'ती' चिमणी सध्या काय करतेय? - भाग- 2

 सकाळी उठल्यावर चिऊ ने आजीजवळ पुढची गोष्ट सांगण्याचा हट्ट धरला व तिच्या मनात आलेले सगळे प्रश्न पण सांगितले.

यावर आजी चिऊला म्हणाली- हे बघ चिऊ, ही जंगल पेटण्याची गोष्ट निरंतर घडणारी आहे. ही भूतकाळात अनेकदा अनेक ठिकाणी घडली आहे, आजही घडत आहे व पुढेही घडत राहील. याची जागा बदलेल. म्हणजे जंगलं बदलतील, पण त्या त्या वेळी त्या ठिकाणी असणाऱ्या पशु, पक्षी व प्राण्यांच्या भूमिका अशाच स्वरूपाच्या राहणार आहेत. आणि यातून पुढं नेमकं काय घडायला हवं हे या सर्वांच्या भूमिकेवरच अवलंबून असणार आहे बघ.
त्यामुळे तुझ्या मनातील या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर प्रत्येकवेळी असेल असं नाही तर जसं त्या तुझ्या आवडत्या अवेंजर्स मूवी सिरीज मधील डॉक्टर स्ट्रेंज ने 'या ब्रह्मांडाचं पुढे काय होईल? अवेंजर्स ब्रह्मांड वाचवू शकतील का?' याच्या एक लाख शक्यता पडताळून पाहिल्या होत्या, तसेच इथे सुद्धा काही शक्यता आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी कुणाच्याही भूमिकेत असू, तर काय करायला हवं? हे या शक्यतांच्या आधारावर तपासून बघायचे असते.
जसे डॉक्टर स्ट्रेंज ला एक लाख शक्यता पैकी फक्त एकाच शक्यतेमध्ये हे ब्रह्मांड वाचेल असं दिसलं होतं, तसं इथं आपल्या या गोष्टीतील जंगल वाचेल याची शक्यता सुद्धा अशा परिस्थितीत खूप कमी वेळा असते; पण असे असूनही जसे अवेंजर्स ने ती लाखात एक असलेली शक्यता सत्यात उतरवून दाखवली, तशी इथे सुद्धा कमी प्रमाणात असणारी जंगल वाचण्याची शक्यता सुद्धा सत्यात उतरू शकते. त्यासाठी त्या त्या भूमिकेत असणाऱ्या पशु, पक्षी व प्राण्यांनी काय करायला हवे यावर आपण विचार करू शकतो. हा विचार करायला सोपं जावं म्हणून आपण स्वतः त्या जागेवर असतो तर जंगल वाचवण्यासाठी काय केलं असतं अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येऊ शकतो.
"बघ आता चिऊ, तुझ्याच हातात आहे. हे जंगल कसं वाचवायचं हे आता तूच विचार करून ठरव बघ." असं म्हणून आजी तिच्या कामासाठी निघून गेली आणि चिऊ पुन्हा विचारात पडली.
आता तर आजीने तिला स्वतःलाच त्या गोष्टीत जायला सांगितले होते. 'आपण स्वतः त्या गोष्टीत जाणार' या गोष्टीचा एकीकडे चिऊला आनंद सुद्धा झाला होता; पण त्याच वेळी आता 'हे जंगल वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे' याची जाणीव झाल्याने चिऊ काळजीत पडली होती. शिवाय आजीने सांगितल्याप्रमाणे जर हे जंगल वाचलेच नाही, तर हे वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या 'त्या चिमण्यांचे पुढे काय होईल?' याचीही चिंता तिला वाटायला लागली.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध