शेअरिंग-केअरिंग - 17 - मुक्त लैंगिकतेच्या दिशेने - (पर्व 2 - भाग 3) - र. धों. ना आठवताना

एक लग्नाची बायको असताना दुसरीशी संबंध ठेवणे किंवा एक नवरा असताना दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवणे म्हणजे जर व्यभिचार असेल, तर असे व्यभिचार तर देवाला सुद्धा मान्य होते असे म्हणावयास सक्षम आधार आहे. कारण ज्याला भगवान म्हटलंय असा भगवद्गीता या ग्रंथाचा प्रणेता, हजारो गोपींचा कान्हा असणारा श्रीकृष्ण, त्याचे मित्र पांडव, नवऱ्याशिवाय इतर सहा पुरुषांसोबत संबंध ठेवून त्यांच्यापासून होणाऱ्या मुलांना जन्म देणारी आई कुंती आणि पाच-सहा पुरुषांना नवरा मानून त्यांच्यासोबत संबंध ठेवणारी बायको द्रौपदी या सर्वांनी तर या अशा व्यभिचाराचे धडेच घालून दिले आहेत. आपल्या इतरही अनेक पुराणग्रंथांत बायकोशिवाय इतर स्त्रियांशी संबंध ठेवण्याची अनेक प्रयोजने करून ठेवलेली पानोपानी दिसतात आणि त्यांचे वेळोवेळी फायदे घेणारे धर्ममार्तंड किंवा ज्यांना देव म्हटलं गेलंय असेही अनेकजण दिसतात. त्यामुळे उगाच धर्माचा आधार घेऊन किंवा भिती दाखवून व्यभिचाराचा बागुलबुवा उभा करणाऱ्या सनातन्यांना घाबरायची काहीही गरज नाही.

अर्थात वैज्ञानिक दृष्टीने विचार करणाऱ्या कुणालाही या धार्मिक विवेचनांचा आधार घ्यायची काहीही गरज नाही. 

*विवाहानंतर ठेवलेले लैंगिक संबंध आणि विवाहाशिवाय ठेवलेले लैंगिक संबंध यात मला काहीही फरक वाटत नाही. कारण केवळ भटांच्या बडबडण्याने त्यात काहीही बदल होत नसतो. त्यामुळे ज्याच्याशी विवाह केला आहे त्याच्याबरोबर ठेवलेले लैंगिक संबंध असोत कि त्याच्याव्यतिरिक्त इतर विवाहित किंवा अविवाहित स्त्री-पुरुषांशी ठेवलेला लैंगिक संबंध असो यात कुठलाही फरक नाही.*

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचारास मान्यताच जणू आणि त्यामुळे ते वाईटच. नियम मात्र कितीही वाईट असले तरी ते स्वातंत्र्यापेक्षा बरे. हे तत्वच मुळी चुकीचे आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. समूहात राहताना काही नियम असावेत हे मान्य, पण ते नियम जितके जास्त तितका मनुष्य नीतिमान होतो हे गृहीतक चुकीचे. 'शक्य तितक्या बाबतीत स्वातंत्र्य देऊन फक्त अगदीच गरज असेल तिथेच नियम' हे समंजस समाजाचे ध्येय असायला हवे.

व्यभिचार (म्हणजे विवाहित व्यक्तींनी ज्यांच्याशी विवाह झाला आहे, त्यांच्या व्यतिरिक्त इतरांशी केलेला समागम (सेक्स) किंवा विवाहाआधी केलेला समागम) करताना योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून कुणालाही काहीही नुकसान नसून झालेच तर उलट फायदाच आहे. कारण अशा समागमामध्ये समागम वैचित्र्याचा (एका पेक्षा जास्त व्यक्तींसोबत सेक्स (Multi Partner Sex)करण्याचा)  विलक्षण अनुभव दोघांनाही घेता येऊ शकतो. तात्विक दृष्टीने विचार केल्यास कोणीही समंजस व्यक्ती सहज मान्य करील कि- *सर्वांत उच्च दर्जाचा समागम (सेक्स) म्हणजे ज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे त्यांचा समागम.* विवाहामध्ये प्रत्येक वेळी प्रेम असेलच असे नाही, पण व्यभिचार करताना मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम असते व दोघांनाही त्यात आनंद वाटत असतो म्हणूनच ते सेक्स (समागम) करत असतात.

मुळातच सेक्स (समागम) हेच आपल्याकडे पाप म्हणून सांगितले गेले व केवळ भटांच्या बडबडण्याने त्या पापाला परवानगी मिळते असा मूर्खपणा शिकवला गेला. त्यातून बाहेर पडायला हवे. जेणेकरून ज्यांना समागम वैचित्र्याचा (एकापेक्षा अधिक व्यक्तींशी सेक्स करण्याचा) अनुभव घ्यायचा असेल, त्यांना तो मुक्तपणे घेता येईल व त्याला जोडलेली बेअब्रूची कल्पना संपली तर त्यातून येणारा मानसिक त्रासही संपेल.
पैशासाठी नाईलाजाने अनेक पुरुषांशी संबंध ठेवावे लागणारी सेक्स वर्कर (वेश्या) व लग्नाच्या बंधनामुळे इच्छा नसतानाही नाईलाजाने एकाच व्यक्तीशी वारंवार संबंध ठेवावे लागणारी बायको यांच्यात तसे पाहता काहीही अंतर नाही; कारण दोघीही मनाविरुद्धच समागमास बांधील असतात.

लैंगिक संबंध हे फक्त स्त्री व पुरूष यांच्यात (भिन्नलिंगी- Heterosexual) असतील तरच ते नैसर्गिक व दोन स्त्रिया (Lesbian) किंवा दोन पुरुष (Gay) किंवा स्त्री आणि पुरुष दोघांशी (Bi-sexual) असतील तर ते अनैसर्गिक असे म्हणायचे काहीही कारण नाही. आपल्याला ज्या पद्धतीच्या समागमामध्ये आनंद मिळतो, तो मिळवण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. अशा पद्धतीने समलिंगी किंवा दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबाबत आकर्षण वाटणे ही भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाटण्या इतकीच नैसर्गिक गोष्ट आहे, हे लक्षात घ्यावे.

संततिनियमन ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्त्री किंवा पुरुष कुणावरही शस्त्रक्रिया करून समागमाची इच्छा जराही कमी न करता फक्त प्रजोत्पादन शक्ती नाहीशी करता येते. हे न केल्याने मात्र अनेक स्त्रियांवर अनैच्छिक गर्भारपण लादले जाते व यामुळे एकूणच लोकसंख्येचा मोठा सामाजिक प्रश्नही निर्माण होतो.

*- संपूर्ण लेखन- र धों कर्वे*

(100 वर्षांपूर्वी केलेले हे लेखन थोडक्यात फक्त आजच्या कालसुसंगत काही छोटे बदल करून लिहिले आहे.
संदर्भ:- 'समाजस्वास्थ्य' ही पुस्तिका व 'समाजस्वास्थ्य' हे नाटक.)

समाजाचे स्वास्थ्य टिकावे यासाठी धडपडणारा हा सुधारक समाजासाठी आयुष्यभर खस्ता खाऊनही शेवटी उपेक्षितच राहिला. र धों गेले तेव्हा त्यांच्याकडे अत्यल्प रक्कम शिल्लक होती आणि ते गेल्याची दखलही त्या काळच्या समाजाने किंवा सरकारने घेतली नाही ही आपली केवढी शोकांतिका आहे. ब्रिटिशांच्या राजकीय गुलामीतून स्वतंत्र झालो तरी स्वतःच्या मानसिक गुलामीतून आपण कधीच मुक्त झालो नाही. आजही समाजाला अशा र धों ची गरज आहे. पण र धों चा मार्ग सोपा नाही. तो तेव्हाही सोपा नव्हता आणि आज तर तो त्याहून अधिक अवघड, जीवघेना झालाय. तेव्हा फक्त खटले दाखल करणारी आणि धमक्या देणारी सनातन्यांची आणि धर्म मार्तंडांची पिलावळ आता हातात शस्त्र घेऊन सज्ज झालीय. आता ते खटले घालत नाहीत, तर थेट गोळ्याच घालतात. या गोळ्या फक्त सुधारकांवर चालत नाहीत, तर समाजाच्या छाताडावरच आघात करत असतात हे आपल्या बहुसंख्य समाजाला अजूनही उमगलेले नाही.
तरीही एकीकडे सनातन्यांच्या विरोधाला झेलत आणि दुसरीकडे समाजाकडून होणारी उपेक्षा झेलत र धों ना जिवंत ठेवण्याची धडपड करणारे र धों चे वैचारिक वारसदार नेटाने खिंड लढवत राहतील.
चला, आपणही या प्रयत्नात सामील होऊयात. लैंगिकतेच्या बंदिस्त चौकट्या तोडून मुक्त लैंगिकतेच्या दिशेने वाटचाल करूयात. एका बंधनमुक्त समाजाची रचना करूयात.
*आज र धों च्या जन्मदिवसानिमित्त हाच संकल्प घेऊन र धों ना पुन्हा जिवंत करूयात.*💐

- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
ब्लॉगची लिंक:- https://sachinthite1.blogspot.com/?m=1

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध