घरकाम -3
घरकाम -3
आजकाल अनेक तरूण मुलं घरकामाबाबत जबाबदारीने विचार करायला लागलेत हे खरं आहे. तशी ती काळाची गरज सुद्धा आहेच. काल आपण बोललो त्याप्रमाणे किमान कृतज्ञ भाव असणे हा स्वतःला माणूस म्हणवून घेण्यासाठीचा भाग झाला. त्याच्या पुढच्या टप्प्यावर घरातील पुरुषांनी सुद्धा पुढे होऊन या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतः सहभागी होणे, जमेल तसे शक्य ते काम करायला लागणे गरजेचे आहे. सुरुवातीला सगळीच कामं व्यवस्थित जमतीलच असं नाही. चुका होतील, गोंधळ होईल, सगळीकडे राढा होईल, कामं कमी व्हायच्या ऐवजी वाढतील. या सगळ्यात वेळ जास्त जाईल. त्यामुळे वैताग येईल आणि हे सगळं पाहून घरातील नेहमी हे काम करणारी स्त्री तुम्हाला किचनमधून बाहेर काढील किंवा घरकामातून बेदखल करील. या सगळ्या शक्यता आहेत. पण तरीही या सगळ्या शक्यतांवर मात करत आपण जिद्दीने आपलं काम चालू ठेवलं तर नक्कीच थोड्या दिवसांत किमान गरजेपुरतं सगळं काम तुम्हाला व्यवस्थित जमायला लागेल. यात सुरुवातीला काही काळजी घेणं गरजेचं आहे. एकदम मोठ्या कामांना हात न घालता छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात करायला हवी. म्हणजे जर आत्तापर्यंत अगदीच तुम्ही घरात अजिबातच काहीच न करणाऱ्या प्रकारातील असाल, तर सुरुवातीला तुम्ही साधं बेड आवरणं, कपडे मशिन ला लावणं (मशिन नसेल तर कपडे भिजायला घालणं), घरात झाडू मारणं, कपड्यांच्या घड्या घालणं इथपासून सुरूवात करू शकता. पण हे फक्त स्टार्टर आहे हे लक्षात ठेवून एवढ्यावरच न थांबता हळूहळू याच्यापुढच्या टप्प्यावर जाणं गरजेचं आहे. पुढच्या टप्प्यावर भाजी धुवून घेणं, भाजी निवडणं, कांदा चिरणं, भाजी चिरणं, चहाचे कप-बशी विसळणं यासारखी किचनमधली छोटी छोटी कामं करता येऊ शकतात. मग पुढे पुढे भांडी घासणे, किचनओटा साफ करणे, यासारखी जी सहज शक्य आहेत आणि फारश्या चुका होणार नाहीत अशी कामं करायला घ्यायची. त्यानंतरच्या टप्प्यावर मग खऱ्या अर्थाने मुख्य स्वयंपाक शिकण्याकडे वळून त्यातील सुरुवातीला सोपे सोपे असणारे प्रकार शिकत मग हळूहळू पुढच्या इतर भाज्या शिकत जाणे व त्यानंतर चपाती-भाकरी करायला शिकणे असा क्रम ठेवला तर सहजपणे या गोष्टी काही दिवसांत सगळेजण शिकू शकतात. (अर्थात ही फक्त काही उदाहरणादाखल सांगितलेली कामं आहेत. प्रत्येकाच्या घरात याव्यतिरिक्त किंवा यासोबत अजून काही कामं करता येणं शक्य असेल. त्यासाठी घरात नेहमी ही सगळी कामं करणाऱ्या महिलांची मदत घ्या.) पण अर्थात यात चिकाटी व सातत्य असणे गरजेचे आहे. कारण घरकाम करणे हेसुद्धा कुणाचेही काम नाही, त्यासाठी सुद्धा स्किल लागतं आणि ते स्किल मिळवण्यासाठी वेळ, जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य या सगळ्याच गोष्टी लागतात.
'ये किसी के भी बस का काम नही है बाबू' हे लवकरच तुमच्या लक्षात येईल आणि काही नाही तरी किमान वर्षानुवर्षे हे काम सातत्याने व्यवस्थित करत आलेल्या स्त्रियांबद्दल आदर वाटायला लागेल. एवढं झालं तरी, आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असं म्हणता येईल.
(आपल्यातले अनेकजण असे प्रयोग करत असतील, केले असतील किंवा तुमच्या घरात, आसपास कोणी करत असेल. त्याबद्दल चे काही अनुभव शेअर करायचे असतील तरी नक्की करा. तुम्ही सध्या यातल्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर आहात तेसुद्धा सांगा.)
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा