घरकाम - 7

                                                                 घरकाम - 7

अनेक घरांमध्ये दोन्ही प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देत घरकामाला सुरुवात करणारे पुरुष मंडळी वाढत आहेत ही आनंदाची बाब आहे. काहीजण आधीपासूनच करत होते, तर काहीजण या लॉक डाऊनच्या काळात स्वतःहून करायला लागले, तर काहीजण ही लेखमाला वाचून करायला लागले. परवाच आमचा रूपेश सांगत होता कि- लेखात दिलेल्या कामांपैकी मी भांडी घासणे, झाडू मारणे, भाजी आणणे व निवडून देणे, चहा बनवणे आणि उत्तम चपाती भाजणे ही कामं शिकलो आहे व पुढची शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा मनोज तर गेल्या 2 वर्षांमध्ये घरकामात फारच प्रगत झालाय. म्हणजे 2 वर्षांपूर्वी घरकामातलं काहीच करत नसलेला मनोज आज चपात्या व भाकरी सोडल्या तर इतर सगळ्या प्रकारचे घरकाम करतो. परवाच जोसेफ सरांनी कळवलं कि - ते चपात्या शिकण्याचे प्रयोग करत आहेत आणि लवकरच त्रिकोणी आकारातून चौकोनी आकारात प्रवेश करतील याची खात्री आहे. आणि संधी मिळत राहिली तर वर्तुळ पण गवसण्याची शक्यता आहे. - यात त्यांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे. त्यांना लवकर वर्तुळ सापडावे आणि तोपर्यंत त्यांचा घरातील आटा संपू नये व त्यांची संधी हिरावून घेतली जाऊ नये ही त्यांना सदिच्छा. आमचे मित्र म्हस्के डॉक्टर कालच सांगत होते कि सुरुवात म्हणून ते भांडी घासण्यापासून सुरुवात करणार आहेत. आणि लगेच त्यांनी थोड्या वेळातच भांडी घासण्याविषयीचे व्यवस्थापन स्वतः लिहून मला पाठवले. त्यात कोणती भांडी आधी धुवावीत, कोणती नंतर धुवावीत, कशी धुवावीत हे सगळं पद्धतशीर लिहिलं होतं. आता प्रत्यक्ष काम करतानाचा त्यांना अनुभव कसा आहे ते कळेलच पुढे. परवा अहमदनगरच्या ओंकारचा मेसेज आला होता कि तो हे सर्व लेख वाचत आहे आणि लहानपणापासूनच घरकामात मदत करत आलेला आहे. स्वतःची बनियन-अंडरवेअर धुणे, चहा-नाश्ता करणे, झाडू मारणे, छोटी-छोटी भांडी घासणे ही कामे तो करत असतो. त्याबद्दल त्याचे कौतुक आहेच. पण आता इथेच न थांबता याच्या पुढच्या टप्प्यावर त्याने जायला हवे. आमचा रत्नागिरीचा धीरज रोज काहीतरी नवीन प्रयोग करत असतोय. गोरेगावचा निनो आता घरकामात मदत करायला शिकतोय. हळूहळू तो सगळ्याच गोष्टी करायला लागेल. मोझेस सर किचनमधल्या एकेक गोष्ट शिकतायत. आमचा कृतार्थ रोज स्वतःच्या नवनवीन रेसिपीचे फोटो पाठवत असतो. याशिवाय पण अनेकजण असे प्रयोग करत असतील जे हे लेख वाचत असतील आणि जे वाचत नसतील असेही. त्या सर्वांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी सदिच्छा. आमच्या अमित सारखे काहीजण अजून या विचारात संधीची वाट पाहत असतील. त्यांनाही अशा संधी मिळत जावो आणि लवकर त्यांनी पण त्यांचे प्रयोग सुरू करावेत अशी सदिच्छा.
काल अहमदनगरच्या मैत्रिणीचा कॉल आला होता आणि ती सांगत होती कि तिच्या शेजारच्या ताई हे सगळे लेख वाचत आहेत आणि त्यांना ते खूप आवडत आहेत व त्यांना पण अशा प्रकारच्या प्रबोधन कामात सहभागी व्हायचे आहे. अनेकजण वैयक्तिक मेसेज करून हे लेख वाचत असल्याचं कळवत आहेत. अनेक मुलं व पुरुष हे लेख वाचून स्वतः घरकाम करायला सुरुवात करू लागले आहेत. अनेक घरांमध्ये स्त्रिया आपल्या घरातील मुलांना व पुरुषांना घरकामात संधी देऊ लागल्या आहेत. आत्तापर्यंत दोन प्रतिक्रिया अशा आल्या कि - त्यांची किचनमधील सत्ता जातेय कि काय अशी भिती घरातील स्त्रियांना वाटतेय. ही भीती सोडून अनेक घरातील स्त्रिया घरातील पुरुषांना संधी देत आहेत व त्यांना घरकाम शिकण्यामध्ये मदत करत आहेत हे सुद्धा कौतुक करण्यासारखे आहे. ज्या स्त्रिया अजून असं करत नसतील त्यांनी सुद्धा यातून प्रेरणा घेऊन आपल्या घरातील पुरुषांना पुढे येण्याची संधी द्यावी, नाहीतर बिचारे मागेच राहतील आणि याचा दोष नेहमी घरातील विरोध करणाऱ्या त्या स्त्रियांवर राहील.
लेख वाचून येणाऱ्या अशा प्रतिक्रिया व अनुभवांचे मेसेज माझ्या लिहिण्याला प्रोत्साहन देत राहतात. फ्रान्सिस सर, अर्चना ताई, मंदाकिनी ताई, छाया ताई, शरद सर, आरती व असे अनेकजण (सर्वांची नावं घेणं शक्य नाहीय) रोज असं प्रोत्साहन देत असतात.
मोझेस सरांनी दिलेली प्रतिक्रिया - सचिन लिहित रहा. मी वाचतो आहे. माझ्यातील पुरुषी अहंकाराशी लढतो आहे. - या प्रतिक्रियेने तर लिहिण्याचे मोठे बळच दिले. पुढच्या मुद्द्यावर लिहिण्याआधी या सर्वांचा उल्लेख करणं व त्यानिमित्ताने लिहीत राहण्याचे बळ देणाऱ्या या सर्वांच्या कृतज्ञतेत राहणं गरजेचं वाटलं. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
- सचिन (8424041159)
(तुमची प्रतिक्रिया, मत व अनुभव वरील नंबरवर व्हाट्सअप्प करून किंवा फेसबुकवर कमेंट करून नक्की नोंदवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध