पझेसिव्हनेस 23 - समारोप करताना

पझेसिव्हनेस हा आजार आहे का? आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्याबाबतच पझेसिव्ह होतो ना आपण? मग आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल आपण पझेसिव्ह असणं यात चूक आहे का? त्यांच्या काळजी व प्रेमापोटीच आपण बऱ्याचदा सगळं करत असतो ना? यातून त्यांना अजून सुधारायला संधी मिळेल म्हणूनच सारख्या सूचना व काही निर्णय त्यांच्यावर लादतो ना आपण? मग तरी आपण वाईट ठरतो का यामुळे? पझेसिव्हनेस थांबवता येतो का? 'पझेसिव्ह व्हायचं नाही' असं ठरवून करता येतं का?

हे व असे अनेक प्रश्न पझेसिव्हनेस संदर्भात आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतात. या लेखमालेदरम्यान येणाऱ्या प्रतिक्रियांतून यातले काही माझ्यापर्यंत पोचले. लेखमालेचा शेवट करताना या सगळ्या मुद्द्यांवर बोलणं गरजेचंच आहे असं वाटलं, म्हणून या शेवटच्या लेखात आज यावर बोलूयात.
पझेसिव्हनेस मुळे अनेकदा नुकसान होतानाच जास्त दिसतं असं आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल. पण खरं तर जेव्हा पझेसिव्हनेस नुकसानकारक ठरतो तेव्हाच तो जास्त चर्चिला जातो व इतर वेळी त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे पझेसिव्हनेस बाबत फक्त नकारात्मक दृष्टीने जास्त पाहिलं जातं. मुळात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही कशाच्या ना कशाच्या किंवा कुणा ना कुणाच्या बाबतीत तरी पझेसिव्ह असतेच. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं कि लहानपणी जेव्हापासून आपल्याला 'माझं' काहीतरी असण्याची जाणीव सुरू होते, मग ते घर असू, वस्तू असो किंवा व्यक्ती असो, तेव्हापासून आपल्यात पझेसिव्हनेसची सुरुवात झालेली असते. आणि हा पझेसिव्हनेस अनेकदा आपल्याला जगण्यासाठी गरजेचा सुद्धा असतो. तसंच जसं आपण नाती जोडत जातो, गुंतत जातो, कुणावर प्रेम करत जातो तसं त्यांच्याबद्दलचा हा पझेसिव्हनेस आपसूक वाढत जातो. पण हा पझेसिव्हनेस म्हणजे लादणे नसून काळजी करण्याचा असतो.
अनेकदा पझेसिव्हनेस नात्यात मजा सुद्धा आणत असतो. पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा तो त्रासदायक ठरतो. शिवाय एकाचा पझेसिव्हनेस दुसऱ्याला पझेसिव्हनेस वाटेलच असेही नाही. त्यामुळे यामध्ये साधे समीकरण आहे- जोपर्यंत तुमचा पझेसिव्हनेस नात्यात मजा आणतोय किंवा किमान त्याचा दोघांनाही त्रास होत नाही तोपर्यंत ठिक आहे; पण जेव्हा नात्यातील कुणाला याचा त्रास होतोय हे लक्षात येईल, त्यामुळे कुणा एकाची स्पेस, निर्णय स्वातंत्र्य, स्वतःच्या इच्छेने जगण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातंय असं लक्षात येईल तेव्हा त्यावर विचार करून काम करण्याची गरज आहे. पझेसिव्हनेस मधून आपल्या जवळच्या व्यक्तीला काही आवश्यक सूचना, सल्ले देणे इथपर्यंत ठिक आहे; पण हे सूचना, सल्ले समोरच्याने अंमलात आणलेच पाहिजेत असा अट्टाहास येत असेल तर तिथे मात्र पझेसिव्हनेस वर काम करण्याची गरज आहे. हा पझेसिव्हनेस जेव्हा अति प्रमाणात वाढेल तेव्हा त्यावर मानसोपचार सुद्धा घेणे गरजेचे असते.
एकूण काय, तर मर्यादेत असणारा पझेसिव्हनेस आपल्याला पुढे नेणारा असू शकतो; पण हा मर्यादेच्या बाहेर गेला तर नुकसानकारक ठरतो. आणि याची मर्यादा कशी ठरवायची? तर आपली काळजी, प्रेम, सूचना, सल्ले हे समोरच्यावर लादले जातायत का? बंधनकारक होतायत का? यामुळे समोरच्याच्या जगण्यावर बंधनं येतायत का? त्याचं ओझं वाटतंय का? याचा विचार केला तर हे लक्षात येऊ शकतं. आपल्या नात्यात किंवा अपेक्षांमध्ये 'च' वारंवार यायला लागला तरी याचा अंदाज येतो. त्यामुळे नात्याला अशा 'च' च्या बाधेपासून दूर ठेवलं तर नक्कीच पझेसिव्हनेस नुकसानकारक न ठरता नातं जास्त घट्ट बनवण्यासाठी मदत करू शकतो.
- सचिन (8424041159)
(हा पझेसिव्हनेस बद्दलचा शेवटचा लेख आहे. काही मित्रांच्या आग्रहानुसार घरकामाच्या लेखमालेनंतर 'स्पेस व पझेसिव्हनेस' यावर लिहायला घेतलं आणि घरकामाच्या लेखमालेप्रमाणेच या लेखांना ही वाचकांचे खूप प्रेम मिळाले. त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
पुढे वेगळा एखादा विषय घेऊन पुन्हा भेटूच.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध