पझेसिव्हनेस 7 - पालकांचे पझेशन - २

अनेक पालकांच्या मुलांना जन्म देण्याच्या आधीपासूनच त्यांच्याविषयी अपेक्षा तयार झालेल्या असतात. या अपेक्षा सुद्धा अनेकदा पालकांमध्ये मुलांप्रती पझेशन (मालकी भाव) तयार करतात. मुलांनी भविष्यात काय करायला हवं, कोण बनायला हवं हे पालक आधीच मनात ठरवून असतात. यात मग मुलांना काय हवंय? त्यांच्यात कोणते कला-गुण आहेत, त्यांच्या क्षमता काय आहेत, त्यांची आवड काय आहे, त्यांची स्वप्नं काय आहेत? या सगळ्या गोष्टी दुय्यय ठरतात. मुलांचे शिक्षणाचे माध्यम, विषयांची निवड, त्यांची करिअरची निवड या गोष्टी सुद्धा मुलांच्या वतीने पालकच ठरवून टाकतात आणि त्यासाठी मुलांकडून तसे प्रयत्न करवून घेतात. अगदी लहानपणापासूनच मग मुलांचा दिवस सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या क्लासेस मध्ये आणि पालकांच्या अपेक्षाच्या ओझ्याखालीच जातात. पुढे करिअरही पालकांच्या अपेक्षेप्रमाणेच निवडावं लागतं किंवा त्यासाठी पात्र ठरू शकले नाही तर अपमानित देखील व्हावं लागतं. या सगळ्यात पालकांचा पझेसिव्हनेसच काम करत असतो. आमची मुलं आम्हाला हवी तशीच झाली पाहिजेत हा हट्ट पालकांमधला मुलांप्रतीचा मालकी भाव दाखवून देतो.

हाच मालकी भाव पुढे मुलांच्या लग्नाच्या वेळी व लग्नानंतरही अजून जास्त प्रमाणात वाढत जातो. आम्ही म्हणू त्याच मुला-मुलीशी लग्न करायला हवे आणि आम्ही नकार देऊ त्यांचा विचार सोडून द्यायला हवा हा पालकांचा आग्रह याच मालकीतून येत असतो. आम्हाला कित्येक पालक असे भेटले जे स्वतःहून असं म्हणतात कि आम्ही मुलांना जन्म दिला, त्यांना वाढवले, त्यांच्यासाठी एवढे काय काय केले, तर मग आमचा त्यांच्यावर अधिकार नाही का? म्हणजे मुलांना जन्म देणे व वाढवणे हे उपकराच्या भावनेतून केले जाऊन पुढे त्यातून मालकी भावना तयार होऊन त्या उपकराच्या बदल्यात आम्ही म्हणू तसे लग्न करावे व आम्ही सांगू तसे आयुष्य जगावे असा अट्टाहास अनेकांचा दिसून येतो. अगदी मुलांच्या लग्नानंतर सुद्धा त्यांचे आयुष्य त्यांना स्वतःच्या मर्जीने जगता येत नाही. लग्नानंतर पती-पत्नीने एकत्र कधी यायचं हेसुद्धा आई-वडिलांच्या सांगण्यावरून ठरतं अशीही उदाहरणे आमच्याकडे आली आहेत. मुलांनी त्यांच्या आर्थिक कमाईचा वापर कसा करावा यावर सुद्धा नियंत्रण ठेवू पाहणारे अनेक पालक दिसतात. अनेक ठिकाणी तर अगदी मुलांना त्यांच्या मर्जीने मिशी किंवा डोक्याचे पूर्ण केस काढण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नसते. मुलीच्या जोडीदार निवडीबाबत तर आई-वडिलांचा मालकी भाव जबरदस्त उफाळून येत असतो आणि अनेकदा आपली पुरुषप्रधान व्यवस्था व पालकांचा हा मालकी भाव मुलींना लग्नाच्या बाजारात वस्तू म्हणून मांडत असतो. त्यांच्या भाव-भावनांचा, त्यांच्या निर्णयांचा यात फारसा विचार केला जात नाही.
मुलांना जन्म देणं व त्यांचे पालन पोषण करून त्यांना मोठं करणं म्हणजे मुलांवर केलेले उपकार असून ते पालकांना मुलांच्या आयुष्याची अप्रत्यक्षपणे मालकी देतात असा एकूण समाजात भाव दिसतो ज्यावर विचार करून तो बदलणे गरजेचे आहे. मुलांना आपल्या मालकीची वस्तू न समजता त्यांना मित्र-मैत्रिणी म्हणून त्यांच्याशी वागलं पाहिजे. मुलांना मोठं करणं, वाढवणं हे उपकार नसून जबाबदारी आहे आणि त्याच्या परतफेडीचे ओझे मुलांवर ठेवून त्यांच्यावर हक्क गाजवणे बंद करायला हवे. पालकांच्या मनातील मुलांच्या बाबतीतला पझेसिव्हनेस कमी होऊन मैत्रभाव वाढला तर पालक व मुला-मुलींचं नातं अधिक सुखकर व बळकट होऊ शकतं. अर्थात हे सरसकट सर्वच पालकांना लागू होत नाही, अनेक पालक यातील अनेक टप्प्यांवर तर काही पालक सर्व टप्प्यांवर सुद्धा याला अपवाद असू शकतील.
- सचिन (8424041159)
(तुमच्याकडेही असे काही पझेसिव्हनेस चे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की द्या.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध