शेअरिंग-केअरिंग - 9 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग - 7

 लग्न होण्याआधीच लग्नाचा विचार करत असताना जसा इतर सर्व गोष्टींचा विचार करतो, तसाच लैंगिक संबंध या महत्त्वाच्या मुद्द्यावरही तेवढ्याच गांभीर्याने व जबाबदारीने विचार व्हायला हवा. त्यासाठी पालकांचा रोल यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. आपल्या मनामध्ये अगदी किशोरवयापासून लैंगिक भावना जागृत झालेल्या असतात. पण त्याविषयी अधिकृत माहिती कुठून मिळत नाही व त्याविषयी उघडपणे बोललेलं चालत नाही हे एव्हाना आपल्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे या गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी इतर पर्यायांचा शोध सुरू होतो. अनेकदा मोठया माणसांच्या गप्पांमध्ये असा काही विषय निघाला कि आपण कान टवकारून ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. मग त्या ऐकलेल्या अर्धवट गोष्टींचा आपल्या बुद्धिप्रमाणे अर्थ लावतो आणि आपल्या मित्र-मैत्रिणींशी या विषयी गप्पा मारताना ते शेअर करतो. ते पण आपल्याशी असंच काही बाही शेअर करत असतात आणि यातून आपली लैंगिक संबंधांविषयीची प्राथमिक मते व भावना तयार होत असतात. पुढे पुढे इतर माध्यमेही आपल्या हातात येतात. मग अशा चुरस कथा असणारी पुस्तके, व्हिडीओज ज्यांना उपलब्ध होतात ते यांमध्ये रमत जातात व ज्यांना हे उपलब्ध होत नाहीत ते इतरांनी सांगितलेल्या गोष्टींच्या आधारेच या कल्पना करत राहतात. यामध्ये बऱ्याचदा लैंगिक संबंधांविषयी चुकीचीच माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते. सुरक्षित व आनंददायी लैंगिक संबंधांपेक्षा काल्पनिक थ्रिलिंग गोष्टीच यातून जास्त ऐकायला मिळतात. अनेक मुलं स्त्रियांच्या विशिष्ट अवयवांविषयी आपल्या मनात असलेल्या लैंगिक भावनांना कल्पनेत गुंफून ते इतरांना ऐकवत असतात आणि ऐकणारे हेच खरं आहे असं समजून या कल्पनांत रमत असतात. यामध्ये अनेकदा लिंग मोठे असण्याची गरज व फायदे, जास्त वेळ स्टॅमिना टिकवणे व वेगवेगळ्या लैंगिक पोझिशन विषयी अनेक काल्पनिक कथा मुलांच्या डोक्यात भरलेल्या असतात. तसेच अनेक मुली त्यांच्यापेक्षा मोठ्या, लग्न झालेल्या मुली व स्त्रिया यांच्या गप्पा ऐकून त्याविषयी आपल्या कल्पना करत असतात. यामध्ये अनेकदा लैंगिक संबंध ही किती वाईट गोष्ट व यासाठी पुरुष स्त्रियांना किती व कसा त्रास देतात हे सुद्धा त्यांनी ऐकलेले असते व त्यामुळे त्याविषयी एक विशिष्ट भिती त्यांच्या मनात तयार झालेली असते. एकीकडे लिंग मोठे असणे व जास्तीतजास्त वेळ सेक्स करणे म्हणजे पुरुषार्थ आणि हे नाही जमलं तर बायको आपल्याला सोडून जाते वगैरे यासारख्या गोष्टी डोक्यात असणारी मुले तर दुसरीकडे पुरुष सेक्स साठी कसे आग्रही असतात व त्यासाठी स्त्रीला किती त्रास देतात, आपला काही विचार किंवा आपल्या आनंदाचा विचारच करत नसतात, रात्र झाली की त्यांना फक्त 'ते' हवं असतं अशा कल्पनेत असणाऱ्या आणि त्यामुळे आधीच सेक्स विषयी नकारात्मक विचार करणाऱ्या व भिती बाळगणाऱ्या मुली ही बहुतांशी समाजाची स्थिती आहे. आता आजकाल तर अँड्रॉइड मोबाईल व इंटरनेट मुळे अनेक साईट्स सहज आपल्या हाताच्या बोटात आल्या आहेत. त्यातून सुद्धा मुलांच्या मनात सेक्स विषयीचे अनेक चुकीचे समज, चुकीचे आग्रह तयार होण्याची शक्यता आहे; तर मुलींच्या मनात यामुळे अधिक किळस व भिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

याचसाठी या सर्व ऐकलेल्या, वाचलेल्या व पाहिलेल्या गोष्टींमधून 'खरं काय?' ते शोधायची गरज असते. यामध्ये आपल्याला मदत करू शकतात ते अधिकृत पुस्तके, अधिकृत डॉक्टर्स व त्यांचे ब्लॉग आणि युट्युब चॅनेल आणि आपले पालक. अर्थात पालकांच्या बाबतीत पुन्हा अडचण अशी असते कि अनेकदा पालकांनाच यातल्या चांगल्या-वाईटाची फार कल्पना नसते. तेसुद्धा पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खातच पोहायला शिकलेले असतात आणि तरीही त्यांच्या अनुभवातून ते जे शिकले आहेत तेसुद्धा किती योग्य-अयोग्य? याची त्यांना सुद्धा कल्पना नसते. त्यामुळे अशा वेळी त्यांना सुद्धा दोष न देता वर सांगितल्याप्रमाणे काही अधिकृत माध्यमांतून आपणच आपलं ज्ञान वाढवणे गरजेचे आहे.
काहीही झाले तरी लैंगिक संबंधांविषयी अधिकृत माध्यमांतून व्यवस्थित माहिती करून घेऊनच लग्नाला तयार व्हायला पाहिजे व आपल्या जोडीदाराला सुद्धा याविषयी व्यवस्थित आणि योग्य तीच माहिती आहे का हे समजून घेण्यासाठी आधी या विषयावर चर्चा सुद्धा व्हायला पाहिजे.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध