शेअरिंग-केअरिंग - 20 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 5) - लैंगिक इच्छा व्यक्त करताना
आपल्या लैंगिक इच्छा व्यक्त कशा करायच्या? यावर आजपर्यंत आपल्याशी ना कोणी बोललेले असते, ना कुठे यावर मार्गदर्शन दिले जाते. उलट अशी इच्छा व्यक्त करणेच आजपर्यंत कुठे गृहीत धरलेले दिसत नाही. पण ही इच्छा तर प्रत्येकाच्याच मनात असते आणि ती अनेकांच्या मनात अनेकदा तीव्र प्रमाणात सुद्धा असते हेही तेवढेच सत्य आहे. या इच्छेचे सतत दमन करत राहणे योग्य नाही आणि असं करण्यातून अनेक मानसिक, शारीरिक व सामाजिक प्रश्न निर्माण होतात हेही जवळपास सर्वांनाच मान्य आहे. पण तरीही या विषयावर उघडपणे कोणीच बोलत नाही आणि त्यामुळे ही इच्छा समस्या बनत जाते आणि याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यासाठी सर्वप्रथम लैंगिक इच्छांचा सन्मानाने स्विकार करायला आपण शिकायला हवं. माझ्या मनात एखाद्याबद्दल लैंगिक संबंधाची इच्छा निर्माण होणे हे वाईट किंवा चुकीचे नसून उलट मी मेडिकली फिट असण्याचेच लक्षण आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. हे जसे आपल्या स्वतःच्या बाबतीत तसेच इतरांच्या बाबतीतही आहे- म्हणजे एखाद्याला माझ्यासोबत लैंगिक संबंध करण्याची इच्छा होणे यात वाईट किंवा चुकीचे काहीच नाही. असंच आपल्या परिचयातील इतर कुणाला कुणाबद्दल लैंगिक संबंधाची इच्छा होत असेल तर यातही काही वाईट नाही. त्यामुळे सर्वप्रथम तर मी त्याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता ती एक नैसर्गिक गोष्ट म्हणून त्याकडे पाहायला हवे. मग पुढच्या टप्प्यावर त्या व्यक्तीला सुद्धा माझ्यासोबत किंवा मला सुद्धा त्या व्यक्तीसोबत किंवा त्या इतर कुणाला सुद्धा त्या इतर कुणाशी लैंगिक संबंधांची इच्छा असेल तर दोघेही संगनमताने इतर सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून मग पुढे जाऊ शकतात. पण समजा जर यातील कुणाच्या मनात समोरच्याबद्दल तशी भावना नसेल, तर मात्र ती स्पष्टपणे, समोरच्याला न दुखावता सांगितली गेली पाहिजे व समोरच्याकडूनही ती तेवढ्याच सकारात्मकतेने स्विकारली गेली पाहिजे. याउपर जर कोणी वारंवार त्रास देत असेल तर मात्र त्यांच्याबद्दल तक्रार करायला हवी व अशा व्यक्तींपासून सावध ही राहायला हवं.
आता लैंगिक इच्छा व्यक्त करताना नेमकी कशी करावी? हा प्रश्न पुन्हा उरतोच. कारण असं कुणालाही डायरेक्ट विचारून चालणार नाही. तसं केलं तर मार खाण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे त्याबाबतही काही पथ्ये पाळायलाच हवीत. सर्वांत प्रथम हे लक्षात ठेवायला हवे की आपल्याला अनेक व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण असते, असू शकते. अनेक व्यक्तींसोबत लैंगिक संबंधांची इच्छा आपल्या मनात येऊ शकते. इच्छेला, विचारांना किंवा स्वप्नांना काय कशाचीच मर्यादा नसते. पण म्हणून ज्याच्याबद्दल लैंगिक संबंधांची इच्छा होईल त्या सर्वांसोबतच आपल्याला तशी संधी मिळणे शक्य नसते. त्यामुळे उगाचच अवास्तव अपेक्षा ठेवून चालणार नाही. जसे आपल्याला रस्त्याने चालताना अनेक वस्तू आवडत असतात; पण म्हणून त्या सर्वच वस्तू घ्यायचा अट्टाहास आपण करत नाही. त्यातील आपल्या बजेटमध्ये बसेल व गरजेची वाटेल अशीच वस्तू आपण विचारपूर्वक घेतो. तेच इथेही लागू होते. मनात कितीही व्यक्तींबद्दल, कुणाही सोबत व कितीही वेळा तुम्ही ही कल्पना करू शकता, पण प्रत्यक्षात अनेकदा तशी अपेक्षा अवास्तव ठरते.
तर आपल्या लैंगिक इच्छा व्यक्त करण्याआधी एक विचार करावा कि आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण वाटतंय, त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल तसं थोडंफार तरी आकर्षण वाटत असेल तरच आपण त्यांच्याबाबत पुढे विचार करायला हवा. त्यासाठी आधी त्या व्यक्तीशी व्यवस्थित ओळख असायला हवी. सततच्या बोलण्यातून एकमेकांच्या भावना, विचार, स्वभाव आपल्याला कळत जातात. हे लक्षात घेऊनच त्यांच्या स्वभावानुसार त्यांना राग येणार नाही किंवा वाईट वाटणार नाही अशा पद्धतीनेच आपण समोरच्याला विचारायला हवं. त्यानंतर समोरच्याने नकार दिला तरी आपण ते सकारात्मक रित्याच घेऊ असा विश्वासही त्यांना करून द्यायला हवा व तसं व्हायलाही हवं.
एकूणच एखाद्याच्या मनात एखाद्याबाबत लैंगिक संबंधांची इच्छा निर्माण होणे हे जितके साहजिक व नैसर्गिक आहे, तेवढेच एखाद्याच्या मनात एखाद्याबद्दल अशी इच्छा न वाटणे हेसुद्धा साहजिक आणि नैसर्गिक आहे हे लक्षात घेऊन दोन्ही भावनांचा व दोन्ही व्यक्तींचा तितकाच आदर आपण करायला हवा. आपल्या लैंगिक इच्छा कुणावर लादण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक इच्छा, आवडी-नावडी, विचार, भावना हे सगळं वेगवेगळं असतं हे लक्षात घेऊन आपण सर्वांचा सन्मानच करायला हवा. लैंगिक इच्छा व्यक्त करण्याआधी किमान एकमेकांबद्दल तेवढा विश्वास असणे गरजेचे आहे हेसुद्धा लक्षात ठेवावे.
- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
Kharach parat ekada spashat Ani muddesud shabdachi mandanine aspashat gholanara vishay spasht mandalas
उत्तर द्याहटवाथँक्स प्राजक्ता👍
हटवा