हिंसा-अहिंसा - भाग- 5 - अप्रत्यक्ष हिंसा
हिंसेच्या अनेक प्रकारांपैकी जे काही प्रकार व त्याची कारणे आपण पाहिलीत, ते सर्व प्रत्यक्ष हिंसेशी निगडित असणारे होते. पण असेच प्रत्यक्ष हिंसेशी संबंधित नसलेले सुद्धा काही हिंसेचे प्रकार असतात ते आज आपण पाहू. यातल्या काहींना हिंसा म्हणणं हे विवादास्पद ठरू शकेल व त्यावर चर्चा होण्यास वाव असू शकेल असेही काही प्रकार आहेत.
यात पर्यावरणाची होणारी हिंसा, झाडांच्या राजरोस होणाऱ्या कत्तली, मांसाहार व संरक्षणार्थ केलेला प्रतिकार या गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये प्रत्यक्ष भावना ही हिंसा करण्याची म्हणजेच हिंसक नसते; पण त्याच्या परिणामास्तव समोरच्या जीवाची हत्या मात्र होत असते. झाडांच्या कत्तलीमुळे झाडांचा तर जीव जातोच, पण त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक प्राण्यांचे सुद्धा हाल होतात व अनेकदा त्या कत्तलीत त्यांचे जीव पण जातात. शिवाय त्यामुळे पर्यावरणावर सुद्धा अनेक विपरीत, कायमस्वरूपी व भरून न निघणारे परिणाम होतात, ज्यामुळे पृथ्वीवरील सर्वच सजीवांचे जीवनमान धोक्यात येते.
मांसाहार करणाऱ्या व्यक्तींच्या मनात सुद्धा त्यामागे हिंसक भावना नसते; पण त्यातून अनेक निष्पाप प्राण्यांचा जीव मात्र जातो. फक्त कायद्याने याला मान्यता असल्याने आपण याकडे त्यादृष्टीने कधी बघत नाही एवढंच. मात्र कायद्याने मान्यता नसणाऱ्या इतर प्राण्यांची कोणी शिकार केली किंवा त्यांना जाणीवपूर्वक इजा पोचवली किंवा मारले तर त्याला प्राण्यांची हिंसा म्हणून बघितले जाते व त्यावर गुन्हा सुद्धा दाखल होतो. त्यामुळे जरी समाजमान्य व कायदेशीर असले तरी ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
स्वतःच्या संरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारातून झालेली हिंसा याकडे कसे बघावे असाही प्रश्न अनेकांना पडलेला असतो. या सर्वच बाबतीत हिंसेकडे बघताना काही मूळ गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. एखादी घटना हिंसेची घटना आहे कि नाही ही वेगळी व स्वतंत्र बाब आहे आणि ती हिंसा चूक कि बरोबर ही दुसरी वेगळी व स्वतंत्र बाब आहे. एखाद्या घटनेतून जर हिंसा घडली असेल तर ती घटना हिंसकच असते. ती हिंसा करणे त्या ठिकाणी बरोबर होते कि चूक? ही नंतरची बाब आहे. पण त्यावरून झालेली हिंसा आपण बदलू शकत नाही, तर फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.
पण याचा अर्थ वृक्षतोड करणारी, मांसाहार करणारी व प्रतिकारासाठी हिंसा केलेली व्यक्ती ही हिंसक मानसिकतेचीच असेल असा अर्थ होत नाही आणि तसेच कधीही वृक्षतोड किंवा मांसाहार न केलेली व्यक्ती अहिंसकच असेल असाही याचा अर्थ निघत नाही. अनेक मांसाहार करणाऱ्या व्यक्ती या मनाने खूप प्रेमळ सुद्धा असतात व वृक्षतोड करणारे अनेकजण शाकाहारी व अहिंसक सुद्धा असतात हेही इथे लक्षात घ्यावे लागेल.
मुळात हिंसा करताना त्यामागची असणारी भावना व उद्देश हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा त्या कृतीमागची भावना ही राग, द्वेष, सूड, असूया किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक समोरच्याला इजा पोचवण्याची असते तेव्हा ती कृती सामान्यतः हिंसक म्हणून गणली जाते. अशी कोणतीही भावना किंवा हेतू नसताना वर सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे घडणाऱ्या ज्या काही हिंसेच्या घटना आहेत त्यांनासुद्धा अशाच प्रकारे हिंसेच्या पण सौम्य हिंसेच्या घटना म्हणता येईल.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा