पझेसिव्हनेस 8 - दोस्ती के लिये कुछ भी..

जिथे जिथे नात्यातील जवळीकता येते तिथे तिथे हा पझेसिव्ह स्वभाव उफाळून येत असतो. पालक व मुलांमध्ये जसा हा असतो तसा तो पुढच्या टप्प्यावर मित्र-मैत्रिणी व भावा-बहिणींमध्ये सुद्धा येतो. माझा मित्र हा माझ्या सोबतच कायम राहायला हवा, माझी मैत्रीण माझ्यासाठीच जास्त वेळ देणारी असावी. या अपेक्षा त्यांच्याबद्दलच्या पझेसिव्हनेस मधूनच येतात. माझा मित्र किंवा मैत्रीण आणि मी म्हणजे 'दो जिस्म एक जान' आहोत असं म्हणणारे अनेक कॉलेज मित्र-मैत्रिणी आपल्याला दिसतील किंवा आपल्या कॉलेज लाईफ मधले आपले असे अनेक किस्से आपल्याला आठवतील. यामध्ये मग 'दोस्ती के लिए कुछ भी' किंवा 'यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी' असं म्हणत मित्र-मैत्रिणींवर जान न्योछावर करणारे अनेक जय-विरू आपल्याला दिसतात. (मुलींच्या अशा जोडीचे नाव आठवले नाही, प्रत्यक्षात मात्र अशा अनेक जिवलग मैत्रिणींच्या जोड्या असतात. यावरही चिंतन करणे गरजेचे वाटते.) मग पुढे आपल्याबरोबर क्लास बंक करताना, अभ्यास करताना, खेळायला, टपल्या मारायला, खोडी काढायला, भांडणं करायला, फिरायला, मूवी/नाटकं पाहायला, पिकनिकला अशा सगळ्या ठिकाणी माझी मैत्रीण किंवा मित्र माझ्याच सोबत असायलाच पाहिजेत असा अट्टाहास तयार होतो आणि तसे झाले नाही तर त्यातून रूसवे-फुगवे, वादही होतात. खरंतर यातच तर खरी मजा असते असं अनेक जण म्हणतील आणि तेही बऱ्याच अंशी खरंही आहे. पण हेच जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा मग समोरच्याची स्पेसच आपण संपून टाकतो. आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणीला कोणीही नवीन मित्र-मैत्रिणी शी जास्त वेळ बोलताना किंवा फिरताना पाहिलं कि आपल्याला असुरक्षित वाटायला लागतं. माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही जिवलग मित्र-मैत्रीण असू नये असं वाटणं किंवा मला न सांगता, मला सोडून तिने/त्याने कुणाबरोबर जास्त वेळ घालवला तर त्यातून भिती वाटायला लागणं ही पझेसिव्ह होण्याची लक्षणे आहेत हे लक्षात घ्यायला हवं. वेळीच यातून सावरता आलं तर पुढचे दोघांच्याही आयुष्यातले अनेक मानसिक ताण, वाया जाणारा वेळ, मैत्रीपूर्ण नात्यातील दुरावा व इतर अनेक नुकसानापासून वाचू शकतो.

शिवाय आपल्या मनात असतील तितक्याच तीव्र भावना समोरच्या व्यक्तीच्या मनात असतीलच असं नाही. तूच माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड अशी प्रामाणिक भावना तुमच्या मनात जरी असली तरी समोरच्याला सुद्धा तशाच भावना असाव्यात हा आग्रह धरणे चुकीचे आहे. यात कुणाचा दोष असतो असेही नाही. प्रत्येकाच्या मनातील भावनांची तीव्रता वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक राहू शकतो, पण त्याचा आग्रह समोरच्यावर करू शकत नाही आणि त्यासाठी समोरच्याला दोष सुद्धा देऊ शकत नाही. मैत्रीच्याच नाही तर कोणत्याच नात्यात आपण समोरच्याला बांधून ठेवून शकत नाही आणि स्वतःला सुद्धा त्यात अडकवून ठेवणे योग्य नाही. नात्याला कोणत्याही कालावधी मध्ये न मोजता आता आहे त्या काळात आपण एकमेकांसोबत आयुष्याचा जास्तीतजास्त आनंद कसा घेऊ शकतो यावर लक्ष द्यायला हवे.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध