिली नाही. अगदी स्वतः स्त्रिया सुद्धा स्त्रियांच्या लैंगिकतेवरील हे बंधन पक्कं करण्यामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्या व ठरत आहेत. पुढे जाऊन सध्या तर एकूणच पुरुषांसहित सर्वांच्याच लैंगिक संबंधांवर बंधने घालून 'लैंगिक बंधन हे नैसर्गिकच आहे कि काय?' असा भास निर्माण होण्याइतकी परिस्थिती तयार करण्यात आली आहे.
या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थाने मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणायला सुरुवात केली ती 'संततिनियमन शस्त्रक्रियांनी'. आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी रघुनाथ धोंडो कर्वे या विचारवंताने भारतात ज्या गोष्टीसाठी आग्रह धरला व त्यासाठी आयुष्यभर झटत राहिले ते 'संततिनियमन' हे फक्त लोकसंख्या नियंत्रणासाठीच उपयुक्त नव्हते, तर स्त्रियांना हजारो वर्षांच्या लैंगिक बंधनातून मुक्त करणारे क्रांतिकारक पाऊल होते. आता स्त्रिया त्यांच्यावर येणाऱ्या कोणत्याही अनैच्छिक गर्भारपणाचा भार टाळू शकणार होत्या. जिवघेण्या प्रसववेदना आता दरवर्षी किंवा वारंवार नाईलाजाने सहन करण्याची आता त्यांना गरज उरली नाही. या संततिनियमन पद्धतींचा स्विकार व्हायला आपल्या समाजात बराच काळ जावा लागला व त्यासाठी र धों सारख्या सुधारकांना आयुष्यभर झटावं लागलं. पण आज संततिनियमन बऱ्याचश्या प्रमाणात पसरलेलं दिसत आहे. शिवाय आता कायद्याने सुद्धा स्त्रियांना दोन पेक्षा जास्त अपत्ये जन्माला न घालण्याचे बंधन केले असल्याने स्त्रियांची या गर्भारपणातून लवकरच सुटका होऊ लागलेली आहे.
त्याच्या पुढच्या टप्प्यावर आलेल्या गर्भनिरोधक पर्यायांनी तर संततिनियमन अधिकच सोपं करून ठेवलं. यामुळे कोणत्याही शस्त्रक्रियांखेरीज संततिनियमन होऊ शकतं हा पर्याय समोर आला. शिवाय आपली इच्छा असेल तेव्हाच संतती जन्माला घालण्याचा चॉईस स्त्रियांना दिला. त्यामुळे कुटुंबनियोजन किंवा संततिनियमनाची शस्त्रक्रिया करण्याआधी सुद्धा गर्भारपणापासून सुटका मिळणे शक्य झाले. तरीही खरंतर आजही या निरोधकांचा प्रचार-प्रसार हव्या तेवढ्या प्रमाणात आपल्या देशात होताना दिसत नाही. पण किमान बहुसंख्य समाजात याविषयी जागृती झालेली आहे व आजच्या व अगदी काल परवाच्या तरूण पिढीसाठी सुद्धा गर्भनिरोधके हे एक वरदानच ठरलेले दिसत आहेत. यामुळे आता स्त्रियांच्या लैंगिक संबंधांवर हजारो वर्षांपासून असणारी बंधने हळूहळू गळून पडताना दिसत आहेत.
ज्या अनैच्छिक गर्भारपणाच्या समस्येमुळे स्त्रियांची लैंगिक संबंधांकडे बघण्याची मानसिकता नकारात्मक होत गेली होती, ती समस्याच आता सुटल्यामुळे पुन्हा एकदा स्त्रिया व एकूणच समाज सुद्धा लैंगिक संबंधांचा मोकळेपणाने विचार करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण अर्थात स्त्रियांची व आपल्या समाजाची अवस्था ही लहानपणापासून साखळदंडाने बांधलेल्या त्या हत्तीच्या पिलासारखी झालीय, ज्याला मोठेपणीसुद्धा ही जाणीवच राहिली नाही कि आता आपली ताकद हे साखळदंड सहज उखडून टाकण्याइतकी झालेली आहे. मानसिक गुलामी एकदा मनापासून स्विकारली कि मग त्या चौकटीबाहेरचा विचारच न करण्याची बहुतांशी समाजाची मानसिकता झाल्याने गर्भनिरोधकांनी आता स्त्रियांच्या मुक्त लैंगिक संबंधांसाठी केलेली सोय फारशी कुणाच्या लक्षातच येत नाही.
मी वर म्हटल्याप्रमाणे आज, काल व परवा ची तरुण पिढी मात्र याबाबत बऱ्यापैकी सजग असल्याचे जाणवते. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांना सुद्धा अनेकदा आता आपण मुक्तपणे लैंगिक संबंध ठेवू शकतो याची जाणीव व्हायला लागली आहे.
कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया व गर्भनिरोधके हे एक अर्थाने मुक्त लैंगिक संबंधांसाठी लाभलेले वरदानच आहे. त्याविषयी पुरेशी माहिती आधी घेऊन योग्य त्या गर्भनिरोधक पर्यायाचा वापर करून लैंगिक संबंधांचा अनुभव घेता येऊ शकतो. अर्थात त्याआधी लागणारी शारीरिक, वैचारिक, आर्थिक, सामाजिक, कायदेशीर व मानसिक सर्व प्रकारची तयारी होणे महत्वाचे आहेच. नको असलेल्या गर्भारपणाच्या समस्येमुळे स्त्रियांच्या लैंगिक इच्छांवर स्त्रियांनी स्वतःच लादलेली बंधने आता किमान काही स्त्रियांच्या मानसिकतेतून तरी कमी होण्याचा हा काळ दिसतोय. यापुढे हळूहळू एकूणच समाजाच्या मानसिकतेत सुद्धा असा बदल होत राहील व काही काळाने का होईना मुक्त लैंगिक संबंधांच्या बाबतीत खुलेपणा येईल अशी आशा आहे. आणि या सगळ्याचे श्रेय निश्चितच या गर्भनिरोधकांना जाईल यात शंका नाही.
- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा