पझेसिव्हनेस 4 - प्रेमाचा अतिरेक

पुण्यात असताना मी एका काकांकडे काही दिवस राहात होतो. त्यांचा माझ्यावर प्रचंड जीव होता आणि त्या प्रेमापोटीच ते माझे खूप (अति) लाड करायचे. माझं आवडतं जेवण बनवणे, मला आवडतात म्हणून मध्ये मध्ये सारखे गुलाबजाम घेऊन येणे या आणि अशा माझ्या खाण्यापिण्यापासून इतर खूप गोष्टी ते करायचे. पण त्यांचे हे लाड माझ्या मात्र कधी कधी खूप जीवावर यायचे. कारण त्यात मला विचारून काही न होता माझ्यासाठी म्हणून परस्पर निर्णय घेऊन तेच करायचे. त्यावेळी मी पुण्यातील एका सामाजिक संस्थेत काम करायचो. कधी मी कामावरून घरी येईपर्यंत यांनी माझ्यासाठी एक नवीन शर्ट आणलेला असायचा. त्यांच्या पसंतीने. म्हणजे त्यांना मला जसं पाहायला आवडतंय तसा. अगदी प्लेन. ज्यावर एकही रेषा कुठे शोधूनही सापडणार नाही आणि एक रंग सोडून दुसऱ्या रंगांची छटा सुद्धा त्या शर्टवर असणार नाही असा. सुरुवातीला मी त्यांचं प्रेम समजून घेऊन तो आनंदाने घेतला. पण पुन्हा मला न विचारता माझ्यासाठी असं काही घेऊ नका असं मी त्यांना सांगितलं. तरी पुढच्याच आठवड्यात असाच पुन्हा एक शर्ट आला. अगदी सेम. दोन्ही शर्टच्या कलर मध्ये असणारा थोडासा फरक ते शर्ट शेजारी ठेवल्याशिवाय कळणार नाही असा. आता मात्र मी थोडं चिडूनच त्यांना सांगितलं कि मला असं आवडत नाही म्हणून. त्यावर त्यांची प्रतिक्रिया शून्य. चेहऱ्यावर नेहमीसारखं फक्त हसणं. नंतर एक दिवस असंच घरी आलो तर माझा टी-शर्ट कुठे सापडेना. म्हणून विचारलं तर म्हणे त्यांनी तो देऊन टाकला कुणा भंगारवाल्याला. त्यांच्यामते तो आता जुना झाला होता. त्यावेळी तर मला खूप वाईट वाटलं, कारण माझ्यासाठी तो आवडता टी शर्ट होता. असं एकेक करत त्यांनी माझे सगळे जुने कपडे, टी शर्ट भंगारात काढून त्याजागी नवीन कपडे त्यांच्या पसंतीनुसार आणायला सुरुवात केली. त्यांच्या मते मी सभ्य (?) मुलगा होतो आणि म्हणून माझे कपडे सुद्धा कसे माझ्या सभ्यपणाला शोभणारे असायला हवे होते. खरंतर मला त्यांच्यावर चिडणं कधी आवडायचं नाही. कारण ते खरंच खूप प्रेमळ होते. माझं व त्यांचं तसं काहीच नातं नसताना ते माझ्यावर एवढा जीव लावायचे. इतरही अनेक मुलांना ते शक्य तशी मदत करायचे. स्वतःची आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुद्धा. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्याही मनात खूप आदर व प्रेम भावना होतीच; पण पुढे पुढे हे खूपच जास्त व्हायला लागल्यावर मात्र माझा संताप व्हायला लागला. त्यांच्या अति प्रेमामुळे माझ्यासाठी काही स्पेसच इथे शिल्लक नाही असं वाटायला लागलं. मी त्यांच्यावर खूप अवलंबून असल्यासारखं पण वाटायला लागलं मला. सुरुवातीला तर ते मला माझं साधं ताट सुद्धा उचलून द्यायचे नाही. मला त्यामुळे खूपच अवघडल्यासारखं व्हायचं. सारखं सांगून सांगून मी काही गोष्टी कमी केल्या. पण तरी हे प्रमाणाबाहेर होत आहे हे लक्षात आल्यावर शेवटी मी तिथून बाहेर पडलो आणि दुसरीकडे राहायला गेलो. त्यांना त्याचं वाईट वाटलं, पण मी त्यांना समजावून सांगितलं. त्यावेळी ते पुन्हा एकदा असाच एक शर्ट घेऊन आले माझ्यासाठी. याच्या आधीच्या शर्टच्या वेळीच मी त्यांना सांगितले होते कि - 'आता हा शेवटचा शर्ट. यानंतर जर तुम्ही शर्ट आणला तर मी तो घेणार नाही.' मग तुम्ही त्याचं काहीही करा किंवा कुणालाही द्या. खरंतर त्याआधीही प्रत्येक वेळी सांगत होतो, पण त्याची तीव्रता व बोलण्यातली चीड प्रत्येक वेळी वाढत गेली होती. मागच्या वेळी खूपच स्पष्टपणे वार्निंग च्या भाषेत सांगितलं होतं. तरीही त्यांनी पुन्हा शर्ट आणलाच. पण यावेळी मात्र मी तो शर्ट नाहीच घ्यायचा असं पक्कं ठरवलं होतं. त्यांनी खूप आग्रह केला. मी 'नाहीच घेणार' म्हणून त्यांच्या जवळून निघालो. ते खूप वेळ माझ्या मागे येत मला आग्रह करत होते, पण मी नाहीच घेतला. आणि त्यानंतर एकदाचं ते शर्ट प्रकरण बंद झालं; पण तोपर्यंत माझे आधीचे बरेच शर्ट मला सोडून गेले होते. बाकीचे तरी वाचले बिचारे असं म्हणून मी सुटकेचा निःश्वास सोडला.

बाकी आमचं नातं त्यानंतरही अगदी तसंच छान राहिलं. मी दुसरीकडे राहायला गेल्यामुळे त्यांचा माझ्याबद्दलचा पझेसिव्हनेस पण कमी होत गेला. आमचं प्रेम मात्र तसंच कायम राहिलं. आजही पुण्यात गेल्यावर त्यांना भेटल्याशिवाय राहवत नाही आणि तेसुद्धा त्याच मायेने मला आजही जवळ घेतात.
हे उदाहरण सांगण्याचे कारण एवढेच कि- हे काका काय माझ्यावर मालकी हक्क दाखवण्याच्या हेतूने असं करत होते का? तर नाही. पण त्यांच्या प्रेमातून त्यांच्या मनात माझ्याविषयी तयार झालेल्या पझेसिव्हनेस मधून माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट? हे तेच परस्पर ठरवू लागले आणि माझ्याच विषयीच्या निर्णयात माझं मतही विचारात घेणं गरजेचं आहे हेच ते विसरले. हेच घडतं बऱ्याचदा पझेसिव्हनेस मध्ये. प्रत्येकाची प्रेम दर्शवण्याची पद्धत वेगवेगळी असते. माझ्या काकांचे प्रेम नवीन शर्ट, जेवण, गुलाबजाम आणि इतर लाड या गोष्टींमधून ते व्यक्त करत होते; तसे आपण प्रत्येकजण आपापल्या वेगळ्या गोष्टीतून ते व्यक्त करत असू. पण आपले हेच प्रेम नकळत समोरच्या व्यक्तीची स्पेसच संपवतेय का? त्यांचे निर्णय आपण स्वतःच घेतोय का? त्यांच्या आयुष्याविषयी निर्णय घेताना किंवा काही ठरवताना त्यांना पण विचारात घेतोय का? याचा विचार जर आपल्याला करता आला तर नक्कीच आपण या पझेशन पासून स्वतःला दूर ठेवू शकतो आणि आपलं नातं छान फुलवू शकतो.
- सचिन (8424041159)
(तुम्हालाही असे पझेसिव्हनेस चे काही अनुभव अनुभवायला किंवा पाहायला मिळाले असतील तर मला व्हाट्सअप्प वर किंवा फेसबुकला नक्की शेअर करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध