शेअरिंग-केअरिंग - 21 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 6) - स्त्री-पुरुषांच्या लैंगिक इच्छा वेगवेगळ्या?- इतिहास
स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त कामेच्छा असते आणि त्यांची इच्छा लवकर पूर्ण होत नाही, म्हणून त्या लैंगिक संबंधात लवकर तृप्त किंवा समाधानी होत नाहीत असा एक समज अनेकांमध्ये असतो, जो अत्यंत चुकीचा आहे. मानवी लैंगिक संबंधांचा इतिहास पाहता, खरी परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यानुसार पुरुषांना कामेच्छा जास्त असते व त्या तुलनेने स्त्रियांना ती कमी असते. (लैंगिक इच्छा व लैंगिक तृप्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे इथे लक्षात घ्यावे. लैंगिक तृप्ती या विषयावर पुढे बोलूच, सध्या या लेखात लैंगिक इच्छेवर बोलूयात.)
याची कारणे आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासातच दिसतात. पुरुष अगदी सुरुवातीपासूनच कितीही मुक्तपणे लैंगिक संबंध ठेवू शकत होता, कारण त्यामुळे त्याच्याकडे कोणतेही गर्भारपण येणार नव्हते व त्यामुळे त्यांना जबाबदऱ्यांमध्ये अडकणेही नव्हते. स्त्रियांना मात्र लैंगिक संबंध करताना खूप गोष्टींचा विचार करावा लागे. लैंगिक संबंध करताना गर्भारपण येण्याची व त्यामुळे पुन्हा अनेक दिवस जबाबदऱ्यांमध्ये अडकण्याची, अवघडलेपण येण्याची व जीवघेण्या प्रसुतीला सामोरे जाण्याची भीती त्यांच्या मनात कायमच राहात आली. त्यामुळे जितके मुक्तपणे लैंगिक संबंध पुरुष अनुभवू शकत होते, तितक्या स्त्रिया कधीच अनुभवू शकल्या नाहीत. हे गर्भारपण नको म्हणून मग लैंगिक संबंधच टाळण्याकडे त्यांचा स्वाभाविक कल जास्त असायचा. मग जरी लैंगिक इच्छा स्त्रिया व पुरुषांच्या सारख्या असल्या तरी तुलनेने स्त्रियांना स्वतःच स्वतःवर अनेक बंधने लादून घ्यावी लागली. अर्थात तरीही काही स्त्रिया त्यातल्या त्यात जास्त मुक्तपणे लैंगिक संबंध ठेवू इच्छित असल्या व तशा त्या ठेवतही असल्या, तरी लगेच काही दिवसांतच गर्भारपण आल्याने नैसर्गिकरित्याच त्यांच्यावर पुन्हा बंधने येत असत. शिवाय प्रसुतीनंतर पुन्हा बाळाचे संगोपन करण्याची जबाबदारीही जास्त प्रमाणात तिच्यावरच येऊन पडत असे. त्यामुळे पुन्हा अनेक दिवस लैंगिक संबंधांवर बंधने येत असत. अर्थात लैंगिक संबंधांच्या उत्क्रांतीच्या या इतिहासातून इथं एक लक्षात येते कि ज्या स्त्रिया आपल्या लैंगिक इच्छांवर जास्त नियंत्रण ठेवू शकल्या व त्यामुळे खूप कमी वेळा लैंगिक संबंध ठेवले, त्यांनी तुलनेने कमी बाळांना जन्म दिला असल्याने त्यांचे वंशज पुढे कमी प्रमाणात आले असणार व ज्या स्त्रियांनी जास्त वेळा लैंगिक संबंध ठेवले, त्यांचे वंशज पुढे जास्त आले असणार. तसेच पुरुषांच्या बाबतीतही सांगता येईल. म्हणजे जे पुरुष जास्त काळजी वाहणारे, प्रेमळ व जबाबदारी पेलू शकणारे असतील, अशा पुरुषांना स्त्रिया जास्त प्राधान्याने निवडत व त्यामुळे अशाच पुरुषांचे वंशज पुढे जास्त संक्रमित झाले असणार. म्हणजे एकूण काय, तर लैंगिक इच्छा जास्त प्रमाणात नियंत्रित ठेवू शकणाऱ्या स्त्रिया व बेजबाबदार पुरुष यांच्या पुढच्या पिढ्या कमीकमी होत गेल्या असाव्यात व जास्त प्रमाणात लैंगिक संबंधास तयार असणाऱ्या स्त्रिया व जबाबदार पुरूष यांच्या पिढ्या जास्त वाढत गेल्या असाव्यात.
असे असले तरीही एक मात्र लक्षात घ्यावे लागेल कि दिवसेंदिवस तुलनेने पूर्वीपेक्षा स्त्रिया लैंगिक संबंधांच्या बाबतीत अधिकाधिक सावध व जोडीदार निवडीबाबत अधिक चोखंदळ होत गेल्या हेसुद्धा इतिहास सांगतो. पुढे जेव्हा शेतीचा शोध लागला व विवाहसंस्था उदयास आली आणि त्यात पुढे पुरुषसत्ताक व्यवस्था निर्माण झाली, त्यानंतर तर यामध्ये सत्ता, संपत्ती यांचाही संबंध यायला लागला. स्त्रीच्या पोटी जन्माला येणारे संतान नेमके कुणाचे आहे (म्हणजे कोणत्या पुरुषाचे आहे) हे कळणे पुरुषांना जास्त महत्वाचे वाटू लागले. उगाच दुसऱ्या पुरुषाच्या वंशजाला मी का पोसायचे? हा प्रश्न आला. मग जाणीवपूर्वक स्त्रियांच्या लैंगिक संबंधांवरच बंधने घातली जाऊ लागली. पुढे धर्मव्यवस्था अस्तित्वात आल्यावर तर स्त्रियांच्या लैंगिक संबंधांवरील अशा बंधनांना पावित्र्य दिले गेले. या सगळ्यातून पुरुष मात्र नेहमीच सुटत गेले. त्यामुळे पुरुषांच्या व स्त्रियांच्या लैंगिक संबंधांमध्ये दिवसेंदिवस, पिढ्यानपिढ्या खूपच अंतर वाढत गेले. अर्थात त्यामुळे स्त्रियांची लैंगिक इच्छा पुरती कमी झाली असे नाही; पण 'स्त्रियांनी लैंगिक इच्छेवर नियंत्रण ठेवायचे असते' व 'स्त्रियांनी लैंगिक संबंधांचा फार विचार करायचा नसतो'. 'आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवायचे व त्याच्याच वंशाला वाढवायचे' वगैरे वगैरे अशा बंधनांचा स्त्रियांच्या मनावर सततचा मारा करत राहिल्याने स्त्रियांच्या मनात लैंगिक संबंधांविषयी नकारात्मक मानसिकता तयार होत गेली. आजही स्त्रियांना लहानपणापासून याच संस्कारात वाढवले जात असल्याने लहानपणापासून लैंगिक संबंध हे जवळपास वाईटच अशीच मानसिकता अनेक स्त्रियांची असते. आजूबाजूच्या समाजाची सुद्धा हीच मानसिकता असते आणि त्यामुळेच स्त्रियांच्या लैंगिक संबंधांबाबत समाज जास्त संवेदनशील असतो.
यातून एक लक्षात येते कि स्त्रिया व पुरुषांच्या लैंगिक इच्छा मुळात सारख्याच असतील असं जरी मानलं, तरी स्त्रियांच्या इच्छांवर अनेक बंधनं लादल्याने आज दोघांच्या इच्छांमध्ये बरीच तफावत असल्यासारखे जाणवते. यात शास्त्रीयदृष्ट्या टेस्टेस्टेरॉनचे पुरुषांमध्ये जास्त व स्त्रियांमध्ये कमी असणारे प्रमाण हे कारणीभूत असले तरी टेस्टेस्टेरॉनच्या प्रमाणात सुद्धा वरील प्रकारच्या पिढ्यानपिढ्या लादलेल्या अनैसर्गिक बंधनांमुळे बरेच औत्क्रांतिक बदल घडले असावेत का? हा प्रश्न आहेच.
सध्याच्या आधुनिक युगात नवीन पिढीमध्ये आता यात अनेक बदल होताना दिसतायत यावर आपण पुढच्या लेखात पाहूच.
- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
(आपल्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव नक्की कळवा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा