घरकाम - 4

                                                                     घरकाम - 4

काल एका मित्राचा फोन आला तेव्हा तो सांगत होता कि - 'आज गेलो होतो किचनमध्ये ट्राय करायला, पण थोड्याच वेळात मला इज्जतीत बाहेर काढलं गेलं.' आणि वरून 'परत इकडं फिरकायचं नाही' असं पण बजावलं गेलं.' बिचारा. किती मोठी संधी त्याच्याकडून हिरावली गेली. त्याला मी कालचा लेख परत वाचायला सांगितलं आणि घरातील स्त्रियांना पण वाचायला द्यायला सांगितलं. एका रत्नागिरीच्या मित्राने कळवलं कि सुरुवात म्हणून त्याने घरातील एकवेळचा पूर्ण स्वयंपाक बनवला. मेन्यू विचारल्यावर त्याने सांगितले - दाळ-भात, बटाट्याची भाजी. त्याच्यातील या बदलामागचे कारण कळल्यावर त्याच्या मावशीने हा लेख लिहिणाऱ्याचे कौतुक केले. आणि मला मात्र त्याचे जास्त कौतुक वाटले, कारण त्याने लगेच अंमलात आणायला सुरुवात केलीय. त्याला आता यात सातत्य ठेवून पुढच्या टप्प्यावरच्या अजून गोष्टी शिकायला सांगितलं.
आमच्या पुण्यातील एका सध्या सिंगल असलेल्या (जोडीदाराच्या शोधात असलेल्या) आणि खोलीवर एकटाच राहत असलेल्या मित्राने परवा कोरोनामुळे कर्फ्यु डिक्लेअर व्हायच्या आधीच घरातील किराणा खरेदी करून आणला. त्याचा एक छानसा व्हिडिओ बनवून त्याने शेअर केला. त्याने किचनभर पसरवून ठेवलेल्या त्या सामानाकडे बघून बिचाऱ्याचा किचनमधला अनुभव किती असावा हे लक्षात येत होतं. त्यामधला मसाला पाहून महिनाभर काय दुसरा मसाला आणायची गरज नाही असं वाटत होतं. पण त्याचवेळी भाकरीचे आणलेले पीठ पाहून बिचारा चार दिवसानंतर फक्त मसाल्यावरच जगणार कि काय? अशी काळजी पण वाटायला लागली. तरीही 'कृतिशील सुरुवातीची पहिली पावले' म्हणून त्याचे कौतुकच वाटले. कोल्हापूरचा एक मित्र गेल्या दोन-चार दिवसांपासून किचनचा पूर्ण ताबा भावासहित त्याने घेतलाय असं सांगून त्याचे पुराव्यादाखल काही फोटो शेअर करत असतो. परवा त्यांनी भाकरी बनवताना गावजेवण घातल्यासारखा किचनमध्ये केलेला राढा दाखवला होता. ते पाहिल्यावर 'त्यातल्या त्यात मी यापेक्षा तरी बरंच करतो' या भावनेने मी मनातल्या मनात सुखावलो होतो. काल फेसबुक वर त्या 'राणा'च्या मालिकेतील नंदिता वहिनीचा भाकरी बनवतानाचा व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ पाहिल्यावर तर असं वाटलं कि नुकतीच भाकरी बनवायला शिकायचा प्रयत्न करत असणाऱ्या सर्वांना (स्त्री-पुरुषांना) हा व्हिडिओ पाहून नक्कीच प्रेरणा मिळेल. निदान त्यातून 'अशी पण भाकरी असते' हे कळल्यावर उत्साह वाढायला मदत होईल आणि आपल्या चुकलेल्या भाकरीकडे पाहून वाईट वाटणार नाही. आमचे एक ज्येष्ठ सहकारी काल सांगत होते कि मोठ्या उत्साहाने ते किचनमधली कामं शिकायची म्हणून किचनमध्ये गेले. अगदीच सुरुवात म्हणून- दूध तापायला ठेवून त्यावर लक्ष ठेवणे आणि उकळी आली की बंद करणे. इतकं सोपं काम त्यांनी मोठ्या हिमतीने हातात घेतलं. पुढच्या दोन मिनिटांत त्यांच्याकडे पुण्याहून सुनबाई-मुलगा आणि नातू आले. ते दार उघडायला म्हणून गेले आणि नातवाशी खेळत बसले. 'तरीही दूध ऊतू गेले नाही' यावर दिवसभर सर्वांना हसायला कारण मिळाले.
अशा अनेक गमतीजमती किचनमध्ये आणि घरकामामध्ये होत असतात आणि त्या तुमच्या जगण्यात अधिक रंजकता सुद्धा आणत असतात.
खरंतर असे प्रयोग करणारे मुलं व पुरुष आता वाढतायत हे खरं आहे. याशिवाय अनेक पुरुष याच्या पुढच्या टप्प्यावर जाऊन घरातील ही सर्व कामं जबाबदारीने आणि व्यवस्थित पार पाडणारे सुद्धा आहेत आणि त्याचा फार आनंद वाटतोय. ज्यांच्या वाट्याला असे पुरुष आलेत, त्यांना तर किती भरून पावल्यागत वाटत असेल!
- सचिन (8424041159)
(तुमचे अनुभव व प्रतिक्रिया नक्की व्हाट्सअप्प करून कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध