हिंसा-अहिंसा - भाग - 3
विचारपूर्वक निरीक्षण केले तर आपल्या हे लक्षात येईल कि जेव्हा जेव्हा माणसाने संकुचित अस्मितांना जास्त महत्त्व दिले, तेव्हा तेव्हा हिंसेच्या घटना वाढलेल्या आहेत. शिवाय हिंसा घडवून आणणारी ही माणसे सुद्धा जात, धर्म, देव, संस्कृती, भाषा, प्रांत, प्रतिष्ठा, पौरुषत्व अशा संकुचित अस्मितांमध्ये अडकलेलीच माणसे असतात. पूर्वीची वेगवेगळ्या संस्थानांत होणारी युद्धे आणि आज वेगवेगळ्या देशांत होणारी युद्धे यांची वारंवारता पाहता सुद्धा हे लक्षात येईल कि जितक्या माणसाच्या अस्मितांच्या सीमा रुंदावत जातील, तितक्या हिंसेच्या घटना सुद्धा कमी होत जातील. तसेच देव व जाती-धर्माच्या बाबतीत सुद्धा आहे. जितक्या कत्तली आजपर्यंत स्वतःला जाती-धर्माचे ठेकेदार आणि देवाचे रखवालदार समजणाऱ्यांनी केल्या आणि करवल्या आहेत, तितक्या आज इतर कोणत्याच कारणांनी होत नसाव्यात. याउलट ज्यांनी या जाती-धर्माच्या संकुचित अस्मितांचा त्याग करून अखंड मानवतेच्या विचारांचा स्वीकार केला आहे आणि जे मूर्तीत नाही तर माणसांत व सत्कृत्यात देव पाहणारे आहेत किंवा अगदीच देव न मानणारे नास्तिक आहेत, त्यांनी कधीच या कारणावरून दंगली घडवल्याचा किंवा कत्तली केल्याचा इतिहास नाही. खरंतर ज्याला खरा धर्म समजला, तो चुकूनही कधी धर्माच्या नावावर हिंसा करायला जाणार नाही. पण अडचण अशी आहे कि ज्या खूप कमी लोकांना खरा धर्म समजतो, त्यातील खूपच कमी लोक ते विचार इतरांपर्यंत पोचवण्याचे काम हाती घेतात. त्यामानाने धर्ममार्तंड व धर्माच्या नावावर स्वतःचे हित साधू पाहणारे बदमाश लोक मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी कब्जा करून बसतात व ते या खरा धर्म पोचवू पाहणाऱ्या लोकांच्या मार्गात अडथळे आणण्याचे व त्यांना संपवण्याचे प्रयत्न करत राहतात. आपल्या अनेक संतांपासून विचारवंतांचा इतिहास पाहिला तर आपल्याला अशा खऱ्या धर्मप्रसारात अडथळा आणणाऱ्या व त्यासाठी प्रसंगी त्यांचे खून सुद्धा करणाऱ्या हिंसेच्या अनेक घटना दिसतील. तरीही आपल्या समाजाची शोकांतिका अशी आहे कि बहुसंख्य लोक आजही प्रेम व अहिंसेचा विचार सांगणाऱ्या संतांच्या व विचारवंतांच्या मार्गावर न चालता त्यांचा व त्यांच्या विचारांचा अनेकदा खून केलेल्या व आजही वेळोवेळी खून करू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्याच आहारी जाणे पसंत करतात. त्यामुळेच खरंतर हे धर्मांध व जात्यांध लोक परत परत हिंसा घडवण्यात व माणसांना मानसिक गुलाम बनवण्यात यशस्वी होताना दिसतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा