शेअरिंग-केअरिंग - 19 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 4)

लहान वयात लग्न झालं. लग्नाला 15 वर्षे होत आली. मुलंही आहेत. पण एवढ्या वर्षांत कधी पुरेसे लैंगिक सुख म्हणावे असे कधी तिला भेटलेच नाही. शिवाय ही गोष्ट अशी की कुणाला सांगताही येत नाही. बरं त्याला अजिबातच काही जमत नसतं तर निदान ते कारण सांगून या नात्यातून मोकळं तरी होता आलं असतं आणि दुसरं जोडता आलं असतं. त्यात परत माणूस म्हणून तो खूपच चांगला आहे. पुन्हा असा चांगला माणूस मिळेल का ही शंका आहेच. या सगळ्या विवंचनेत कशी वर्ष निघून चाललीयत माहीत नाही, पण आजही जेमतेमच कधीतरीच लैंगिक सुख अनुभवयास मिळते. खूप कोंडी होतेय, आतून खूप इच्छा होतेय मनसोक्त लैंगिक सुख घेण्याची. पण काहीच पर्याय नाही. 
अशी एक नाही, अनेक उदाहरणं प्रत्यक्ष पोचली आमच्यापर्यंत. ती घालमेल पाहूनच अस्वस्थ व्हायला होतं.
माझी जोडीदार मला पुरेसे लैंगिक सुख मिळू देण्यात असमर्थ आहे. मला कधीकधी खूप अस्वस्थ होतं. मी काय करू? लग्नानंतर बाहेर संबंध ठेवणे योग्य आहे का? विवाहबाह्य संबंध ठेवणे गैर आहे का? पाप आहे का? अशी विचारणा करणारे अनेक पुरुषही या लेखमालेच्या निमित्ताने भेटले. अर्थात यात पुरुषांची स्थिती जेवढी गंभीर वाटली, त्यापेक्षा तुलनेने स्त्रियांची अधिक भयानक जाणवली हे मात्र नक्की. अर्थात याचे कारण हेच आहे कि आपली इच्छा असेल तेव्हा स्त्रीकडून ती ओरबाडून, जबरदस्तीने भागवून घेणारे पुरूष समाजात संख्येने जास्त आहेत आणि त्याला बऱ्यापैकी समाजमान्यता ही आहे. पण त्याचवेळी स्त्रीच्या इच्छेचा आदर करणारे, तिच्या इच्छेशिवाय संबंध ठेवायचे नाहीत असं मत असणारे किंवा असं मत जरी नसलं तरी मनात येऊनही जबरदस्ती करू न शकणारे असे पुरुषही आहेतच हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे आणि अशा पुरुषांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. यात जबरदस्ती करणे हे फक्त वाईटच नाही तर गुन्हेगारी कृत्य आहे आणि अशांना कायदेशीर शिक्षाच व्हायला हवी यात शंकाच नाही. पण इतर अनेक पुरुषांना वैवाहिक जोडीदार त्यांच्यापेक्षा कमी लैंगिक अपेक्षा व क्षमता असणारी भेटली कि वरील स्त्रियांच्या बाबतीत असणारी लैंगिक इच्छांची घुसमट आणि त्यातून सततची अस्वस्थता यांच्याही वाट्याला येतच असते. शिवाय पुरुष म्हणून त्यांनी अशी गाऱ्हाणी कुणाकडे करत बसण्याची समाज त्यांना परवानगी देत नाही. त्यामुळे अनेकदा पुरुष मनातील घुसमट कुणाला सांगूच शकत नाही किंवा सांगितली तरी तेवढ्या मोकळेपणाने सांगितले जात नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील भावनांची तीव्रता अनेकदा लक्षातच येत नाही. (पुरुष जास्त हिंसक बनण्याची कारणे सुद्धा अनेकदा या भावनिक घुसमटीत असतात.) 
यात खरं तर किती सोपं झालं असतं ना - जर अशा लैंगिक इच्छा अपुऱ्या राहिलेल्या या स्त्रियांना त्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करू शकणारे इतर जोडीदार (स्त्री किंवा पुरुष) सहज मिळू शकले असते आणि लैंगिक इच्छा अपुरी राहिलेल्या पुरुषांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील असे इतर जोडीदार (स्त्री किंवा पुरुष) सहज मिळू शकले असते आणि त्यांना समाजाकडून कोणताही त्रास न देता, अवमान न करता आदराने मान्यता मिळाली असती? 
खरंच असं करणं आपल्याला शक्य आहे का? एक असा समाज- जिथे कसलेही लैंगिक बंधन नसेल. प्रत्येकाला आपापले लैंगिक जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. यात कुणावरही जबरदस्ती होणार नाही व स्वेच्छेने आणि एकमेकांच्या संमतीने, एकमेकांच्या आनंदासाठीच केलेले लैंगिक संबंध असतील. अशा समाजात लैंगिक अस्वस्थता, जबरदस्ती, त्रास, घुसमट असं काहीही नसेल.  लैंगिक संबंधांकडे खूप नैसर्गिक म्हणून, प्रेमाचे व मनसोक्त आनंदाचे प्रतिक म्हणून पाहिले जाईल. अशा मुक्त लैंगिक प्रेरणा, जाणिवा, भावना, विचार व कृती असणारा समाज निर्माण होणे हेच र धों चे स्वप्न असेल का?

- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
ब्लॉगची लिंक:- https://sachinthite1.blogspot.com/?m=1
(आपल्या प्रतिक्रिया, मत, अनुभव वरील व्हाट्सअप्प नंबर वर/इमेल वर/फेसबुकवर जिथे शक्य असेल तिथे नक्की मोकळेपणाने शेअर करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध