घरकाम - 5
घरकाम - 5
एकूणच असं लक्षात येतंय कि आजकाल अनेक तरूण मुलांपासून तर काही ज्येष्ठ पुरुषांपर्यंत बऱ्यापैकी घरकामाचं महत्त्व लक्षात घेत आहेत. किमान आपण हे करणं गरजेचं आहे हे त्यांना पटतंय तरी. पण तरी त्यांच्या मार्गातले अडथळे बरेच आहेत. मोठा अडथळा तर आधी स्वतःवरील पुरूषी संस्कारांचा आणि त्यामुळे झालेल्या सवयींचा आहे आणि तो पार केला तर पुढचा अडथळा घरातील व समाजातील पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या स्त्री-पुरुषांचा आहे. अनेक मुलं व पुरुष अजूनही पहिल्याच अडथळ्यावर अडकलेले आहेत. हा जरा थोडा अवघड टप्पा असला तरी तो आपल्या हातात असतो. कारण इथं आपल्याला आपल्याशीच लढायचं असतं. आपल्याला आत्तापर्यंत पुरुष म्हणून मिळालेल्या सवलतींना नाकारायचं असतं. आणि हेच नेमकं अनेकांच्या जीवावर येतं. अनेक पुरुषांना त्यामुळेच समानतेचा विचार पटत असूनही प्रत्यक्ष कृतीत आणणं जमत नाही, कारण त्यासाठी आयत्या मिळणाऱ्या सवलतींना सोडायची त्यांची तयारी नसते. मी आयता बेडवर लोळत पडून सुद्धा मला चहा-नाश्ता मिळण्याची सोय या पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेली असूनही मी ती सोडून उठून किचनमध्ये जायचं आणि स्वतःचा व इतरांचा चहा-नाश्ता बनवायचा हे नको वाटतं. मी आयतं सोफ्यावर बसून टीव्ही पाहत मला जेवण मिळण्याची व्यवस्था असताना ते सोडून उगाच किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवायची कटकट कशाला? अगदी मी अंघोळ केलेली चड्डी सुद्धा आयती धुवून मिळण्याची व्यवस्था असताना मी उगाच सगळे कपडे स्वतः धुणे किंवा मशिनला लावण्याचे कष्ट कशाला घ्यायचे? असे विचार या पुरुषांच्या मनात येत असतात आणि त्यामुळे त्यांना हे समानतेचे विचार कितीही मान्य असले तरी ते आचरणात आणायला नको वाटत असल्याने अनेकदा ते उघड उघड समानतेचे विचार मान्य करायला सुद्धा तयार होत नाहीत. सोनेरी पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखी त्यांची अवस्था झालेली असते. समानतेचे विचार योग्य पण वाटतात, पण विषमतेतलं हे सुख पण सोडवत नाही. त्यामुळे काहीजण या समानतेच्या मुद्द्यावर पोपटासारखे बोलत तर असतात, पण प्रत्यक्षात मात्र कृतीत यातलं काही आणण्यासाठी धडपड करण्याची त्यांची तयारी नसते. अशा विषमतेच्या सोनेरी पिंजऱ्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांना सुरुवातीला ठरवून बरेच प्रयत्न करावे लागतील हे नक्की. पण एकदा ते अंगवळणी पडले कि मग समानतेच्या वाटेने चालणाऱ्या कृतिशील वाटसरुंपैकी मी सुद्धा एक आहे याबद्दल जो अभिमान वाटेल तो या बंद पिंजऱ्यातील पोपटाच्या आनंदा पेक्षा खूप मोठा असेल. त्यामुळे अशा सर्व माझ्या पुरुष मित्रांना मी मनापासून आवाहन करीन कि- 'सोडा तो पिंजरा, या बाहेर. झटका आळस. घ्या थोडे कष्ट, जुने संस्कार व सवयी पुसण्यासाठी. आणि बघा या समानतेच्या वाटेवर एक पाऊल ठेवून. तुम्हाला स्वतःलाच कसे पंखांत बळ आल्यासारखे वाटेल बघा.'
- सचिन (8424041159)
(तुमचे अनुभव, मते व प्रतिक्रिया व्हाट्सअप्प वर मेसेज करून नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा