शेअरिंग-केअरिंग- 5 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग- 4
करिअर झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असा आग्रह आता फक्त मुलं च धरतात असं नाही. मुलीसुद्धा याबाबत आता जागरूक आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मीनाने सुद्धा करिअर झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं घरी स्पष्ट सांगितलं होतं आणि तिच्या घरच्यांनाही ते मान्य होते. करिअर सेट होईपर्यंत वयाचा तिशीचा टप्पा उलटून गेला होता. आता लग्नासाठी स्थळांची शोधाशोध सुरू झाली. आपल्या समाजात असणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेनुसार मुलगा हा मुलीपेक्षा वयाने थोडा तरी जास्तच असायला हवा होता आणि शिवाय शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत पण जास्तच असायला हवा होता. यात बराच वेळ गेला. शेवटी खूप मुश्किलीने स्थळ मिळाले. फार चौकशी न करता व जास्त वेळ न घालवता लग्न करून टाकले.
आधीच हनिमून पॅकेज बुक करून ठेवलेले असल्याने लग्नानंतर लगेच दोघेही हनिमूनला गेले. लग्न ठरणं, होणं व आता हनिमूनला येणं इथपर्यंत च्या सर्व गोष्टी इतक्या पटापट होत गेल्या कि या काळात दोघांना एकमेकांसोबत फार वेळ मिळालाच नाही. अरेंज मॅरेज असल्याने आधीच दोघेही एकमेकांना अपरिचित होते, त्यामुळे हनिमूनला जाताना दोघांनाही एक वेगळेच दडपण जाणवत होते. प्रवास विमानाचा असल्याने प्रवासातही फार वेळ मिळाला नाही. जो काही मिळाला, त्यात थोडं फार बोलणं झालं. पण बोलण्यातील औपचारिकता संपेपर्यंत प्रवास संपला. या सगळ्यामुळे प्रत्यक्ष हनिमूनसाठी दोघेही तसे मनापासून तयार नव्हते. पण हे समोरच्याला सांगणार कसं व आपण हे सांगितलं तर त्याचा काही वेगळाच अर्थ तर काढला जाणार नाही ना? या भीतीने दोघेही मनातील या दडपणाविषयी एकमेकांशी बोलले नाहीत. पण त्यामुळे जसजशी हनिमूनची रात्र जवळ येत होती, तशी दोघांच्याही मनातील अस्वस्थता अधिकच वाढत होती. पण शरीरसंबंधासाठी नाही म्हणू तर पुन्हा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून तेव्हाही कुणाला एकमेकांशी याविषयी बोलता येईना. या सगळ्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष सेक्स करताना दोघांनाही एकमेकांना साथ देता आली नाही व प्रत्यक्ष सेक्स होऊच शकला नाही. यात नेमकं कुणाचं काय व कुठं चुकलं हे दोघांनाही कळेना. दोघेही मनातून स्वतःलाच याविषयी दोष देत होते व बहुतेक आपल्यात काहीतरी कमतरता आहे असे दोघांनाही वाटायला लागले. आता आपली सेक्स लाईफच संपली आणि आता आपले लग्न पण टिकेल कि नाही असे अनेक विचार दोघांच्याही मनात येऊ लागले. याच विचारात हनिमूनचे पुढचे सगळे दिवस संपून दोघेही घरी आले व पुढचे अनेक दिवस दोघांमधला हा न्यूनगंड असाच वाढत राहिल्याने त्यांची सेक्स लाईफ सुरू होण्याआधीच संपल्यात जमा झाली.
यात नेमकं काय झालं? काय व्हायला हवं होतं? कुणाचं, कुठं काय चुकलं हे त्यांना कळलं नाही, पण तुम्हाला यातून नेमकं काय कळलं? यावर काय उपाय करायला हवे होते?
असं किंवा या अनुषंगाने जे काही बोलावंसं, सांगावंसं, शेअर करावंसं वाटत असेल ते खालील नंबर वर नक्की कळवा.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा