घरकाम - 8

                                                                     घरकाम - 8

घरकाम हा खरंतर एक संस्कारांचा भाग आहे. म्हणूनच आज गेले 25-30-50 वर्ष जे पुरुषप्रधान व्यवस्थेचे संस्कार घेऊन आपण मोठे झालो आहोत ते अचानक बदलणे सर्वांना शक्य होत नाही. मग यात स्त्रिया व पुरुष दोघांचीही अवस्था सारखीच असते. मुलांना लहानपणापासूनच कधी घरकाम हे तुझं सुद्धा काम आहे असं सांगितलं जातं नाही आणि मुलींना मात्र हे तुझंच काम आहे असं सतत सांगितलं जातं. अर्थात ज्या घरात मुलगी नाही त्या घरात आईला मदत म्हणून काही ठिकाणी मुलांना थोडंफार घरकाम सांगितलं जातं; पण अर्थातच ते त्याचं काम म्हणून नाही तर आईच्या कामात मदत म्हणून करायला सांगितलं जातं. यातून ज्या जाणिवा लहानपणापासून तयार व्हायला हव्यात घरकामाविषयीच्या, त्या होत नाहीत आणि मग अचानक पुढे मोठं झाल्यावर कोणी हे सांगायला लागलं तर ते पटत असलं तरी अंगवळणी पडायला जड जातं. अगदी घरातील महिलांना सुद्धा असं पुरुषांनी घरकाम करणं जड जातं, कारण त्यांना लहानपणापासून कधी या गोष्टीची सवयच नसते. उलट पुरुषांनी घरकाम करणं म्हणजे कमीपणाचे कसे असते हेच त्या ऐकत, पाहत आलेल्या असतात. त्यामुळे आपल्या घरातील पुरुषांना असं कमीपणाचं काम करताना त्यांना बिचाऱ्यांना पाहवत नाही. आमच्या अनिशा ताई सांगत होत्या कि - 'हे सगळे प्रयोग शहरांमध्ये ठिक आहेत हो, पण गावाकडे हे खूप अवघड आहे. असं कोणी करायला लागला तर त्याला आजूबाजूचे लोक बायला म्हणवून चिडवतात आणि त्या घरातील बायकांना पण खूप सुनावतात.' हे वास्तव आहे. माझे बालपण गावाकडेच गेले असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अनुभव मलाही आहे आणि जवळपास गावी राहणाऱ्या अनेकांना तो असेलच. गावाकडे हे रुळायला वेळ लागेल हे खरं असलं तरी याची सुरुवात कोणीतरी करावीच लागेल आणि अशी सुरुवात करणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतील सुद्धा. आपण आपली सुरूवात आपल्या घरापासून करणे गरजेचे आहे. मग अशा वेळी कोण काय म्हणतंय यापेक्षा मला काय पटतंय हे जास्त महत्वाचं असतं आणि उलट हीच संधी पाहून त्या बोलणाऱ्यांचं सुद्धा प्रबोधन आपण करू शकतो.
अर्थात या सगळ्याचं मूळ शेवटी कुठं आहे तर लहानपणापासून केल्या जाणाऱ्या संस्कारांमध्ये. ज्या वयात मुलांच्या काहीच फारशा जाणिवा तयार झालेल्या नसतात, त्या वयात आपण मुलांना खेळायला बॅट देतो आणि मुलींना बाहुली देतो. मुलांना गाडी दिली तर मुलींना भांडी-कुंडी देतो. इथूनच आपण त्यांच्यात या भेदभावाचे बीज पेरत असतो. जाणीवपूर्वक बाहेरची कामं मुलांना सांगणं आणि घरातील कामं मुलींना सांगणं हे कुटुंबातून झालेले संस्कारच पुढे मुलींना बाहेरच्या जगात अननुभवी ठरवतात आणि मुलांना घरकामात. अगदी लहान मुलं भांडी-कुंडी खेळत असताना सुद्धा त्यात मुली स्वयंपाक किंवा चहा बनवतात आणि मुलांना आणून देतात. कारण त्या घरात रोज तेच पाहत असतात. घरात नेहमी आई-आजी-ताई या स्त्रियाच घरातील पुरुषांना चहा देताना, जेवण वाढताना पाहत वाढलेली ही पिढी वेगळे काय संस्कार घेणार? त्यामुळे आपण अगदी लहानपणापासून मुलांना काय दाखवतोय, काय सांगतोय, त्यांच्यासमोर कसे वागतोय हे सगळं ही मुलं आपल्या मनात नकळतपणे बिंबवत असतात.
लहानपणापासूनच 'हे तुझं काम नाही' असं मुलांना आणि मुलींना जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा ते त्यांच्यावर खूप खोल परिणाम करत असतं आणि त्यांच्यावर नकळतपणे हे संस्कार करत असतो हे लक्षात घ्यायला हवं. काल माझी मैत्रीण आरती हिने तिच्या 2 वर्षाच्या छोट्या पिल्लाने बनवलेल्या छोट्या पिल्लू भाकरीचा फोटो मोठ्या कौतुकाने मला पाठवला होता. त्यावेळी मी त्याचं कौतुक करत तिला असं म्हटलं कि - किमान राजवीर ला लहानपणापासून 'हे तुझं काम नाही' असं तुम्ही सांगत नाही हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सगळे आपल्या वागण्यातून, बोलण्यातून व कृतीतून आपल्या आसपासच्या लहान मुलांवर अनेक संस्कार करत असतो हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवं. आपल्या मुलांनी पुढं जाऊन कसं वागायला हवं हे आपण आत्तापासून त्यांना कृतीतून दाखवायला सुरुवात केली आणि त्याचसोबत या विषयावर त्यांच्याशी संवाद ठेवला व आपल्या मनातील स्त्री-पुरुषांविषयीचा दृष्टिकोन आधी क्लिअर केला तर तो आपसुकपणे मुलांसाठी खेळ, खेळणी, कपडे किंवा कामांची निवड करण्यामध्ये झिरपला जातो आणि मुलांच्या जाणिवा लहानपणापासूनच पक्क्या तयार झाल्या तर पुढे त्यांना स्वतःशी व आजूबाजूच्या समाजाशी संघर्ष करण्यात जास्त वेळ घालावा लागत नाही.
सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मत, अनुभव वरील व्हाट्सअप्प नंबर वर किंवा फेसबुकवर कमेंट मध्ये नक्की पाठवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध