पझेसिव्हनेस 12 - 'काळजी'तलं प्रेम..
आपण प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो बरं? म्हणजे खरंच प्रेम आपल्याला समजलंय का? आपण ते समजून घेतलंय का? त्यासाठी आपण पुरेसा वेळ घेतलाय का? अर्थात तो घ्यायचा असतो हे तरी आपल्याला माहिती आहे का? असे बरेच सारे आणि याला जोडून अजून बरंच काही लिहिण्यासारखं, बोलण्यासारखं आहे. पण तो आत्ता आपला विषय नसल्याने त्यात अधिक खोलात न जाता आपण प्रेम आणि पझेसिव्हनेस एवढ्या पुरतंच आज बोलूयात. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे त्याच्यावर मालकी हक्क मिळवतो का यावर जरा आपण विचार करायला हवा. अर्थात आता फारसं असं कोणीच स्वतःहून मान्य करणार नाही की मी समोरच्यावर मालकी हक्क गाजवतोय म्हणून. खरंतर अनेकदा तो गाजवताना आपल्याला हे कळतही नसतं कि आपण हक्क गाजवतोय. तर मग हे सगळं नेमकं घडतं कसं आणि हे लक्षात घ्यायचं कसं? एकएक करत पाहुयात आपण.
तर आपल्याकडे प्रेम करणं यातील एक भाग म्हणजे एकमेकांची काळजी करणं, काळजी घेणं असा असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला काही त्रास होऊ नये यासाठी आपण प्रयत्न व त्यापेक्षा जास्त वेळा तसा विचार करत असतो. कधीकधी ही काळजी इतकी जास्त होते कि त्याने समोरच्याची कोंडीच जास्त व्हायला लागते. याबाबतीत अनेकदा मुलांकडून मुलींना पॅम्परिंग जास्त केलं जातं. जे काही मुलींना हवंहवंसं पण वाटत असतं; पण काहींसाठी ते त्रासदायक ठरत असतं. तसेच काही मुली सुद्धा मुलांची इतकी काळजी करत राहतात कि ती काळजीच कधी एखाद्याला कटकट वाटायला लागते. यासाठी आपण करत असलेली काळजी समोरच्यावर नेमका काय परिणाम करतेय व त्यांना त्याची गरज आहे का? याचं भान जर आपण ठेवत गेलो तर या काळजीला मर्यादेत ठेवून पझेसिव्ह होण्यापूर्वीच थांबवता येतं. त्यासाठी अर्थात समोरच्या व्यक्तीवर तेवढा विश्वास असणं, तो ठेवणं, समोरच्याला त्यांचे निर्णय घेण्याची व ते घेताना चुकण्याची सुद्धा स्पेस आहे हे मान्य करणं गरजेचं आहे. आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला तिची स्पेस मनसोक्त अनुभवता येईल अशा पद्धतीने आपण वागणं गरजेचं आहे.
अर्थात प्रेमात पझेसिव्हनेस नसेल तर ते प्रेमच कसलं असं म्हणणारी सुद्धा बरीच मंडळी असतात बरं का.
- सचिन (8424041159)
(तुमचे यासंदर्भातले अनुभव व यावरच्या प्रतिक्रिया नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा