पझेसिव्हनेस 2 - 'माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठीच'

'माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठीच' ही आपल्या आत बिंबलेली पझेसिव्हनेसची भावना जशी वस्तूंबद्दल असते, तशीच ती 'माझाच/माझीच' या स्वरूपात व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा असते. खरंतर ही भावना असणं ही बऱ्याचदा आपली गरज सुद्धा असते. वस्तूंबद्दल असो किंवा व्यक्तींबद्दल असो. बऱ्याचदा ही पझेसिव्हनेसची भावनाच आपल्या जगण्याला अर्थ सुद्धा देत असते. प्रत्येक जिवाला जगण्यासाठी किमान काही प्रमाणात पझेसिव्ह असणं गरजेचं असतंच. जर अजिबातच कशाच्याच आणि कुणाच्याच बाबतीत पझेसिव्हनेस नसेल तर जगणं निरस आणि कदाचित निरर्थक होऊन जाईल.

फक्त हा पझेसिव्हनेस कशाबद्दल आणि किती प्रमाणात आहे हे बघणं गरजेचं आहे. पझेसिव्हनेस हा जसा व्यक्ती व वस्तूंबद्दल असतो, तसा तो अनेकदा अमूर्त गोष्टींबद्दल, संकल्पनेबद्दल जसे कि देश, राष्ट्र, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, कुटुंब, जात, धर्म या सगळ्यांबद्दल सुद्धा असू शकतो. त्याचे अतिप्रमाण झाले कि त्याचे दुष्परिणाम त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
आपण प्रत्येकाने आयुष्यात या पझेसिव्हनेस ला अनुभवलं असेल. कधी आपण कुणाच्या बाबतीत पझेसिव्ह झालो असू, तर कधी कोणीतरी आपल्या बाबतीत पझेसिव्ह झालं असेल. आपली एखादी आवडती वस्तू आपल्या परवानगी शिवाय कुणी घेतली/वापरली असेल तेव्हा आपण हे अनुभवले असेल किंवा आपण एखाद्याची अशी वस्तू घेतल्यावर समोरच्याला चिडलेले पाहिले असेल. काही वेळानंतर आपल्या लक्षात येतं कि हे चिडण्याचे अगदी क्षुल्लक कारण होतं. पण तरी आपण का एवढे चिडतो, तर कुठेतरी त्या वस्तूच्या बाबतीत आपल्या मनात प्रचंड पझेसिव्हनेस तयार झालेला असतो आणि त्यातूनच माझ्याशिवाय या वस्तूला कोणीच हात लावू नये किंवा माझ्या परवानगी शिवाय घेऊ नये अशी भावना मनात तयार झालेली असते. असाच पझेसिव्हनेस काही व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा आपल्या मनात असतो. सहसा तो आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीतच जास्त असतो. म्हणजे जी व्यक्ती आपली सगळ्यात जवळची व्यक्ती आहे असं आपल्याला वाटतं, तिच्याबाबतीत हा पझेसिव्हनेस खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणूनच हा पझेसिव्हनेस जेव्हा एखाद्या नात्यात यायला लागतो, तेव्हा त्या नात्याची नीव सुटायला लागते. मग ते नाते दोन मित्रांचे असो, दोन मैत्रिणींचे असो, मित्र-मैत्रिणींचे असो, भावांचे किंवा बहिणींचे असो, प्रियकर-प्रेयसीचे असो, आई-वडिलांचे असो, मुलांचे असो कि दोन जोडीदारांचे असो. कोणतेही नाते असे नाही की तिथे कधी पझेसिव्हनेस येत नाही. या पझेसिव्हनेस च्या प्रमाणावर आणि त्याला व्यवस्थित हाताळण्यावर त्या नात्याचे व व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते. यात काही व्यक्ती मुळातच अति-पझेसिव्ह असतात, तर काही व्यक्ती मुळातच कशाच्याच बाबतीत फारसे पझेसिव्ह नसणारे असतात. अशा दोन व्यक्ती जेव्हा एखाद्या नात्यात असतात, तेव्हा मात्र त्यांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं.
अर्थात बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या प्रति पझेसिव्ह आहोत हे सुद्धा अनेकदा लक्षात येत नाही आणि आलं तरी बऱ्याचदा आपण ते मान्य करायला तयार होत नाही. आणि जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत त्यावर उपाय करणे सुद्धा अवघड असते. तेच मान्य केल्याने लवकर उपाय करून यातून बाहेर पडता येते व आपले नाते छान जगता येते आणि आपले मानसिक स्वास्थ्य पण टिकवता येते.
अशा प्रकारच्या अनेक पझेसिव्हनेस ची उदाहरणे तुमच्या आयुष्यात देखील आलेली असतील, बरीचशी पाहण्यात सुद्धा आलेली असतील. अशी काही उदाहरणे तुम्हाला शेअर करावीशी वाटत असतील तर नक्कीच शेअर करा खाली दिलेल्या माझ्या व्हाट्सअप्प नंबर वर किंवा फेसबुकवर. आणि हा व माझे या आधीचे सुद्धा लेख आपल्या संपर्कात बिनधास्त पाठवू शकता.
सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध