हिंसा-अहिंसा - भाग - 7 - अहिंसा म्हणजे काय?
हिंसेचे अनेक प्रकार व त्याची कारणे आणि उपाय आपण पाहिले. आता आपण अहिंसेच्या मुद्द्यावर बोलूयात.
'अहिंसेचा मार्ग म्हणजे नेभळट, लाचार, शेपूट घालून जगणाऱ्या लोकांचा मार्ग' असं आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींना वाटत असतं. कुणी आपल्या एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करण्याइतके आपण षंढ आहोत काय? असंही अनेकजण म्हणत असतात. पण अहिंसा म्हणजे अन्याय सहन करणे नसून अन्यायाचा प्रतिकार सनदशीर मार्गाने करणे आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. अहिंसेचा मार्ग हा दुर्बलांचा मार्ग नसून अंगी हिंमत असणाऱ्यांचाच मार्ग आहे. कारण अंगी हिंमत असल्याशिवाय अहिंसेच्या वाटेवरून चालणे शक्य नाही.
आपल्याला समोरच्याची एखादी गोष्ट आवडली नाही, म्हणून त्याच्यावर हात उचलणे किंवा रागावणे, चिडणे, शिव्या घालणे हे सोपे असते; पण त्या अवस्थेतही त्याला समजून घेणे व समजावून सांगणे आणि त्यासाठी आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हे सोपे काम नाही. त्यासाठी प्रचंड संयम अंगी असावा लागतो.
'एखाद्याच्या वर्तनाचा द्वेष करा, पण त्या व्यक्तीचा द्वेष करू नका' असं अहिंसेचं तत्व सांगतं. याचा अर्थ समोरच्या माणसाच्या परिवर्तनाच्या शक्यतेवर विश्वास ठेवायला हवा व त्यांना विधायक मार्गाने त्यांची चूक दाखवून द्यायला हवी.
अहिंसा म्हणजे एखाद्यासमोर लाचार होऊन गुडघे टेकणे नव्हे; तर कितीही घायाळ झालो तरी पुन्हा तेवढ्याच हिंमतीने व निर्भीडपणे पुन्हा पुन्हा छातीठोकपणे उभे राहणे होय. हिंसा करताना बलाची आवश्यकता असते, तर अहिंसेसाठी मनोबलाची आवश्यकता असते. हिंसा ही सामान्यतः बलवानाकडून किंवा सत्तेत असणाऱ्याकडून दुर्बलांवर किंवा सत्तेत खालच्या स्तरावर असणाऱ्यांवर होत असते. तर अहिंसेच्या मार्गाने मात्र तुम्ही बलवान असो नसो किंवा सत्तेत असो नसो तरीही तुम्ही लढू शकता.
हिंसा करणाऱ्यांकडे असणाऱ्या शस्त्रापेक्षा प्रभावी शस्त्र वापरून हिंसा सहज दडपली जाऊ शकते. पण अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करणाऱ्यांना दडपण्यासाठी दुसरे प्रभावी शस्त्रच असत नाही हा अहिंसेच्या मार्गाचा फायदा आहे. अहिंसेच्या मार्गाने बदल व्हायला वेळ लागतो, पण झालेला बदल हा खोलवर जातो व लांबपर्यंत टिकतो.
सत्याग्रह हा अहिंसेच्या मार्गातील आक्रमक अहिंसेचा प्रकार आहे. यामध्ये हिंसा न करता सुद्धा समोरच्या विरोधकांच्या मनावर जरब बसवता येते. याचे सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार व वेगवेगळे टप्पे आहेत.
परवा 2 ऑक्टोबर ला येणाऱ्या गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंनिसच्या मुंबईतील दहिसर शाखेतर्फे ज्येष्ठ गांधीवादी नेते व फक्त महाराष्ट्रातच नाही तर *भारतभर सत्याग्रहांच्या प्रयोगांसाठी प्रसिध्द असलेले डॉ. कुमार सप्तर्षी* यांच्यासोबत संवाद आयोजित केलेला आहे. त्यामध्ये कदाचित याविषयी अधिक विस्तृत माहिती मिळू शकेल. गांधीवादाविषयी व अहिंसेच्या मार्गाविषयी तुमच्या मनात असणाऱ्या सर्व प्रश्नांसहित या संवादासाठी आवर्जून उपस्थित राहा.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा