'ती' चिमणी सध्या काय करतेय?
एक मोठं घनदाट जंगल होतं. त्या विशाल घनदाट जंगलाच्या कुशीत अनेक वेगवेगळे पशु, पक्षी, किटक व वेगवेगळे जीव गुण्यागोविंदाने राहत होते. त्या जंगलात अनेक झुळझुळ वाहणारे निखळ, नितळ व स्वच्छ पाण्याचे लहान-मोठे झरे होते व अनेक विशालकाय पांढऱ्या-शुभ्र रंगाचे उंचावरून कोसळणारे, दुरूनच लक्ष वेधून घेणारे व दूरवर पोचणारे आणि अनेकांना आपल्या प्रेमात पाडणारे असे धबधबे सुद्धा होते.
सगळे प्राणी, पक्षी व जीव एकोप्याने रहात दिवसेंदिवस या जंगलाची शान वाढवत होते. साऱ्या जगाला या जंगलाचा हेवा वाटायचा.
अचानक एके दिवशी या जंगलामध्ये एक मोठा वणवा पेटतो व तो बघता बघता सगळे जंगलच जाळून राख करील कि काय? अशी भिती वाटायला लागते. त्या वणव्याला पाहून जंगलातील काही प्राणी खूप घाबरतात व तिथून पळून जाऊ लागतात. काही जुने जाणते प्राणी मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आपापल्या वाटेने चालत राहतात, जणू काही घडलेच नाही. त्यांच्या मते ही काय खूप गंभीर गोष्ट नव्हती. इतक्या मोठ्या जंगलात अशा प्रकारचे लहान सहान वणवे लागणारच! असं त्यांचं मत होतं आणि त्याची धग संपली कि तो वणवा आपोआप विझेल असा त्यांचा दृढ विश्वास होता. शिवाय काही करायचेच झाले, तर या जंगलाची जबाबदारी पाहणारे मुख्य प्राणी आहेतच की. ते त्यांचं काम व्यवस्थित करतील, अशा ठाम विश्वासाने हे काही प्राणी आरामात होते. दुसरीकडे ज्यांच्यावर या जंगलाची जबाबदारी होती ते आणि ज्यांच्यावर जंगलातील इतर प्राण्यांचा प्रचंड विश्वास होता असे सगळे मुख्य प्राणी मात्र त्यावेळी आपापसांत सत्ता संघर्ष करण्यात व या वणव्यानंतरचे जंगल कुणाच्या ताब्यात राहणार? याविषयी तयारी करण्यात मश्गुल झाले होते.
अशा वेळी या जंगलातील काही चिमण्या (आपल्या 'त्या' आधीच्या गोष्टीतील चिमणीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या) मात्र ही आग पाहून अस्वस्थ झालेल्या होत्या. दिवसेंदिवस वाढत जाणारी आग पाहून या अस्वस्थ झालेल्या काही चिमण्यांनी या जंगलातील मुख्य प्राण्यांना या आगीविषयी सांगायला व ती लवकरात लवकर विझवण्यासाठी आग्रह धरायला सुरूवात केली. पण सुरुवातीला या प्राण्यांनी चिमण्यांकडे दुर्लक्ष केले. मग या चिमण्या ओरडून ओरडून जंगलातील इतर प्राण्यांना पण याविषयी सांगायला व सावध करायला लागल्या. त्यातून जेव्हा अजून काही प्राणी सुद्धा चिमण्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत त्यांच्या मदतीला धावून येऊ लागले, तेव्हा मात्र त्या काही प्रमुख प्राण्यांनी आता या चिमण्यांची दखल घ्यायला सुरुवात केली. त्यातल्या काहींना या चिमण्यांना आपल्यासोबत घेण्याची ही संधी वाटायला लागली, तर काहींना या चिमण्यांचा राग यायला लागला. आपण एवढे सांगत असूनसुद्धा या चिमण्या त्यांचा चिवचिवाट बंद करत नाहीयेत व जंगलातील इतर प्राण्यांना पण उगाचच घाबरवत आहेत असे वाटून त्यांनी या चिमण्यांच्या विरोधात इतर प्राण्यांच्या शाळा घ्यायला सुरुवात केली आणि या चिमण्या कशा विनाकारण चिवचिवाट करून आपल्या जंगलाची शांतता खराब करत आहेत व तुम्हाला उगाचच घाबरवत आहेत असं सांगायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्यांनी या चिमण्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा सुद्धा विचार केला.
त्याचवेळी चिमण्या मात्र जंगल वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू इच्छित होत्या. त्यासाठी पोटतिडकीने सांगूनही हे प्रमुख प्राणी ऐकत नाहीत म्हटल्यावर चिमण्यांनी स्वतःच्या क्षमतेनुसार जमेल तसे आपल्या चोचीतून पाणी नेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला होता. चिमण्यांची ही धडपड पाहून व त्यांच्या चिवचिवाटाला साद देत काही इतर प्राणी सुद्धा त्यांच्यासोबत प्रयत्न करू लागले; तर काही प्राणी मात्र अजूनही त्यांची गंमत बघत होते. या एवढूशा चिमण्या स्वतःला काय समजतात? जशी काय यांनाच फक्त जंगलाची काळजी आहे असं यांना सिद्ध करायचंय का यातून? असे प्रश्नही काहीजण उपस्थित करत होते. काहीजणांना हा चिमण्यांचा स्वतःकडे मोठेपणा घेण्याचा किंवा मुख्य प्राण्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न वाटत होता, तर काहीजणांना यात चिमण्यांचा स्वतःचाच काहीतरी स्वार्थ असावा असं वाटत होतं. काहीजण त्यांची खिल्ली उडवत होते, तर काहीजण कुतूहलाने सुद्धा बघत होते. काहीजण स्वतः लांब उभे राहून फक्त सल्ले देण्याचे सुद्धा काम करत होते. यात चिमण्यांच्या प्रयत्नांत साथ देणारे जे मूठभर प्राणी होते, त्यांना सुद्धा आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा यातल्या काही चिमण्यांसहित काही प्राण्यांना त्यांच्यापासून दूर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न होत होते.
हे सगळं होत असताना जंगल मात्र पेटतच चाललं होतं आणि चिमण्यांचा छोटासा समूह त्यांच्या इवल्याशा चोचीने त्यावर पाणी टाकण्याचा प्रयत्न करतच होते.
या चिमण्यांच्या प्रयत्नांना खरंच यश येईल का? या चिमण्यांची आर्त हाक त्या मुख्य प्राण्यांपर्यंत कधी पोचेल का? किमान इतर प्राणी तरी चिमण्यांच्या हाकेला 'ओ' देत जंगल वाचवण्याच्या या प्रयत्नांत सामील होतील का?
खरंच, जंगल वाचेल का?
असे असंख्य प्रश्न आज चिऊच्या मनात होते. पण गोष्ट सांगता सांगता आजीचा डोळा लागल्याने चिऊचे हे प्रश्न तसेच अनुत्तरित राहिले.
उद्या उठल्या उठल्या आजीकडून पहिले या प्रश्नांची उत्तरं घ्यायची असं मनात ठरवून ती निरागस चिमुरडी विचार करत करतच झोपी गेली.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा