शेअरिंग-केअरिंग -7 - 'अस्तित्व' सिनेमात दाखवलेलं समाजवास्तव
परवा पाहिलेल्या अस्तित्व या मराठी सिनेमाविषयी थोडक्यात.
यात वेगवेगळ्या भूमिका सांगणारी पात्र आहेत. एकीकडे मी पुरुष असल्याने कितीही स्त्रियांशी बाहेर संबंध ठेवले तरी चालू शकते, पण हिने स्त्री असून एका दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे हे कदापीही मान्य नसणारा आणि त्यामुळे 27 वर्षांचे वैवाहिक नाते तोडायला निघालेला नवरा आहे; तर त्याचवेळी दुसरीकडे वारंवार आपल्या नवऱ्याकडून लैंगिक सुखाची मागणी करूनही ती पूर्ण होत नसलेली, किंबहुना त्याविषयी त्याला जराही पर्वा नसल्याने व लग्नानंतर महिनोनमहिने नवऱ्याच्या सहवासाशिवाय घालवावी लागलेली आणि त्यामुळे एका मोहाच्या प्रसंगी क्षणिक आकर्षणातून आलेले शरीरसंबंध आणि त्यातून एका मुलाची आई झालेली बायको आहे. जवळपास 25 वर्षांनी आपला मुलगा हा आपला नाही हे कळल्याने आणि आत्तापर्यंत आपल्याला खूप प्रिय असणारी बायको (गेल्या 27 वर्षांत 25 वर्षांपूर्वी एकदाच परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्याचे कळल्याने) व्यभिचारी असल्याचे अचानक लक्षात आल्याने तो नवरा तर संतापलायच, पण आपल्या आईच्या आयुष्यातील ही घटना व आपले वडील दुसरेच कुणीतरी असल्याचे कळल्याने आत्तापर्यंत आईवर सर्वांत जास्त प्रेम करणारा मुलगा देखीप संतापलाय व तिला वाईट शब्दांत सुनावतोय. आणि या बाप आणि मुलाने दोघांनीही तिला घराबाहेर काढून तिच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाही असं ठरवलं आहे.
दुसरीकडे मात्र आयुष्यात लग्नच करणार नाही म्हणणारा या नवऱ्याचा मित्र त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान असणाऱ्या पण दोन मुलींची आई असणाऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतोय व तिच्या मुलींसहित तिच्यावर भरभरून प्रेम करतोय. तिचा आधीचा घटस्फोट झालाय किंवा तिला आधी दुसऱ्या पुरुषापासून दोन मुली आहेत याबद्दल त्याला काहीच तक्रार नाहीये, उलट त्या मुलींना तो आपल्याच मुली मानतोय आणि यात आपण फार काही वेगळं करतोय असा आविर्भावही त्यात नाही.
स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करणारा व त्यासाठी आग्रही असणारा हा मित्र व त्याची जोडीदार हे आपल्याला एकीकडे एका चांगल्या समाजाची आशा दाखवतात. पण दुसरीकडे स्त्रियांनी नोकरी केलेली आमच्या घरात अजिबात चालणार नाही असं म्हणून आपल्या बायकोला घरातून बाहेर पडू न देणारा नवरा. स्त्रियांनी फक्त त्यांचे छंद जोपासावेत आणि आनंदी राहावे. आर्थिक कमाई करण्याचे काम हे घरातील पुरुषांचे आहे हा समाजाचा संकुचित पुरुषी दृष्टिकोन आपल्याला दाखवतो. आपल्या बापाच्या या पुरुषी मानसिकतेला साथ देणारा स्वतःला आधुनिक समजणारा यातला मुलगा हा सुद्धा आजच्या तरुण पिढीतील काही अशाच बाह्य अंगाने आधुनिक झालेल्या पण आतून मागास मानसिकतेत वावरत असणाऱ्या तरुणांचे प्रतिनिधित्व करतो. याचवेळी या घरची होणारी सून मात्र विचारांनी प्रगत व खंबीर दाखवली आहे. 'लग्नानंतर नोकरी करायची गरज नाही किंवा करायचीच असली तर आपल्याच कंपनीत कर' असं सांगणाऱ्या भावी सासऱ्यांचा हा प्रस्ताव नम्रपणे नाकारून स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देणारी ही मुलगी जास्त भावली. आपल्या होणाऱ्या सासूच्या बाबतीत घडलेली ही घटना ऐकल्यावर खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिलेली व अशा संकुचित विचार करणाऱ्या मुलाशी काहीच नातं ठेवायचं नाही असं ठामपणे सांगून ठरलेले लग्न मोडणारी ही मुलगी आजच्या अनेक स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्व मान्य असणाऱ्या व त्यासाठी भूमिका घेणाऱ्या तरुणींची प्रतिनिधी वाटली.
एकूणच समाजातील स्वतःला कितीही पुढारलेले म्हणवणाऱ्या घरांत सुद्धा इतरत्र सगळीकडे असणारीच पुरुषी संकुचित वृत्ती कशी भरलेली आहे हे दाखवत स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा करणारा हा सिनेमा समाजातील एक गंभीर वास्तव मांडणारा वाटला.
आजही अनेक स्त्रिया स्वतःच्या अंगी कितीही क्षमता असल्या तरी फक्त पुरुषप्रधान व्यवस्थेच्या बंधनापायी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व बनवून, टिकवून ठेवण्याचा प्रयत्न न करता घर, कुटुंब, मुलं यांचं सगळं करण्यात स्त्री जन्माचे सार्थक असल्यासारखे वागतात. जेव्हा प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वतःच्या व इतरांच्याही स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होईल आणि ते मान्य असेल व ते स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न सर्वांकडून होईल तेव्हा खऱ्या अर्थाने समाज सुधारला असं म्हणता येईल.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा