घरकाम - 6

                                                                     घरकाम - 6

पहिला स्वतःच्या सवयींचा अडथळा पार पाडून पुढे येऊ पाहणाऱ्या पुरुषांना त्याच वेळी दुसऱ्या अडथळ्याला सामोरे जावे लागते. ते म्हणजे घरातील पुरुषप्रधान व्यवस्थेचे पाईक असणारे स्त्री-पुरुष नातेवाईक. त्यांना असं पुरुषांनी घरकाम केलेलं सहन होत नाही आणि मग ते याला विरोध करण्यासाठी टोमणे देणे, उपहास करणे, अपमान करणे यासारख्या गोष्टी सुरू करतात. हा विरोध तुलनेने पुरुषाचे लग्न व्हायच्या आधी कमी असतो, पण लग्न झालेल्या पुरुषांना आणि त्यांच्या जोडीदारांना यात खूप काही ऐकावे लागते. अनेक ठिकाणी लग्नाआधी मुलांनी घरकाम केलेलं चालतं, पण लग्नानंतर केलेलं चालत नाही. त्यात जर लग्नाआधी काम करत नसतील आणि लग्नानंतर करायला लागले मग तर काय खैरच नसते. त्यासाठीच मुलांना आमचं सांगणं असतं कि तुम्ही लग्नाआधी पासून घरकाम करत असणं गरजेचं आहे. आणि शिवाय लग्नानंतर सुद्धा हे कायम राहणार आहे याविषयी घरच्यांना आधीच कल्पना दिलेली असायला हवी.
घरकामाला सुरुवात करायला लागलेलं असतानाच जर असे काही अडथळे आले तर मात्र 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास' अशी स्थिती होते. आणि मग अनेकजण सोयीस्करपणे तिथेच थांबतात. कारण तिथे सांगायची संधी पण असते कि- मी केला होता प्रयत्न, पण आमच्या घरातील स्त्रियाच मला करू देत नाही. पण अशावेळी काही वेगळे पर्याय वापरून आपण तिथे टिकून राहणं आणि शिकण्याचा प्रयत्न करणं याची जास्त गरज असते. 'मला किचनमधून बाहेर काढलं' असं सांगणाऱ्या माझ्या एका मित्राला मी हेच सांगितलं कि - तू त्यांना त्रास होईल असं काही न करता त्यांना मदत होईल अशा क्रमाने सुरुवात करणं आणि त्याचवेळी त्यांच्याशी याविषयी संवाद करत राहणं हेसुद्धा गरजेचं आहे. 'त्यांना या घरकामाच्या पोस्ट वाचायला दे' असं सुद्धा त्याला मी गंमतीने सांगितलंय. पाहुयात काय फरक पडतोय. याशिवाय 'तो इंटरेस्ट घेऊन काम करत नाही आणि त्यामुळे जे काही करतो त्यात बिघडवूनच जास्त ठेवतो. म्हणून मी त्याला नकोच म्हणते किचनमध्ये यायला.' अशी तक्रारही माझ्या एका मैत्रिणीने केली. त्यावर सुद्धा वर दिलेलंच उत्तर लागू होतं. खरंतर अशा वेळी घरातील स्त्रियांनी पुरुषांच्या या प्रयत्नांना दाद देत त्यांना मदत करत त्यांचा उत्साह वाढवत राहायला हवं आणि त्यांना हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवायला हव्यात. याबाबत आमच्या छाया ताईनी सांगितलेला अनुभव याठिकाणी महत्वाचा आहे. त्यांनी हे लेख वाचून जाणीवपूर्वक आता मुलावर काही प्रयोग करायचे ठरवले आहेत. त्यानुसार यावेळी मुलाला किराणा भरण्यासाठी पाठवलं आणि मग त्याने मूग आणायला सांगितलेले असताना मुगाची दाळच कशी आणली याविषयीचे वर्णन त्यांनी मला पाठवले होते. आम्ही तर किती वेळ यावर हसत होतो. पण या सगळ्यात चुकांना दिलेली संधी, त्यावर सांगितलेली सुधारणा आणि तरी पुन्हा दुसरी चूक करण्याची दिलेली संधी हेच खूप गरजेचं आणि महत्वाचं असतं हे लक्षात घ्यायला हवं. आपण अभ्यासात एखादं गणित चुकलं म्हणून 'तू आता गणित शिकणं बंद कर' असं म्हणतो का? तसंच इथंही जर केलं तर नक्कीच थोड्या दिवसात 'घरकाम' हा विषय पण परफेक्ट होईल. छायाताई पुढे सांगतात कि- तो आता भांडी पण छान घासायला लागलाय. चुकून काल एक दिवस स्वतःची भांडी घासायची सोडून तसाच निघाला असताना त्यांनी फक्त आठवण करून दिली कि 'सचिनदादा तुझं किती कौतुक करतोय' तर लगेच त्याच्या लक्षात आलं आणि त्याने भांडी घासून टाकली. ही सुद्धा सुरुवात खूप छानच आहे. आणि खरंतर असं स्वागत आणि मदत घरातील स्त्रियांनी करत राहणं हे यात खूप गरजेचं आहे. सुरुवातीला त्यांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं पण कौतुक करणं आणि चुका झाल्या तरी 'त्या होतातच' असं सांगून तेवढ्यावर न थांबता त्या चुकांवर मात कशी करायची ते सांगत राहणं गरजेचं आहे. शिवाय आधी आपण बोललो तसं सुरुवातीलाच अगदी मास्टर शेफ बनायची तयारी न करता हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी शिकत आणि स्वयंपाकाशिवाय इतर पण घरकामं आहेतच जे सुरुवात करण्यासाठी छान आहेत हे लक्षात घेऊन सुरुवात करावी. हळूहळू टप्पे वाढवत नेत मग स्वयंपाकातील प्रयोग पण शिकता येतात. जसं आपण सुरुवातीला एक-दोन म्हणायला शिकतो, एकदम चार आकडी गुणाकार शिकत नाही किंवा एबीसीडी न शिकता डायरेक्ट वाक्य बनवायला शिकत नाही, अगदी तसंच इथं पण घरकामाच्या एक-दोन आणि एबीसीडी पासून सुरुवात केली आणि ते येत असणाऱ्या त्या विषयातील घरातील शिक्षकाने तसं शिकण्याची संधी दिली तर नक्कीच या विषयात पण घरोघरी चांगले प्रगत विद्यार्थी तयार होतील. यामध्ये घरातील शिक्षकांची पण तेवढीच जबाबदारी आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी आत्तापासून असं म्हणायला हरकत नाही कि- 'मुलगा घरकाम शिकला, प्रगती झाली.'
- सचिन (8424041159)
(तुमच्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव व्हाट्सअप्प वर मेसेज करून किंवा फेसबुकवर कमेंट करून नक्की शेअर करा. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध