पझेसिव्हनेस 6 - पालकांचे पझेशन
पझेसिव्हनेस ची सुरुवात तर आपल्या आयुष्यात आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांकडूनच प्रथम होते. आपण अगदी लहान असतानाची आपल्या बद्दलची काळजी कधी त्यांच्या पझेशन मध्ये बदलते हे त्यांच्याही लक्षात येत नाही. मुलांचे वय वाढते तशी त्यांची स्पेस सुद्धा वाढत जाणे गरजेचे असते याकडे अजूनही आपल्याकडे लक्ष दिले जात नाही. लहानपणी त्यांना कळत नाही म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्या वतीने आपण निर्णय घेत असतो; पण जेव्हा त्यांना कळायला लागते तेव्हा त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देणे गरजेचे असते. अर्थात 'मुलांना समज येणे' ही एक निरंतर प्रक्रिया आहे. यामध्ये कोणत्याही एका टप्प्यावर अचानक त्यांना सगळी समज आली असं होत नसतं, तर हळूहळू एकेका गोष्टीविषयी त्यांची समज विकसित होत जातं असते. त्यांना जेवढी जास्त स्पेस मिळत जाईल तेवढीच त्यांची समज सुद्धा व्यापक बनत असते. याबाबतीत आपल्या असं लक्षात येईल कि ज्या गोष्टींपासून मुलांना पालकांनी लहानपणापासून नेहमीच दूर ठेवले, त्या गोष्टींची समज मुलांमध्ये वेळीच पुरेशी विकसित होत नाही. उदाहरणार्थ, गॅस जवळ (किंवा चुलीजवळ किंवा स्टोव्ह जवळ) अजिबात फिरकायचे नाही असा काही घरांत मुलांना दम भरला जातो. त्यासाठी त्यांना किचनमध्ये येऊ सुद्धा दिलं जात नाही. त्या घरातील मुलांना गॅस किंवा स्टोव्ह कसा पेटवायचा आणि कसा बंद करायचा हेसुद्धा अनेक दिवस कळत नाही. स्वयंपाकघरातील पुढचा अभ्यास तर लांबची गोष्ट राहिली. तर काही घरांमध्ये अगदी लहानपणापासून मुलांना खेळायलाच स्वयंपाक घरात बसवलं जातं. त्यांना धान्य, पीठ, त्यांच्या साईजची शेगडी व इतर भांडी आणून दिली जातात व पुढे प्रत्यक्ष कामात पण सहभाग दिला जातो. त्या घरातील मुलं अगदी कमी वयात उत्तम स्वयंपाक सुद्धा करायला लागतात. अर्थात अशी उदाहरणे अपवादात्मक आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा