पझेसिव्हनेस याचा शब्दशः अर्थ होतो 'मालकी'. म्हणजे बघा ना, आपण 'पझेशन घेणे' हा शब्द आत्तापर्यंत एखाद्या जागेच्या, घराच्या, प्रॉपर्टीच्या बाबतीत अनेकदा ऐकलेला असेल. याचा अर्थ असतो त्या जागेसंबंधी 'मालकी अधिकार' आपल्याला मिळणे. हाच मालकी अधिकार आपण नकळतपणे कित्येक ठिकाणी वापरायचा प्रयत्न करत असतो. अर्थात, आपण अगदी 'मालकी अधिकार' या उद्देशानेच तो वापरतो असं नाही, पण त्याचा अर्थ शेवटी तोच निघतो आणि नेमका इथेच बराचसा गोंधळ होतो. पझेसिव्ह असणे म्हणजे समोरच्या प्रति मालकीची भावना असणे हे आपल्याला माहिती असते आणि अशी भावना समोरच्याबद्दल ठेवणे चुकीचे आहे असेही आपल्यातील काहीजणांना मान्य असते. पण तरीही आपण अनेकदा पझेसिव्ह होतो आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, याचे कारण काय असावे बरं? यात अजून एक गंमत अशी की 'आपण वस्तूंच्या बाबतीत पझेसिव्ह आहोत कि नाही?' हे आपल्या लगेच लक्षात येते बरं का. पण तेच मानवी नात्यांच्या बाबतीत अनेकदा होत नाही. म्हणजे आपण नेमके कधी समोरच्या बद्दल पझेसिव्ह झालोय हेच अनेकदा कळत नाही आणि ते न कळण्यानेच अनेकदा वाद व भांडणं होत असतात.
याचे कारण मानवी नात्यातील भावनिक गुंत्यात दडलेले आहे. अनेकदा पझेसिव्हनेसच्या आधीची भावना ही समोरच्याविषयी काळजी, प्रेम हे असतं तर कधी भिती, संशय, अविश्वास हेसुद्धा असू शकतं.
कधी ते या सगळ्यांच्या पल्याड देखील असू शकतं. याचे मूळ त्या त्या नात्यानुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकते. याचे अतिप्रमाण झाल्यावर मानसिक आजारात सुद्धा रूपांतर होऊ शकते व मानसोपचारांच्या मदतीने ते बरे सुद्धा होऊ शकते.
प्रत्येकाला आपापल्या मनातील असे एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या बद्दलचे पझेशन व त्याचे मूळ शोधता येऊ शकते; पण त्यासाठी स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने पाहता यायला हवे. त्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल असणारी काळजी ही कधी पझेशन मध्ये बदलतेय यावर लक्ष ठेवावे लागेल. काळजीच्या नावाने किंवा अतिरेकाने आपण त्यांच्यावर बंधनं घालायला सुरुवात करतोय का किंवा त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतोय का याचाही विचार करावा लागेल. आपल्या बद्दलची काळजी किंवा आपल्याला समोरच्या बद्दल वाटणारी काळजी ही काळजीची मर्यादा ओलांडून आपली किंवा समोरच्या व्यक्तीची स्पेस (मोकळीक) अमान्य करत असेल तर आपण किंवा ती समोरची व्यक्ती पझेशनकडे चाललीय हे लक्षात घ्यायला हवे.
अशा प्रकारच्या अनेक पझेसिव्हनेस ची उदाहरणे तुमच्या आयुष्यात देखील आलेली असतील. बरीचशी पाहण्यात सुद्धा आलेली असतील. अशी काही उदाहरणे तुम्हाला शेअर करावीशी वाटत असतील तर नक्कीच शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा