मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 2) - मनातील लैंगिक इच्छा

शेअरिंग-केअरिंग - 16
*मुक्त लैंगिकतेच्या दिशेने*
      *(पर्व 2 - भाग 2)*
*मनातील लैंगिक इच्छा*
------------------------------
मला सेक्स हवाय. मला सेक्स करण्याची खूप इच्छा होतेय. ही वाक्यं कधी आपल्या कानावर पडली आहेत का हो? मित्र-मैत्रिणींकडून, सहकाऱ्यांकडून, आजूबाजूच्या लोकांकडून, नातेवाईकांकडून किंवा किमान जोडीदाराकडून तरी? बरं किमान आपण स्वतः तरी आजपर्यंत असं कुणाला बोललोय का?
नाही ना? का बरं? अशी इच्छा कधी कुणाला होतच नसते म्हणून का? कि कितीही इच्छा झाली असली तरी असं बोलायचं नसतं अशी अलिखित रीत आपल्या समाजात आहे म्हणून? शीss, हे असलं कुठं बोलायचं असतं का? असंही अनेकांच्या/अनेकींच्या मनात येत असेल.
मला खूप भूक लागलीय, मला खूप तहान लागलीय किंवा मला खूप झोप येतेय हे आपण जितक्या सहजपणे एकमेकांना सांगू शकतो, तितक्या सहज आपल्या लैंगिक गरजा सांगू शकतो का? मान्य आहे कि लैंगिक संबंध किंवा लैंगिक गरज हा खूप खाजगी मुद्दा आहे आणि तो आपण इतक्या सहज कुणालाही जाहिररित्या सांगू शकत नाही. पण किमान आपल्या जोडीदाराला तरी कधी आपण हे सांगू शकलोय का? आपल्या जवळच्या मित्राला/मैत्रिणीला, आपल्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीला तरी कधी बोललोय का? आणि बोललोच समजा तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ते हे सहज स्विकारतील का? कि आपल्याकडे जणू आपणच गलिच्छ असल्याच्या नजरेने पाहतील? आपल्याबद्दल वाईट मत बनवून घेतील आणि आपल्या चारित्र्यावर शंका घेतील? झालंच तर इतरत्र आपली बदनामी सुद्धा करतील. आणि हे सगळं का? तर आपण फक्त आपल्या मनातील प्रामाणिक इच्छा बोलून दाखवली म्हणून. बरं हे बोलून न दाखवल्याने आपल्या किंवा समोरच्याच्या मनातील ही लैंगिक इच्छा कमी होईल का? कि ती आतल्या आत अधिक वाढत जाईल? बाहेर वेगळे आणि मनात मात्र वेगळेच विचार चालू राहतील आणि यातून पुढे दोघांना किंवा दोघांपैकी एकाला त्रास किंवा वेळप्रसंगी जबरदस्ती सुद्धा होण्याची शक्यता आहे? 
याउलट समोरची व्यक्ती जर तिच्या मनातील लैंगिक भावना, लैंगिक इच्छा (मग त्या आपल्याबद्दल असो वा इतर कुणाबद्दल) मोकळेपणाने व्यक्त करू शकली तर आपल्याला त्या व्यक्तीच्या मनातील विचार समजायला मदतच होईल. ती इच्छा इतर कुणाबाबत असो किंवा आपल्याबाबत असो, त्यासंबंधी त्या व्यक्तीशी संवाद साधता येऊ शकतो. आपली इच्छा नसेल तर तसे सौम्य व स्पष्ट भाषेत सांगता येऊ शकते. या मोकळ्या संवादातून समोरच्या व्यक्तीच्या मनातील लैंगिक इच्छांची तीव्रता सुद्धा लक्षात येऊ शकते. त्यातून आपल्याला काही धोका आहे का? हे सुद्धा लक्षात येऊ शकते. तसे नसेल तर मोकळेपणाने बोलल्याने आपलं नातं अधिक छान होऊ शकेल.
आपल्या मनातही एखाद्याबद्दल अशी इच्छा असेल तर वरीलप्रमाणे मोकळ्या संवादाने आपलं नातं अधिक चांगलंच होईल, निदान प्रामाणिक तरी राहील. आत एक आणि बाहेर वेगळं अशी लपवाछपवी आणि त्यातून येणारा अपराधीपणा यात असणार नाही.
आणि समजा, दोघांनाही आवडणार असेल, शक्य असेल आणि तयारी असेल तर दोघेही लैंगिक संबंधांचा मुक्त आनंदही घेऊ शकतील.
अर्थात या लैंगिक इच्छा व्यक्त करताना काही अतिशय महत्वाच्या गोष्टी मात्र आधी लक्षात घ्याव्या लागतील. त्यांच्यावर पुढच्या लेखात सविस्तरपणे बोलूयातच. मुक्त लैंगिक संबंधांच्या बाबतीत सुद्धा अनेक गोष्टी आधी समजून घेणे गरजेचे आहे. त्याविषयी सुद्धा पुढे सविस्तर बोलूच.

- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
ब्लॉगची लिंक:- https://sachinthite1.blogspot.com/?m=1
(या आधीचे सर्व लेख वाचण्यासाठी वरील ब्लॉगला नक्की भेट द्या.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध