हिंसा-अहिंसा - भाग - 2

 पहिला प्रश्न म्हणजे ही हिंसा येते कुठून व हिंसा नैसर्गिक आहे का?

यासाठी आपल्याला माणसाचा म्हणजेच 'होमो सेपियन सेपियन' चा इतिहास पाहायला हवा. अगदी सुरुवातीच्या काळात आपले पूर्वज हे फळं-कंदमुळं व प्राण्यांची शिकार करून खात होते. त्यावेळी गरज म्हणून माणूस शिकार करत असला तरी त्यातून ही हिंसक वृत्ती त्यांच्यामध्ये होती हे दिसते.
त्यानंतर पुढे जेव्हा शेतीची सुरुवात झाली व माणूस एका जागेवर स्थिर होऊ लागला, त्यावेळी या शिकारीचे प्रमाण ठराविक प्राण्यांपुरते मर्यादित राहू लागले. पाहिजे तेव्हा व पाहिजे तितके मांस खायला मिळावे या हेतूने काही मंद असणाऱ्या व सहज नियंत्रणात राहू शकतील अशा प्राण्यांचे पालन करणे सुरू झाले. शेती, पशुपालन, कुक्कुटपालन यांसारख्या उद्योगांमध्ये रमायला लागल्यामुळे माणसाची भटकंती थांबली व तो एका जागेवर स्थिरावू लागला. यातूनच त्याची अनेक गोष्टींबद्दलची जसे की शेत, जमीन, पिक, जनावर, पाणी यांच्याबद्दलची मालकीची भावना प्रबळ होत गेली. आणि या गोष्टी कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल तर त्यावेळी हिंसक होऊन प्रत्युत्तर देण्यासाठी तो समूहासह तयार झाला. यातून माणसा-माणसात आपापसातील समूहा-समूहातील हिंसा वाढीस लागायला सुरुवात झाली. तसेच समूहांतर्गत सुद्धा अनेक गोष्टींच्या मालकीच्या भावनेतून भांडणे व अशांतता सुरू झाली.
या सगळ्यावर उपाय म्हणून पुढे पुढे समूह म्हणून राहत असताना समूहाचे म्हणून अनेक समूहांतर्गत नियम बनवले गेले. ते नियम मोडणाऱ्यांना शिक्षा ठरवली गेली व या शिक्षेच्या रूपातील हिंसा समूहमान्य केली गेली. तसेच इतर समूहांपासून बचाव करण्यासाठी व समूहांतर्गत सुद्धा अनुशासन बनवून ठेवण्यासाठी समूहातील काही माणसांच्या लढाऊ फौजा तयार केल्या जाऊ लागल्या. पुढे पुढे याच फौजांच्या मदतीने आजूबाजूच्या समूहांवर वर्चस्व गाजवण्यासाठी, आपल्या समूहाची कक्षा रुंदावण्यासाठी म्हणजेच सत्तेसाठी युद्धरूपी हिंसा व्हायला सुरूवात झाली. अनेकदा या अशा युद्धांचे गौरवपूर्ण वर्णन करताना हा सामूहिक हिंसेचा खूप मोठा प्रकार असून आपण नकळत त्या हिंसेचे समर्थन करतोय याचे भान आपल्याला राहात नाही. सम्राट अशोकासारख्या काहींना याचे भान आल्याने त्यांनी हा हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग पत्करला.
दरम्यानच्या काळात अनेक वेगवेगळ्या देव-देवता व धर्म या संकल्पनांचा उगम झाला आणि आपापल्या प्रदेशाबरोबरच आपापल्या देव व धर्माच्या अस्मिता सुद्धा तयार व्हायला लागल्या व या अस्मिता जपणं आणि वाढवणं हे माणसाचं परमकर्तव्य आहे असं सांगणारे त्या त्या धर्मातील माणसांचे विविध गट ऍक्टिव्ह झाले.
त्या गटांचे हितसंबंध जोपासले जातील अशी काही व्यवस्था त्यांनी स्वतःच त्या त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. धर्माच्या पुढे जाऊन जेव्हा जातींचा उगम झाला, तेव्हा तर माणसा-माणसात अधिक गट पडत गेले व त्या त्या छोट्या छोट्या गटांच्या प्रबळ अस्मिता तयार झाल्या. यात सत्तेत असणाऱ्या बुद्धीने व शरीराने बलवान असणाऱ्या गटांनी इतर गटांना कह्यात ठेवण्यासाठी वेळप्रसंगी बळाचा सुद्धा वापर केला.
या सर्वच प्रकारच्या माणुसकी संकुचित करणाऱ्या अस्मितांमुळे माणसा-माणसातील हिंसेचे प्रकार वाढत राहिले. आजही अशा अनेक धार्मिक, जातीय, लैंगिक, सामाजिक, राजकीय, प्रादेशिक, भाषिक अशा असंख्य अस्मिता घेऊन जगत असल्याने माणसांतील हिंसेचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. जितक्या अस्मिता संकुचित व प्रबळ असतील तितक्या हिंसेच्या घटना वाढण्याचे प्रमाण सुद्धा अधिक राहणार हे निश्चित.
सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध