घरकाम - 9
घरकाम - 9
घरकाम हे आपल्याकडे कधीच प्रतिष्ठेचे मानले जात नाही. त्यामुळे साहजिकच घरातील स्त्रियांच्या या कामाला आपल्याकडे नेहमीच गौण स्थान दिलेलं असतं. 'त्यात काय एवढं? दिवसभर घरीच तर असते.' हा डायलॉग तर एव्हाना सगळीकडे तोंडपाठ झालाय. नोकरी करणाऱ्या पुरूषांना आणि स्त्रियांना सुद्धा जेवढा सन्मान समाजात व कुटुंबात मिळतो, तेवढा घर सांभाळणाऱ्या स्त्रियांना कधीच मिळत नाही. तुमच्या मिसेस काय करतात? असं कोणी या स्त्रियांच्या नवऱ्यांना विचारलं तर सरसकट 'ती काही करत नाही, घरीच असते.' असं उत्तर येतं. पुरुष कशाला, स्वतः त्या स्त्रीला जरी विचारले तरी ती हेच सांगते कि - 'मी काही करत नाही, घरीच असते.' म्हणजे घर सांभाळणे हे एवढं मोठं काम या स्त्रिया दिवसरात्र विना मोबदला करत असूनही त्याची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही किंवा ते फारसं विचारातही घेतलं जात नाही. याच दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी मजुरीने जर कुणाला लावायचं झालं तर सकाळचा चहा-नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण, झाडू मारणे, लादी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे, मुलांना सांभाळणे, त्यांचा अभ्यास घेणे या सगळ्या कामासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा साधा हिशेब जरी लावला तरी या कामाची किंमत लक्षात येईल.
दिवसभर मुलांना सांभाळत घरातील सर्व कामं करताना स्त्रियांना किती कसरत करावी लागत असेल याचा नीट विचार जरी केला तरी कामावरून आल्यावर मुलं त्रास देतायत म्हणून बायकोवर ओरडणं आपोआप बंद होईल. अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा घरातील सर्व कामं एकटीनेच करून मग नोकरी करावी लागते, पण त्याची फारशी दखलही घेतली जात नाही. कारण एक तर ते काय फार महत्त्वाचं काम वाटत नाही आणि म्हणूनच ते बायकांनी करायचं असतं अशी मानसिकता झालेली असते. म्हणूनच अनेकदा मुलं म्हणतात कि मला सर्व स्वयंपाक, भांडी ही कामं उत्तम येतात, पण ती फक्त कामाच्या ठिकाणी, घरी नाही. म्हणजे हॉटेलमध्ये उत्तम शेफ असणारा पुरुष घरात स्वयंपाकाला हातही लावत नाही, कारण तिथे असणारा पैसा व प्रतिष्ठा घरात नसते. अगदी हॉटेलमध्ये टेबल पुसण्याचे काम करणारे पुरुष सुद्धा घराची लादी किती वेळा पुसत असतील हा प्रश्नच आहे. त्यामुळे फक्त घरकामातील सर्व गोष्टी येत असणं आणि त्या प्रत्यक्ष घरात करणं यात फरक आहे. त्याकरताच जसं हॉटेलमध्ये शेफ आहे हे सांगताना समाजाची लाज वाटत नाही, तसेच घरातील कामं करताना सुद्धा लाज वाटता कामा नये. आणि म्हणूनच घरकामाला प्रतिष्ठेचं काम मानलं जायला हवं. त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. सध्या घरातील सर्व कामं उत्तम येत असणाऱ्या, किमान त्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्या आणि नुकतीच सुरुवात केली असणाऱ्या सर्व पुरुषांनी स्वतःहून कुणाला न लाजता, न भिता अभिमानाने मला घरकाम उत्तम येतं, मी त्यासाठी प्रयत्न करतोय किंवा त्याची सुरुवात केलीय हे आवर्जुन सर्वांना सांगत राहायला हवंच. परवा माझी मैत्रीण वैशाली हिने तिच्या वडील व भावाचे घरात काम करत असतानाचे फोटो मोठ्या कौतुकाने मला पाठवले होते व तिच्या घरातील सर्व कामं वडील, भाऊ व ती मिळून करतात हे सांगताना तिला किती आनंद वाटत होता. त्याचबरोबर घरातील ज्या स्त्रिया हे काम सांभाळत आहेत त्यांच्या कामाची सुद्धा जाण ठेवून त्यांचे त्यासाठी सतत कौतुक करणं, त्यांना धन्यवाद देणं व त्यांच्या कामाचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे.
म्हणूनच पुरूष आणि स्त्रिया दोघांनीही 'मी/ती काहीच करत नाही, घरीच असते' असं म्हणण्यापेक्षा 'मी/ती घर सांभाळतेय' असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आणि जेव्हा हे काम फक्त स्त्रियांचे न राहता घरातील सर्वांचे होईल, तेव्हा आपोआपच या कामविषयीची जाणीव सर्वांना होईल. आपल्याकडे बाहेर नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या स्त्रियांना हाऊसवाईफ म्हणण्याची पद्धत आहे. या म्हणण्याचा अर्थ 'ती काही करत नाही, घरीच असते' असा असतो. त्याऐवजी जर आपण तिला 'होम मेकर' म्हणजे 'घराला घर बनवणारी' किंवा 'घराला घरपण देणारी' म्हणायला सुरुवात केली, तर आपण नक्कीच तिच्या कामाला किमान न्याय दिल्यासारखे वाटेल. शिवाय असे होममेकर नेहमी फक्त स्त्रियांनीच असायची गरज नाही, तर पुरुषांनी सुद्धा पुढाकार घेऊन यात वाटा उचलला पाहिजे. जिथे दोघेही जोडीदार नोकरी करणारे असतील, तिथे तर दोघांनीही होममेकरचा रोल सुद्धा जोडीने निभावायला हवा. एकूणच घरकाम हे कमीपणाचे किंवा कमी महत्वाचे काम नसून ते खऱ्या अर्थाने घराला घरपण देणारे अत्यंत महत्वाचे काम असल्याने ते करत असणाऱ्या घरातील स्त्री-पुरुषांकडे समाजात व कुटुंबात प्रतिष्ठेनेच पाहायला हवं.
सचिन (8424041159)
(तुमच्या प्रतिक्रिया, मत, अनुभव वरील व्हाट्सअप्प नंबर वर मेसेज करून व फेसबुकवर वर कमेंट करून सुद्धा नक्की कळवा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा