हिंसा-अहिंसा - भाग 4

 जात, धर्म, प्रांत, भाषा अशा संकुचित अस्मितांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी हिंसा करणाऱ्या व घडवून आणणाऱ्या मनोवृत्ती विषयी आपण बोललो. तसेच सत्तेसाठी सुद्धा अशा दंगली व हिंसा घडवून आणणाऱ्यांची एक हिंसक जमात आपल्या समाजात असते. त्यांची शिकार हे नेहमीच वर दिलेले संकुचित अस्मितांच्या खोट्या प्रतिष्ठा बाळगणारे भावनिक, भाबडे व अनेकदा मूर्ख असणारे लोकं असतात. याच लोकांचा वापर करून आपली राजकीय किंवा धार्मिक सत्ता प्रस्थापित करण्याचे काम अनेकजण करत असतात. या सगळ्या हिंसांवर उपाय आधीच्या लेखात दिल्याप्रमाणे चिकित्सक विचार करणे आणि स्वतःच्या धडावर स्वतःचेच डोके ठेवून विचारपूर्वक वागण्याची सवय सर्वांनी लावून घेणे हाच आहे.

आजकाल जातींच्या खोट्या व भ्रामक अस्मिता जाणीवपूर्वक काही स्वार्थी घटकांनी अधिक प्रबळ बनवलेल्या आहेत. त्यांची इतकी दहशत समाजात असते कि त्यातून जातीबाहेर अनेक व्यवहार करण्यावर सुद्धा मर्यादा घातली जाते. याचे शिकार अनेकदा तरूण मुलं सुद्धा होतात. जातीबाहेर प्रेम केलं म्हणून कधी पोटच्या मुलीची, कधी तिच्या प्रियकराची तर कधी दोघांचीही हत्या करणारे आणि तरीही स्वतःला पालक म्हणून घेणारे षंढ, नेभळट आई-वडील तर आपल्या समाजात आहेतच, पण त्यांना असा षंढपणा करायला भाग पाडणारे माणूस म्हणून जगायलाही नालायक असणारे जातीतील तथाकथित जातीप्रेमी लोकं हेसुद्धा आपल्या समाजात आहेत आणि ते अशा गोष्टींना प्रतिष्ठा देऊ पाहतात ही एक आपल्या समाजातील लाजिरवाणी गोष्ट आहे.
पोटच्या पोरांचा खून करायला भाग पाडणारी ही हिंसक मानसिकता जातीच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली आपल्याकडे जोपर्यंत जोपासली जाईल तोपर्यंत हे असे हिंसक प्रकार थांबणार नाहीत.
प्रेमाच्या नावाने होणारी हिंसा हा सुद्धा एक गंभीर प्रकार आपल्याकडे आहे. खरं तर 'प्रेम कशाला म्हणावं अन कशाला म्हणू नये?' हेच कळले नसणाऱ्यांकडून या गोष्टी होतात. एकतर्फी प्रेमातून मुलीला त्रास देणारे, तिचा जीव घेणारे, तिच्यावर हल्ले करणारे, तिची किंवा त्याची बदनामी करणारे असे अनेक प्रेमाच्या नावाखाली प्रेमाची बदनामी करणारे महाभाग आपल्याकडे आहेत. शिवाय या घटनांना एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या किंवा हल्ले असे म्हणून प्रसिद्धी देऊन प्रेमालाच बदनाम करणारी माध्यमे व आपण सर्वजण सुद्धा याचा भाग आहोत. खरंतर प्रेम एकतर्फी असो किंवा दोन्ही बाजूने असो, जिथे प्रेम आहे तिथे हिंसा असूच कशी शकते? आणि जिथे हिंसा झालीय तिथे प्रेम असूच कसे शकते? हा साधा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही.
प्रत्यक्षात आकर्षणाला प्रेम समजून बसणारे आणि ते मिळाले नाही म्हणून असे प्रकार करणारे हे लोकं असतात. त्यांच्या मनात समोरच्या बद्दल जरा जरी प्रेमाची भावना असेल तरी ते समोरच्याला त्रास होईल असं कधीच वागणार नाहीत ही साधी गोष्ट आहे.
टीव्ही मधून आकर्षणाच्या गोष्टी प्रेम म्हणून दाखवत असल्याने खरे प्रेम न समजणे, निसर्गतः वाटणाऱ्या आकर्षणाला कसे हाताळावे हे न समजणे व या विषयावर बोलण्याची मोकळी जागा घरात किंवा शाळा-कॉलेजमध्ये पालक किंवा शिक्षकांकडे न मिळणे हे या सर्व मानसिकतेमागचे कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे.
अनेकदा अशा आकर्षणाच्या टप्प्यावर स्वतःला संपवून घेणारे किंवा स्वतःला इजा करून घेणारे सुद्धा अनेकजण असतात. हा सुद्धा स्वतःवर होणाऱ्या हिंसेचाच एक प्रकार आहे हे लक्षात घ्यावे लागेल. त्याकरता प्रेम आणि आकर्षण यातील फरक लक्षात येणे सुद्धा महत्वाचे असते, जे अनेकदा होत नाही म्हणून असे प्रकार घडतात. एक साधी गोष्ट त्यासाठी इथे लक्षात घेता येईल कि 'प्यार कभी किसीं को बरबाद नहीं कर सकता', 'अगर कोई बरबाद हो रहा है तो वो प्यार नहीं हो सकता'. क्योकि 'प्यार तो हमेशा सिर्फ आबाद ही करता है'.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध