खरंच लैंगिक संबंध (सेक्स) एवढा महत्वाचा असतो का हो? असा प्रश्न विचारून यावर मोकळेपणाने बोलायला सांगितले तर कितीजण बोलायला पुढे येतील ही शंकाच आहे; पण हा प्रश्न गंभीर आहे हे आपल्यातील अनेकांना मनोमन माहितीही असते व त्यातील काही अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी पण असतात. यातील काही उदाहरणे आपण आधीच्या काही केसेसमध्ये पाहिलीत आणि पुढेही अजून पाहणार आहोत. बऱ्याच जोडप्यांमध्ये वादाचे मूळ कारण हे अनेकदा लैंगिक संबंधाशी संबंधितच असते, पण ते उघडपणे कुणाशी बोलता किंवा सांगता येत नाही आणि त्यामुळे ही अडचण आणि वाद अधिकच वाढत राहतात किंवा मग मन मारून जगावं लागतं. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांनी लैंगिक संबंधांविषयी अधिकृत माध्यमांतून अधिक माहिती घेणे गरजेचे आहे. लैंगिक सुख ही सुद्धा प्रत्येकाची एक मूलभूत गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडील समाजव्यवस्थेमध्ये हे सुख फक्त लग्नाच्या जोडीदारकडूनच घेणे ग्राह्य मानले गेल्याने त्याची जबाबदारी, ओझे किंवा बंधन आपसूक जोडीदारावरच येऊन पडते. मग भलेही ते यासाठी सक्षम किंवा पूरक नसेना का. त्यासाठी ही समाजव्यवसथा दुसरा पर्याय सुचवत नाही किंवा मान्य करत नाही.
आपल्या शेअरिंग-केअरिंगच्या तिसऱ्या लेखातील मीना अतुल यांची परिस्थिती अशीच आहे. दोघांच्याही लैंगिक गरजा, अपेक्षा व क्षमता यांमध्ये फरक आहे. हा फरक असणे यात कुणाचाच काही दोष नाही. पण हे वास्तव समजल्यावर त्यावर उपाय न शोधता एकमेकांना दोष देणे हे चुकीचे आहे.
अतुल-मीनाच्या केसमध्ये मुळात दोघांची लैंगिक संबंध याविषयीची माहिती व विचार करण्याची पद्धतच चुकीची वाटते. आपल्याकडे स्त्रियांनी कसं सभ्यतेचे सर्व निकष पाळून, लैंगिक बाबींतील अशा कोणत्या गोष्टींचा आग्रह न धरता, त्यांचा फार विचार न करता, त्यापासून अलिप्त राहायला हवे तरच ती खरी स्त्री म्हणून शोभते असे संस्कार आहेत आणि अतुल त्या संस्कारांचा बळी दिसतोय. त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिक अपेक्षा असू शकतात हे त्याला मान्यच होत नाही आणि अशा अपेक्षा ठेवणारी स्त्री ही सभ्यतेच्या निकषांमध्ये बसतच नाही असे त्याचे ठाम मत झाल्याने त्याची त्यांच्या प्रॉब्लेमकडे पाहण्याची सुरुवातच मुळी चुकीच्या दिशेने झाली. तसेच मीनाच्या बाबतीतही दिसते. स्त्री व पुरुषांच्या किंवा कोणत्याही दोन व्यक्तींच्या लैंगिक अपेक्षांमध्ये फरक असू शकतात हे तिच्या लक्षातच आलेले दिसत नाही. त्यामुळे त्यावरून सतत अतुलला कमी लेखणे, त्याच्या पुरुषत्वावर शंका घेणे अशा चुकीच्याच दिशेने ती सुद्धा विचार करत होती. यामध्ये त्यांना जर या गोष्टी कुठे मोकळेपणाने बोलता आल्या असत्या तर कदाचित यातून मार्गही निघू शकला असता. निदान याविषयीच्या न्यूनगंडातून बाहेर पडून त्यांनी स्वतः जरी यावरच्या उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तर अनेक पुस्तके, साईट्स व चांगल्या डॉक्टरांकडून त्यांचा हा प्रश्न सुटू शकला असता. पण मुळात आधीच एखाद्या समस्येचे दोष जेव्हा आपण दुसऱ्यावर टाकून मोकळे होतो, तेव्हा त्याच्या उपायांचा शोध घेणे बंद होते.
अर्थात यात दोघा जोडीदारांशिवाय कुटुंब व समाज म्हणून या घटकांची सुद्धा महत्वाची जबाबदारी असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा