कौटुंबिक हिंसा हा सुद्धा हिंसेचा एक मोठा भाग आपल्या समाजात आहे. यामध्ये शारीरिक हिंसेबरोबरच भावनिक हिंसा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते. कौटुंबिक हिंसा ही पुरुषप्रधान व्यवस्थेची उत्पत्ती आहे. आपल्या पुरुषप्रधान समाजामध्ये आत्तापर्यंत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आलेले आहे. आज जरी समानतेची चळवळ बऱ्यापैकी सुरू झालेली असली तरीही अजून बहुसंख्य महिला या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये आजही भरडल्या जात आहेत. 'बायको ही पायातली वहाण (चप्पल) असते आणि ती पायाशीच राहिली पाहिजे' अशी मानसिकता बाळगणारे पुरूष बायकोला फक्त गरजा भागवण्याचे यंत्र मानून वागवत असतात. बायको ताब्यात राहिली पाहिजे, ती डोक्यावर चढता कामा नये असे सल्ले देणारे महाभाग सुद्धा या कौटुंबिक हिंसेला जबाबदार आहेत. त्याचबरोबर बायकांनी बायकांसारखंच राहिलं पाहिजे, मर्यादा सांभाळून जगलं पाहिजे वगैरे उपदेशाचे डोस पाजणारे संस्कृतीरक्षक आणि आपल्यावर आपल्या सासूने केलेल्या अन्यायाचा बदला आपल्या सुनेवर अन्याय करून घेण्यात मजा वाटणाऱ्या स्त्रिया सुद्धा याला जबाबदार आहेत.
या व्यवस्थेमध्ये पुरुषाकडून स्त्रीवर होणारा अन्याय व हिंसाचार तर आहेच, पण त्याचवेळी या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या सत्तेच्या पक्षात असणाऱ्या म्हणजेच मुलांच्या आई होणाऱ्या ज्या सासवा सासू म्हणून मर्यादित सत्ता हाती आल्यावर त्याचा उपयोग करून प्रामुख्याने घरातील नव्या स्त्रीवर हक्क गाजवण्यातच समाधान मानतात त्या सुद्धा याचा एक भाग आहेत. त्या तरी काय करणार बिचाऱ्या! त्यांचं उभं आयुष्य त्रास सहन करण्यात किंवा स्त्री म्हणून समाजाने लादलेली बंधनं, जबाबदाऱ्या आणि परंपरा सांभाळण्यात गेलेलं असताना सासुपणामुळे किमान कुणावर तरी सत्ता गाजवण्याचा मर्यादित का होईना अधिकार त्यांना मिळत असतो, यातच जीवनाचे कल्याण मानून या स्त्रिया सुनांवर अधिकार गाजवण्याची परंपरा पुढे चालू ठेवतात. खरंतर ज्या दिवशी घरातील या सर्व स्त्रिया एक होऊन समानतेचा आणि सन्मानाच्या जगण्याचा आग्रह धरतील आणि त्यासाठी त्या स्वतः आधी एकमेकींचे स्वातंत्र्य, सन्मान आणि समानता मान्य करतील, त्यादिवशी खऱ्या अर्थाने त्यांना इतरांकडून सुद्धा सन्मानाचं जगणं मिळण्याची सुरुवात होईल.
स्त्री व पुरुष हे दोघेही समान आहेत. मग ते कोणत्याही नात्यात असो. आपले मुलगी-मुलगा, बहिण-भाऊ असोत, प्रेयसी-प्रियकर असोत कि मित्र-मैत्रिणी असोत किंवा लग्न झालेले जोडीदार असोत, प्रत्येक टप्प्यावर जेव्हा ही समानता प्रस्थापित होईल तेव्हा या हिंसेला नक्कीच आळा बसू शकेल. त्यासाठी लहानपणापासूनच मुला-मुलींना वाढवताना या समानतेच्या विचारांनीच वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपण आज नात्याच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर ही समानतेची भावना आपल्या स्त्री-पुरूष सहकाऱ्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष जगायला सुरुवात करायला हवी. आणि ते करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी कि 'प्रत्येक जीव हा जन्मतःच स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला येत असतो.' त्यामुळे प्रत्येकजण जन्मतःच स्वतंत्र असतो. आपण कुणालाही स्वातंत्र्य देत नसतो, तर आपण फक्त प्रत्येकाचं हे स्वातंत्र्य मान्य करायला हवं आणि आपल्या जगण्या-वागण्यातून आपण कुणाचं स्वातंत्र्य हिरावून तर घेत नाही ना याचा सदैव विचार करायला हवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा