मैत्री दिनानिमित्त

 सर्वांना मैत्री दिनाच्या भरभरून सदिच्छा..

💐मैत्रीचे हे नाते आयुष्यात खूप विलक्षणीय गोष्टी घेऊन येणारे असते. प्रत्येकाच्या आठवणींमध्ये अशी काही मैत्रीची नाती व त्यातले काही क्षण नेहमीच जपून ठेवलेले असतात. जीवाला जीव देणारे जिवलग मित्र-मैत्रिणी मिळणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई असते. अर्थात ती सर्वांच्याच वाट्याला येते असं नाही, पण ज्यांच्या वाट्याला येते त्यांचे आयुष्य समृद्ध करून जाते. अर्थात या मैत्रीचे स्वरूप व ते व्यक्त करण्याचे प्रकार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात आणि अशी प्रत्येक मैत्री ही त्या त्या जागी श्रेष्ठच असते. कुठे कॉलेजपासून मैत्री असणारे काही मित्र-मैत्रिणी उतारवयात सुद्धा गरजेच्या वेळी अगदी मध्यरात्री सुद्धा एकमेकांसाठी धावून जातात, तर कुठे एका फोनवर मित्र-मैत्रिणींसाठी बँक बॅलन्स चा विचार न करता रातोरात पैसे उभे करतात. कुठे मित्र-मैत्रिणींशिवाय वर्गात बसणार सुद्धा नाही असा प्रण करणारे मित्र-मैत्रिणी असतात, तर कुठे मेलो तरी बेहत्तर किंवा कितीही मार खावा लागला तरी बेहत्तर पण मित्र-मैत्रिणींना कठीण प्रसंगी एकटे सोडून जाणार नाही असं म्हणत हिंमतीने उभे राहणारे मित्र-मैत्रिणी असतात. कुठे 'तेरी मेरी यारी, मग --त गेली दुनियादारी' म्हणणारे मित्र-मैत्रिणी असतात, तर कुठे 'जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो तेरा है' असं म्हणणारे जीव ओवाळून टाकणारे मित्र-मैत्रिणी असतात. कुठे मित्र-मैत्रिणी चुकत असतील तर त्यांची चूक स्पष्टपणे दाखवून देणारे, तर कुठे त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणारे मित्र-मैत्रिणी असतात. कधी आपल्या मित्र-मैत्रिणींना कधीच एकटे न सोडणारे मित्र-मैत्रिणी असतात, तर कधी त्यांना त्यांच्या पायावर, त्यांच्या हिमतीवर उभं करण्यासाठी जाणीवपूर्वक एकटे सोडणारे मित्र-मैत्रिणी असतात. काही अबोल मैत्रीचे दाखले असतात तर काही जगभर मैत्रीचा बोभाटा करणारे असतात. हे इथंच थांबत नाही. हे तर फक्त नमुन्यादाखल आहेत. यापेक्षा वेगळे सुद्धा अगणित प्रकार आहेत मैत्रीचे. प्रत्येक व्यक्ती व परिस्थिती गणिक वेगवेगळे. विशेष म्हणजे यातल्या कोणत्याच मैत्रीला असं कोणत्याही एकाच ढाचामध्ये घालून पाहता येत नाही. तशीच कोणत्याच एका मैत्रीची इतर कोणत्या मैत्रीशी तुलना सुद्धा होऊ शकत नाही. अशी अतुलनीय व अमूल्य मैत्री आपल्याला लाभणे हा आपला आयुष्यातील अनमोल ठेवा असतो. आजच्या या मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अशा सर्व अनमोल मित्र-मैत्रिणींना ज्यांच्या फक्त असण्याने आपल्या आयुष्यात रंग भरले जातात, त्यांच्या आपल्या आयुष्यात असण्यासाठी त्यांना मनोमन थँक्स म्हणूयात. असे कुणी भुले बिछडे मित्र-मैत्रिणी असतील ज्यांच्याशी अनेक दिवसांपासून बोलण्याची इच्छा आहे; पण अजून बोलणं झालं नाही, त्यांच्याशी बोलण्याची हिंमत करूयात. ज्यांच्याशी वरवर तर कट्टी घेतलीय, पण मनातून बोलण्यासाठी आसुसलेले आहोत अशा आपल्या नालायक जिवलग मित्र-मैत्रिणींना सुद्धा फोन करून भरपूर शिव्या घालूयात.
आपल्या आयुष्यातील एक एक मित्र-मैत्रीण अमूल्य आहेत, त्यांना गमवायला नको. शक्य झालंच तर झालेल्या चुकांना माफ करूयात आणि पुन्हा नव्याने हे मैत्रीचं नातं जगुयात, जपुयात.
पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींना खूप खूप सदिच्छा..😘😘🌹
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध