मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2- भाग 1)
*शेअरिंग-केअरिंग - 15*
*लैंगिकतेच्या बंदिस्त चौकट्यांकडून..*
*मुक्त लैंगिकतेच्या दिशेने*
*(पर्व 2 - भाग - 1)*
काल समाजस्वास्थ्य हे नाटक पुन्हा एकदा पाहिलं. (नाटकाची लिंक:- https://youtu.be/rF3v7-S4BPM) सोबतच समाजस्वास्थ्य ची छोटी पुस्तिका, जी त्या नाटकाच्या वेळीच सर्वांना वाटली गेली होती, तिचे पण वाचन सुरू आहे. रघुनाथ धोंडो कर्वे अर्थात र धों कर्वे यांनी 1930-40 च्या सुमारास मांडलेली लैंगिकतेबद्दलची मते आपला समाज आजसुद्धा मान्य करू शकलेला नाहीये हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं. मान्य करणं तर दूरच, पण त्याबद्दल बोलणे सुद्धा वर्ज्य आहे. जवळपास 100 वर्षांपूर्वी र धों नी केलेली क्रांतिकारक मांडणी आजसुद्धा तेवढीच किंबहुना त्याहूनही अधिक धाडसाची वाटते ही शोकांतिका आहे. म्हणजे समाज म्हणून आपण इतर अनेक बाबतीत विकसित होत असताना लैंगिकतेच्या बाबतीत मात्र अधिकाधिक मागासत चाललोय का? कि याबाबतीतील आपली प्रगती अजूनही 100 वर्षांमागेच अडकून पडलेली आहे? असे प्रश्न पडायला लागलेले आहेत. र धों जर आज असते तर त्यांनी केलेली 100 वर्षांपूर्वीची मांडणी त्यांनी आज 100 वर्षानंतर कशी केली असती हा ही विचार पडत आहे.
मुक्त लैंगिकतेच्या दिशेने विचार करत असताना अल्बर्ट एलिस तर आधीपासून सोबत आहेच; पण त्यात नव्याने हाती आलेले डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी रूपांतरित केलेले 'संभोग का सुखाचा?' हे पुस्तक आणि समाजस्वास्थ्य हे नाटक व पुस्तिका आणि त्यांच्या माध्यमातून भेटलेले र धों कर्वे यांच्यामुळे या विचारांना अधिक बळ व योग्य दिशा मिळायला नक्कीच मदत होत आहे.
त्यामुळेच आता *'मुक्त लैंगिकतेच्या दिशेने'* या विषयावरचे दुसरे पर्व सुरू करायला घेत आहे. पहिल्या पर्वात *'ती, तो आणि लैंगिक संबंध'* या नावाने एकूण 11 भागांमध्ये लेखन केलेले आहे. ते सर्व एकत्रितपणे माझ्या ब्लॉगवर वाचता येऊ शकतात. ब्लॉगची लिंक खाली देत आहेच.
दुसऱ्या पर्वामध्ये आता पुढच्या टप्प्यावर अधिक स्पष्टपणे मांडणी करण्याचा प्रयत्न असणार आहे. मागच्या पर्वातील अनेक वाचकांच्या काही अनुत्तरित प्रश्नांना देखील यात सविस्तर उत्तरे मिळणार आहेत. या विषयावर बोलण्याची हिंमत फारशी कुणाची होत नाही हे मागच्या लेखमालेत लक्षात आले आहे; पण त्याचवेळी व त्याचमुळे या लेखमालेची अधिक गरज सुद्धा जाणवत आहे. या अतिशय महत्त्वाच्या विषयाला वाचा फुटावी व याविषयी समाजमनात मोकळेपणा यावा यासाठीचा हा प्रयत्न आहे. मागच्या वेळी ज्यांनी प्रत्यक्ष मेसेज व कॉल करून प्रतिक्रिया दिल्या, संवाद साधला, समस्या सांगितल्या, एकूणच जे काही शेअर केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून कौतुक, अभिनंदन व धन्यवाद. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया मी फेसबुक पेजला अपडेट केल्याच आहेत. अनेकांच्या काही खाजगी प्रतिक्रिया किंवा शेअरिंग असल्याने ते जाहीर केले नाही, पण त्या अनुषंगाने लिहायचा प्रयत्न केला आहे व पुढच्या लेखांतही करणार आहे.
वाचकांचा असाच प्रतिसाद कायम राहावा व हा छोटासा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वांचे सहकार्य राहावे अशी अपेक्षा आहे.
या विषयाबद्दल मेसेज किंवा कॉल वर बोलताना अनेकांना संकोच वाटतो, हे लक्षात आल्याने माझा इमेल आयडी देखील खाली देत आहे. त्यावर मोकळेपणाने आपलं म्हणणं मांडा, मनातलं जे काही शेअर करावं वाटत असेल ते शेअर करू शकता. तुमची ओळख गुपित राहील याबद्दल खात्री बाळगा.
- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
ब्लॉगची लिंक:- https://sachinthite1.blogspot.com/?m=1
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा