पझेसिव्हनेस 5 - स्पेस आणि पझेशन

स्पेस (मोकळीक) आणि पझेशन (मालकी) हे एकमेकांचे विरुद्ध टोक आहेत. जिथे स्पेस आहे तिथे पझेशन असत नाही आणि जिथे पझेशन असते तिथे स्पेस संपलेली असते. पझेशन हे समोरच्यावर लादलं जातं आणि त्यातून समोरच्या व्यक्तीच्या अनेक स्वातंत्र्यावर बंधनं घातली जातात; तर स्पेस ही मुळातच प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार जगण्याची मुभा देत असतं. पझेशन आपल्या या स्पेसवरच घाला घालतं. समोरच्याने कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं अशा सगळ्या गोष्टी या स्वतःकडे पझेशन घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीच ठरवू लागतात आणि मग समोरच्याची कुचंबना होते.

'ही अशी कपडे पुन्हा अजिबात घालायची नाहीत.' या एका वाक्यात किती जबरदस्त पझेशन आहे! आणि हे वाक्य सर्रास सगळीकडे वापरताना आपण पाहतो. म्हणजे आत्तापर्यंत हे वाक्य आपण आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी व जोडीदार आणि अनेकदा स्वतःची मुलं या सर्वांकडून ऐकलेलं असेल. आपणही कित्येकदा कुणाला असं बोललेलो असू. किती सहज बोलून जातो ना आपण हे. पण या बोलण्यातून आपण समोरच्या व्यक्तीची स्वतःच्या मर्जीने पेहराव करायची स्पेस किंवा मोकळीकच हिरावून घेतो हे आपल्या लक्षात येत नाही. आता कित्येकांना असं वाटेल की 'मी काय पझेशन मधून नव्हतो बोललो/बोलले, त्याला/तिला एक सजेशन म्हणून बोलले/बोललो होतो. त्यामुळे तेच चांगले दिसावे हाच हेतू होता ना.' तर अगदी मान्य आहे. हेतूवर आपण शंका घेतच नाही. पझेशन असणारी व्यक्ती ही वाईट किंवा चुकीच्या हेतूने काही करते असं अजिबात नाहीच ना. मग आपण कशामुळे बोलतो असं? तर एकतर समोरच्याची काळजी म्हणून, त्या व्यक्तीवरचं प्रेम म्हणून किंवा तिचं त्यातून चांगलंच व्हावं या प्रामाणिक अपेक्षेनेच आपण करतो. पण आपलं हे प्रेम, काळजी व चांगलं व्हावं असा प्रामाणिक हेतू समोरच्याची स्पेस कमी करतोय याकडे आपलं लक्ष जात नाही. मग अशा वेळी काय करावं? समोरच्याला काही चांगलं सांगूच नये का? तर नक्की सांगावं. पण ते सांगताना समोरच्याचे निर्णय स्वातंत्र्य व विचार स्वातंत्र्य अबाधित ठेवून सांगता यायला हवे. 'असे कपडे पुन्हा अजिबात घालायचे नाहीत.' यात समोरच्याला निर्णय घ्यायला किंवा विचार करायला काही जागाच राहात नाही. आपणच त्याच्या वतीने विचार करून व निर्णय घेऊन मोकळे होतो आणि त्याच्याच जगण्याविषयी त्याच्यावरच ऑर्डर सोडतो. इथेच जर आपल्याला असा बदल करता आला तर?- 'मला तू हे असे कपडे घातलेले अजिबात आवडत नाही. ते तुला मुळीच चांगले दिसत नाही, असं मला वाटतं.' यामध्ये आपण आपलं मत समोरच्यापर्यंत पोचवत आहोत आणि त्याचबरोबर त्याविषयी चा निर्णय त्याच्यावर सोडत आहोत. मग यावर विचार करणं, आपल्या मतानुसार बदल करायचा कि नाही करायचा हे ठरवणं ही समोरच्याची स्पेस आपण अबाधित ठेवून आपलं काम करतो.
इथे कपड्यांचं हे फक्त एक उदाहरण म्हणून घेतलं आहे जे सध्या अगदी कॉमन सगळीकडे आढळतं. पण याच्यासोबत अशा अनेक गोष्टी येतात ज्यामध्ये आपली प्रिय व्यक्ती आपल्याला हवं तशी दिसायला हवी या अट्टाहासाने आपण तिला बदलायचा आग्रह धरतो व अनेकदा हा आग्रह समोरच्यावर जबरदस्ती लादला जातो. हे लादणे विचारपूर्वक आपल्याला थांबवता येऊ शकते, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येक वेळी तसा विचार करणे गरजेचे आहे.
- सचिन (8424041159)
(तुमच्याकडेही असे अनेक अनुभव असतील, तर नक्कीच शेअर करा. आणि सर्व लेख एकत्रित वाचण्यासाठी या फेसबुक पेजला नक्की जॉईन करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध