पझेसिव्हनेस 9 - दोस्ती अपनी अपनी..

मैत्री मध्ये सुद्धा प्रत्येकाचीच व्यक्त होण्याची पद्धत सारखीच असेल असे नाही. काही जणांना आपले जिवलग मित्र-मैत्रीण नेहमीच आपल्या जवळच असावेत असं वाटत असतं, तर काही जणांना आपण सुख-दुःखात एकमेकांच्या नेहमी सोबत राहणं म्हणजे मैत्री असं वाटत असतं. मित्र-मैत्रिणींच्या प्रत्येक गोष्टीत सोबत करणे, त्यांना कधीच एकटे न सोडणे म्हणजे खरी मैत्री असे काहींना वाटत असते; तर चुकीच्या वाटेवरून जाणाऱ्या मित्र-मैत्रिणींना अडवणे, सावध करणे, चुकीच्या कामांत त्यांची साथ न देता विरोध दर्शवणे म्हणजे खरी मैत्री असे काहींना वाटत असते. मैत्रीच्या वेगवेगळ्या संकल्पनांसोबतच त्याच तीव्रतेच्या भावना मनात तयार होत असतात आणि त्यानुसारच समोरच्याकडून पण अपेक्षा ठेवल्या जातात. मित्रांचे जन्मदिवस लक्षात ठेवून धमाकेदार पद्धतीने साजरे करण्यात काहींना मैत्री वाटते, तर कुणाला छान छान गिफ्ट आणून देण्यात घट्ट मैत्री वाटते. कुणाला फक्त गरजेच्या वेळी नेहमी किमान जवळ असणं म्हणजे मैत्री वाटते, तर कुणाला वेळप्रसंगी आपल्यासाठी दुसऱ्याशी भांडणारे खरे मित्र वाटतात. कुणाला तासनतास बोलत राहणे, फोनवर चॅटिंग करणे किंवा आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी जिवलग मित्रांशी शेअर करणे, त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून न ठेवणे ही खरी मैत्री वाटते आणि समोरच्यानेही आपल्याशी तसेच वागावे असे वाटत असते; तर त्याच वेळी एखाद्याला आपण जेव्हा आपल्या मित्रांसोबत असू तेव्हा पूर्ण वेळ त्यांच्यासाठी देणे ही मैत्री वाटते, पण इतर वेळी मात्र आपापल्या आयुष्यात मग्न राहावेसे वाटते व पुन्हा मित्रांच्या सान्निध्यात आल्यावर पुन्हा त्यांच्यात मिसळून जावेसे वाटते. व्यक्तीनुसार प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते, तशी त्यांच्या मनातील भावनांची तीव्रता सुद्धा कमी अधिक असते. मग अशात जर एखाद्याने माझ्या मनात आहे तीच खरी मैत्री आहे व समोरच्याने माझ्याशी तसंच वागलं पाहिजे; नाहीतर त्याची मित्रत्वाची भावना कमी झालीय असं समजायला सुरुवात केली तर कसं चालेल? उलट अशा प्रसंगी आपल्यातले वेगळेपण लक्षात घेऊन आपल्या मित्र-मैत्रिणींच्या मनातील मैत्रीची व्याख्या समजून घेता आली आणि आपली त्यांना सांगता आली तर दोघांतील मैत्रीचे नाते नक्कीच अधिक घट्ट होऊ शकेल.

यातली कुणाची व्याख्या खरी-खोटी किंवा चूक-बरोबर यापेक्षा तुमची मैत्री तुम्हाला व तुमच्या मित्र-मैत्रिणींना आयुष्यात कोणत्या दिशेला घेऊन जातेय हे महत्त्वाचे आहे. एखादा जीवाला जीव देणारा मित्र आहे, पण तो गुंडगिरी किंवा व्यसनाच्या नादी लागलाय आणि आपल्याला ही त्यात ओढायचा प्रयत्न करतोय तर आपण जिवलग मित्र-मैत्रीण म्हणून त्याची त्यात साथ द्यायची कि त्याला त्यातून बाहेर काढायचे कि प्रयत्न करूनही तो त्यातून बाहेर निघत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा कि अशा वेळी पुरेसा प्रयत्न करून झाल्यानंतर आपण आपला मार्ग बदलायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशा प्रसंगात आपली निर्णयक्षमता व विवेक यांची खरी कसोटी असते. आपण या मैत्रीत किती गुंतलेलो आहोत यावरही हा निर्णय ठरतो.
आपल्या मित्र-मैत्रिणींच्या इतर मित्र-मैत्रिणींबद्दल जर आपल्या मनात जलसी, द्वेष, तिरस्काराच्या भावना येत असतील तर आपण या मैत्री बाबत पझेसिव्ह झालो आहोत हे लक्षात येते. अनेक मित्र-मैत्रिणी कधी कधी इतके काळजीवाहू बनतात कि त्यांच्या सान्निध्यात राहून आपण परावलंबी किंवा अनिर्णयक्षम बनतो कि काय असेही वाटायला लागते. मैत्रीचे रूपांतर पझेसिव्हनेस मध्ये होऊ नये म्हणून आपल्याला मैत्रीच्या नात्याला सुद्धा काही सीमारेषा घालता येतील का हे पाहायला हवे. विशेषतः जेव्हा आपली मैत्री आपल्या मित्र-मैत्रिणीची स्वतःची स्पेसच मान्य करायला तयार नसते तेव्हा तर याची गरज जास्त असते. खास करून घट्ट मैत्री असणाऱ्या दोन मित्र-किंवा मैत्रिणी मधलं कोणी जर तिसऱ्या कुणाच्या प्रेमात पडायला लागलं असेल तर हा पझेसिव्हनेस खूप भीती, काळजी व असुरक्षितता यांचे मिश्रण होऊन उसळायला लागतो आणि याच वेळी मैत्रीमध्ये जास्त खटके उडण्याचे प्रकारही घडत असतात. अशा वेळी तर खूप सावधगिरीने ही परिस्थिती हाताळण्याची गरज असते.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध